Home Education कृषिविषयक धोरण आणि शेतीचे वर्तमान

कृषिविषयक धोरण आणि शेतीचे वर्तमान

370

▪️”कपालभारती प्रमाणे समाजभारती हे डॉक्टर बाबासाहेबांनचे योगसुत्र”

प्राचीन काळापासून भारतीय लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच राहिलेला आहे. त्यामुळे भारताची ओळख कृषिप्रधान देश अशी बनलेली आहे. या कृषिप्रधान राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा सहभाग लाभलेला आहे. ते भारताच्या आर्थिक नियोजनाचे आणि आर्थिक विकासात्मक धोरणाचे शिल्पकार होते. यासोबत त्यांना भारतीय कृषि व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. ज्या सामूहिकशेती गटशेती बचत गटाचा आता आपण स्वीकार करतो आहोत.त्या सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. ग्रामीण भागात विखुरलेला समाज एकसंध करायचा तर शेतीचे चित्र बदलले पाहिजे. याबाबत ते आग्रही होते. शेतीही केवळ उपजीविकेचे साधन नसून राष्ट्रीय उत्पन्नाचा स्त्रोत आहे. आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेती रोजगाराचे माध्यम आहे. त्यामुळे शेतीकडे उद्योग म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. असे मत बाबासाहेबांनी मांडले होते. आणि ते त्यासाठी आग्रही होते.

राष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती विकसित होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला तर ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडेल शेतकरी आणि शेतमजुरांचे स्थलांतर टळतील या दूरदृष्टीने सखोलतेने त्यांनी शेतीकडे बघितले भारतासारख्या कृषिप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समानरित्या पुरवठा झाला तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही. असे डॉक्टर बाबासाहेबांचे मत होते. शेतीसाठी जमीन पाणी आणि वीज हे मुख्य घटक असल्याचे ते सांगत पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळवणे आणि शासनाकडून वीज मिळणे ही गरज त्यांनी सांगितली आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही. हे बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन त्यांनी नदीजोड प्रकल्पाद्वारे सांगितले आहे.

नदीजोड प्रकल्प धोरणाचे ते जनक होते. 1942 ते 1946 या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना कृषि विकासासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार मांडून भाकरा नांगल प्रकल्पाची पायाभरणी केली. याप्रकल्पाचे नियोजित उंची वाढवली ज्याचा फायदा हरितक्रांतीसाठी झाला. नद्याचे पाणी समुद्रात वाया जाऊ नये आणि या नद्या एकमेकांना जोडल्या जाव्यात यासाठी नद्यावर धरणाचे बांधकाम व विज निर्मिती प्रकल्प हाती घेतले. आज देशात पाणी व वीज टंचाई आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केलेले प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे शेतीचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले नाही याची जाणीव होत आहे.

ज्याप्रमाणे रेल्वे मार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी आहे.त्याचप्रमाणे जलमार्गावर देखील केंद्र शासनाचीच मालकी असावी हे त्यांनी तत्कालीन काळात सांगितले या सर्व त्यांच्या विचारातील शेती आणि शेतकरी या धोरणाची आज खरोखर आठवण होताना दिसते. त्यांनी विचार केलेली पाणी आर्थिक नियोजन सामूहिक शेती नदीजोड प्रकल्प वीज प्रकल्प शेतकरी तसेच शेतमजूर रोजगार उद्योगधोरण त्याचवेळी अमलात आणले असते तर शेतीप्रधान देशाचा शेतकरी खरोखरच प्रधान झाल्याशिवाय राहिला नसता ज्याप्रमाणे कपालभाती पोटाच्या आतड्यातील मल मोकळा करून बाहेर काढतो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांनी मेंदूचा कपालभारती समाजाला शिकविला आहे. ज्यामुळे मेंदूतील वैचारिक मल नाहीसा करण्याचे सामाजिक योगसूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आहे. खरोखरच बाबासाहेब आज असते तर शेतकऱ्यांची आर्थिक अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी विचार मंथन करून नक्कीच लढा दिला असता याची मला जाणीव होत आहे, असे हे वैचारिक बुद्धिमत्ता दीनदलित गोरगरीब शेतकऱ्याचे खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कैवारी होते. म्हणूनच त्यांचे नाव चंद्रसूर्याप्रमाणे झळकत आहे. आणि झळकनेही काळाची गरज आहे.असे मला तरी वाटते.

✒️शब्दांकन:-डॉ. विजयराव मानेसत्यशोधक भाऊसाहेब माने प्रतिष्ठान,उमरखेड जि.यवतमाळ (विदर्भ)

मानवतेचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here