Home महाराष्ट्र कामगार क्षेत्र उध्वस्त करणार्‍या भाजप वा त्याच्या उमेदवारांना जो पराभूत करेल त्या...

कामगार क्षेत्र उध्वस्त करणार्‍या भाजप वा त्याच्या उमेदवारांना जो पराभूत करेल त्या पक्षाला मतदान करा —अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर यांचे कामगारांच्या परिसंवादात आवाहन

270

लातूर – कामगार हिताचे शेकडो कायदे रद्द करून कामगार क्षेत्र उध्वस्त करून कामगारांचे जगणे कठीण करणार्‍या भाजप व त्यांच्या उमेदवारास लोकसभा निवडणुकीत जो कोणता पक्ष किंवा उमेदवार पराभूत करू शकतो, त्या उमेदवारास तमाम कामगारांनी मतदान करावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी येथे केले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि भारतीय संविधान,सन्मान,सुरक्षा वा संवर्धन बिएस फोर लातूर यांच्या संयुक्त विद्दमाने 1 मे रोजी दुपारी 1 वाजता भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि कामगारांची अवस्था, कारणे वा उपाय या विषयावर आयोजित जाहीर परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून राजकुमार होळीकर हे बोलत होते.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सामाजिक क्रांती संशोधन संस्था, नागपूरचे बी. डी. बोरकर हे होते. यावेळी मोमिनभाई शेख, शफी शेख आदींसह अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, नारायण मेघाजी लोखंडे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उत्कृष्ठ कामगार कार्यकर्ता म्हणून शिलाताई भोळे, रेणुकाताई कांबळे, चंद्रपाल गिरी, अंकूश रपळगे, शेख शफी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजकुमार होळीकर यांनी आपल्या भाषणात कामगारदिनानिमित्त कामगारांच्या प्रश्‍नाचा उहापोह करत स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कामगार आणि कामगार नेत्यांचे योगदान होते. त्यामुळे कामगार चळवळीचा इतिहास बुलंद आहे. हा इतिहास माहित असणे गरजेचे आहे. राज्य व देशातील राज्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून कामगारांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले आहे. शेकडो कामगार हिताचे कायदे रद्द करून कामगार क्षेत्र देशाधडीला लावले आहे. सध्याचे मोदी सरकार हे उद्योपतींच्या हिताचे आहे. कामगारांबद्दल दुजाभाव करते आहे. त्यामुळे सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भाजप व त्याच्या उमेदवारांना जो पराभूत करेल त्या पक्षाला मतदान करावे, असे आवाहन राजकुमार होळीकर यांनी यावेळी केले.
तसेच अध्यक्षीय भाषणात बी. डी. बोरकर यांनी सध्या भारतात हिटलरशाही सुरु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कामगार कल्याणाचे अनेक कायदे लिहून ठेवले आहेत. एक तर त्याची गेल्या 64 वर्षांत राज्यकर्त्यांनी अंमलबजावणी केली नाही. आणि आताच्या राज्यकर्ते तर ते कायदेच रद्द करत आहेत.ही बाब कामगारांसाठी संतापजनक आहे. कामगारांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यामुळे कामगारांनी या मोदी व भाजप सरकारच्या विरोधात मतदान करून त्यांना धडा शिकवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसंवादाला शिवाजी भंडारे, जितेंद्र सूर्यवंशी, नंदकुमार खंडागळे, चंद्रपाल गिरी, अंकुश टकळगे, नुतन अंगरखे, मंगल शिंदे, शिलाताई भोळे, रेणुका कांबळे, नेहा सुरवसे, अहिल्या इंगळे, किशोरकुमार सगर,गौतम ससाणे, बालाजी मिरजगावे, माया कांबळे, बळीराम कांबळे, हमीद शेख, प्रमोद बानाटे आदींसह कामगार संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here