Home महाराष्ट्र मानवतेचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर

मानवतेचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर

332

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे मानवतेचे उद्धारक होते. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृशांचे उद्धारक, दलितांचे कैवारी असे संबोधून संकुचित करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आणि मानवतेचे उद्धारक आहेत हे विसरताच येणार नाही. परंतु हिंदु धर्मामध्ये जातीची उतरंड एवढी मजबूत झालेली आहे की हिंदु धर्मातील लोक वरच्या जातीतील लोकांच्या लाता खातील परंतु खालच्या जातीतील लोकांच्या बाता ऐकणे त्यांना पाप वाटतं. डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजात जन्मा आले त्यांना गावात येण्याचा अधिकार नव्हता त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणामुळे जागतीक स्तरांवर नाव लौकिक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध करून स्वतः च्या ज्ञानाचा फायदा देशासाठी करण्याचे ठरवले. परंतु अनेक बाबींचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गुणवत्ता नाही तर जात बघितली गेली, गुवणत्ता ज्ञान बघुन मान सन्मान मिळण्या ऐवजी जात बघुन अवमान मिळत गेला. एवढे असुनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार बदलले नाही.

ज्या विषमतेचे चटके येथील लाखो लोक सहन करत होते त्यापैकी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ही एक होतेच. ज्या जातीवादामुळे, जातीच्या उतरंडीमुळे हिंदु समाजातील माणसाला माणसा पासुन दुर केले होते, द्वेष हिनतेची भावना निर्माण होऊन मानवाने मानवाचे अधिकार हिसकावून घेतले होते, माणसाला माणसाचे गुलाम केले होते. जातीवादाचा जुनाट आजार हिंदु समाजाला जडला होता पण या रोगाचे मुळासकट निदान करण्यासाठी महात्मा फुले आणि शाहु महाराज हे कडवट औषधे देणारे डॉक्टर झाले. दोघेही हिंदु परंतु या दोघांनी ही हिंदु समाजाने सामाजिक मान्यता दिली नाही. कारण हिंदु धर्मातील चुकीच्या व अनिष्ट रुढी परंपरा, जातीवाद, पाखंड, कर्मकांड यावर कोणीही बोलले तरी ते हिंदु समाजाचे विरोधक आहेत अशी शिकवण हिंदु धर्माचे चालक अर्थात ब्राह्मण यांनी दिलेली असल्याने आणि ब्राह्मण श्रेष्ठ असल्याने त्यांच्या चुकीच्या गोष्टी हिंदु समाजाने स्विकारल्या परंतु स्वतः च्या समाजातील लोकांच्या चांगल्या आणि सत्य गोष्टी यांनी स्विकारल्या तर नाहीच परंतु ज्यानी सत्य बोलुन अंधविश्वास, पाखंड, कर्मकांड, अनिष्ट रुढी परंपरा यांच्या विरोधात जे जे महापुरुष बोलले त्यांना समाजातच ठेवले नाही.

मग डॉ बाबासाहेब आंबेडकर याला अपवाद का ठरतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्माने हिंदु असुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचा फायदा हिंदु समाजाला घेता आला नाही. त्यांचे उदात्त मानवतावादी विचार न बघता फक्त जात बघुन त्यांना प्रत्येक ठिकाणी कमी लेखण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यात नवल असे वाटले नाही कारण जन्मा पासुन विषमता, जातीवाद, भेदाभेद याचे चटके खाण्याची सवय असल्याने त्यात नवल असे काहीच नव्हते पण ही परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. म्हणून त्यांनी मुळे शोधुन मुळावरच घाव घालून देशाला मानवता दिली परंतु आजही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जातीची झुल डोळ्यावर असताना आणि डोक्यात विषमता व द्वेष भरलेला असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांनी वाचले नाही ऐकले नाही. अंमलबजावणी करण्याचे तर सोडुनच द्या.

जातीची घाण बाजूला सारून, डोक्यातील विषमता झुगारून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त चार प्रकारचे कार्य आणि विचार जर बघितले तर हिंदु समाज आजही भरभराट करू शकतो. हवी ती फक्त डोळस वृती. ते चार विषय म्हणजे शेती, हिंदू कोडबिल, शिक्षण आणि जातीवाद. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे शेती नव्हती तरीही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी शेतीविषयक विचार हे सरकार दरबारी मांडुन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची बाजु मांडली. शेतीच्या आजच्या समस्या आहेत या समस्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अगोदरच मांडलेल्या आहेत. जसे जमीनीचे तुकडे होणे, अल्पभूधारक, खोतांना जास्त कर देणे, शेतीचे औद्योगिकीकरण करून उद्योगाचा दर्जा देणे, शेतीला सहकार क्षेत्रामध्ये आणणे अशा विषयांवर सखोल अशी मांडणी करून त्यावर उपाय देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहेत. दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदु कोडबिल, हिंदु कोडबिल ज्यांच्या साठी तयार करण्यात आले त्यांनी कधीच ते वाचले नाही, समजून घेतले नाही आणि तत्कालीन लोकांनी त्याला पासही होऊ दिले नाही. काय होते हिंदु कोडबिल तर हिंदु स्त्रियांना समान अधिकार, मान सन्मान व हक्क बहाल करण्यासाठी हिंदु कोडबिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले.

मनुस्मृती ने जे महिलांना दुय्यम माणुन फक्त दासी म्हणून राहण्याचे सांगितले होते. स्त्रियांना मत, विचार आणि वैचारिक स्वातंत्र्य स्मृती ने नाकारले ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुकोड बिलाद्वारे देण्याचा प्रयत्न केला. महिलांना वारसा हक्क मिळणे, विधवेला पुर्नविवाह करण्यासाठी परवानगी देणे, अनिष्ट रुढीपरंपरा यातुन बाहेर पडण्यासाठी हिंदु कोड बिल तयार करण्यात आले. परंतु महिलांनी कसे रहावे, त्यांचे काय नियम असणार हे फक्त मनुस्मृती च ठरवत होती आणि हिंदु धर्माचे चालक मनुस्मृती ला सर्वोच्च माणून मानसाला गुलाम बनवण्याचे काम करत होते. मनुस्मृती नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवर्णीत होते त्यांना मनुस्मृती वाचण्याचा सुद्धा अधिकार नव्हता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबिल आणून जसे काही मनुस्मृती चे दहणच केले असे धर्म चालकांना वाटत होते. आणि अस्पृश्य समाजातील व्यक्तीने स्मृती चे नियम खोडून काढणे म्हणजे महापाप आहे अस समजून तेव्हा हिंदुकोड बिल पास होऊ दिले नाही. परंतु आज ते हळूहळू पास झाले व महिलांना आत्मसन्मान, स्वाभिमान, समता आणि वैचारिक स्वातंत्र्य बहाल झाले ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच.

पण याची जाणीव आज महिलांना आहे का? महिलांनी बाबासाहेब वाचले का खुप चिंतनीय विषय आहे. तिसरा भर दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणावर जर शैक्षणिक विचार घेऊन माणसाने वाटचाल केली असती तर आज देश जगासमोर एक आदर्श असता. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे म्हणण्या मागचे कारणही तसेच होते. हजारो वर्षापासून हिंदु समाजाचे शिक्षण ब्राह्मण वर्गाने नाकारले होते. मनुस्मृती नुसार शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राम्हणांचाच आहे म्हणून हिंदु समाजाला शिक्षणा पासून वंचित ठेवले होते. पुढे महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहु महाराज, भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नाने शिक्षणाला सुरवात झाली. आणि शिक्षीत व्यक्त जातीभेद, विषमता, अनिष्ट रूढी परंपरा, कर्मकांड, अंधविश्वास, पाखंड नाकारून विज्ञान वाद बुद्धीप्रामाण्यवादी बनुन मानव हिताचे विचार करतील म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला अती महत्त्व दिले. चौथे म्हणजे जातीवाद. हिंदु समाजातील जातीवादाची उतरंड तोडून जर सर्वानाच एका रांगे मध्ये बसवले तर सामुहिक विकास होऊन खुप मोठी क्रांती होईल व देशाच्या विकासासाठी हातभार लागेल अशी सर्व समावेश संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती.

एक जात दुसऱ्या जातीला कनिष्ठ समजून स्वतः कसे श्रेष्ठ आहोत, जातीचे अस्तित्व टिकण्यासाठी धरपडत असतात. जातीच्या बंधनामुळे सामाजिक मुद्यांवर लोक एकत्र येऊ शकत नाहीत. हिंदु समाज असुनही खाणपान, रहन सहन, रुढी परंपरा, पुजा अर्चा सारखीच करत असले तरी सर्व जाती सारख्या कधीच होणार नाही याची जाणीव बाबासाहेब आंबेडकर यांना होती. म्हणून जोपर्यंत भावनेने माणूस एक होणार नाही तोपर्यंत भक्तीने एक असलेला माणुस जातीने मात्र वेगळा आणि विषमता पाळणाराच राहील. वरिल विषयांचा विचार केला तर विचार आणि कार्य मानव कल्याणाचे आहे परंतु महाराचे, अस्पृश्य जातीचे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगतात म्हणून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महार अस्पृश्य जातीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाची, मानवतावादी विचाराची व निस्वार्थ केलेल्या कार्याची दखल लोकांनी घेतली नाही परंतु धर्माच्या चालकाने सांगितल्या अनिष्ट रुढी परंपरा भेदभाव, उच्च निचता, विषमता आजही टिकवून ठेवली आहे.

स्वतः हिंदु असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कार्य, व ज्ञानाची महती हिंदु समाजाला नसेल आणि ते मोठ्या उदात्त मनाने स्विकारत नसतील तर याला मानवता, धर्म, प्रामाणिक पणा, संस्कार म्हणायचे का? म्हणून पुर्वग्रहातुन बाहेर येऊन मानसिक गुलामी तोडून जर डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले तर प्रत्येक भारतीय लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः चे विधाते वाटतील. फक्त गरज आणि प्रामाणिक मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याची. आज पर्यंत फक्त ऐकीव माहीतीवर अनेकांनी आपले मत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बनवले होते पण आज गरज आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासनाची. भारतातील बहुतांश लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, भारतीय संविधान वाचले नाही ते केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीमुळेच. परंतु आज जर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायचे असेल तर जो कोणी स्वतः ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी मानतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची योग्य माहिती ज्यांनी बाबासाहेब वाचले नाहीत त्यांना द्यावी म्हणजे त्यांच्या लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां सारखा महापुरुष आपल्या देशात आपल्या समाजात जन्माला येण म्हणजे प्रत्येक भारतीय लोकांसाठी अभिमानाची बाब आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे हिंदु धर्मामध्येच खर्ची घातले. शेवटचे दोन महिन्यापेक्षा कमी कालावधी मध्ये ते बुद्धीस्ट झाले होते. १४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मांतर केले आणि ६ डिसेंबर १९५६ ला त्यांचे महानिर्वाण झाले. थोडक्यात काय तर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, आंदोलन, संविधान हे हिंदु असतानाच झालेले आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाच जातीसाठी किंवा धर्मा साठी संविधान लिहले असे बोलले म्हणजे निव्वळ अज्ञानी आणि कमकुवत बुद्धीचे लक्षण होय. स्वतः समाजातील आंबेडकर स्विकारण्याची ज्यांना लाज वाटत असेल ते मानसिक गुलामच आहेत. माणसिक गुलामी तोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक अभिवादन केले तर येणाऱ्या काळात नक्कीच काही सकारात्मक बदल दिसतील म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वांगीण विचार व कार्य ज्यांना जाणीव पुर्वक माहीती होऊ दिले नाही अशा लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने हिच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव ता मेहकर)मो:-९१३०९७९३००
*************************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here