Home महाराष्ट्र लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज !

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज !

112

६ मे, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०२ वि पुण्यतिथी. आजच्याच दिवशी १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूर ( करवीर ) संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर महाराणी आनंदीबाई यांनी कोल्हापूरच्या गादीचे वारसदार म्हणून त्यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले कारण चौथे शिवाजी महाराज यांना मुलबाळ नव्हते. दत्तक घेतल्यावर त्यांचे छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करण्यात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर २ एप्रिल १८९४ रोजी ते कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले. राज्यभिषेक झाल्यावर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्ष ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे चालवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी राज्यकारभार केला म्हणूनच ते राजर्षी बनले. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. बहुजन समाजाला मानसिक गुलामीतूम बाहेर काढून, तत्कालीन रूढी परंपरा नाकारुन त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक सामाजिक सुधारणा केल्या. शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. शिक्षणाचे महत्व ओळखणारे देशातील पहिले राजे हे छत्रपती शाहू महाराज हेच होते. राज्यातील निरक्षर, गरीब, अस्पृश्य, दलित या बहुजन समाजातील लोकांना शिक्षण दिले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल हे ओळखून त्यांनी समाजातील वंचित, दुर्लक्षित वर्गातील मुलांसाठी वसतिगृहे काढली. विविध जातीधर्मातील मुलांसाठी त्यांनी २२ वसतिगृहे स्थापली त्यात शेकडो मुले शिकली. शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढली पाहिजे या हेतूने त्यांनी मुलींना ४० रुपये स्कॉलरशिप सुरू केली. ब्रिटिश सरकार शिक्षणावर वार्षिक ८० हजार रुपये खर्च करत असताना कोल्हापूर संस्थानचा शिक्षणावरील वार्षिक खर्च हा एक लाख रुपये इतका होता. यातच शाहू महाराज यांची शिक्षणाविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सुवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दृष्ट पद्धत रद्द केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला करावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, तंत्र व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा त्यांनी सुरू केल्या. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हणतात. शाहू महाराजांच्या या निर्णयाला तेंव्हा खूप विरोध झाला पण विरोधाला न जुमानता त्यांनी या आरक्षणाची कठोर अंमलबजावणी केली. शाळा, दवाखाने, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांशी समतेने वागावे, त्यांच्याशी कोणीही भेदभाव करू नये असा आदेश त्यांनी काढला. १९१७ साली विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. त्यांनी देवादासींची घातक प्रथा बंद केली. बहुजन समाजाला राजकीय प्रवाहात सामावून घेण्यासाठी १९१६ साली निपाणी येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. जातिभेदाची प्रथा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. इतकेच नाही तर आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. छत्रपती शाहू महाराजांनी स्पिनिंग अँड व्हीविंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे असे अनेक उपक्रम आपल्या संस्थानात राबवले. त्यांनी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिके आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. चित्रकला, लोककला, संगीत, साहित्य, नाट्य, कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना त्यांनी राजाश्रय मिळवून दिला. शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहे. बाबासाहेब मॅट्रिकमध्ये असताना आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकत असताना त्यांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली. २० आणि २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे अस्पृश्यता निवारण परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करून कोल्हापूरच्या राजवाड्यात त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे साप्ताहिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद करावे लागले जेंव्हा हे शाहू महाराजांना समजले तेंव्हा त्यांनी २५०० रुपयांची आर्थिक मदत देऊन हे साप्ताहिक पुन्हा सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचे कार्य करणारा एक मानवतावादी राजा म्हणून शाहू महाराजांची इतिहासात नोंद आहे. व्यापक दूरदृष्टीच्या या राजाने त्याकाळी राजेशाही असूनही सामाजिक बंधुभाव, दलित व उपेक्षितांचा उद्धार, शिक्षण, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य या क्षेत्रांमध्ये जे कार्य केले आहे तसे कार्य आजवर कोणीही केले नाही. त्यांचे कार्य आजच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. आज त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो ही एकप्रकारे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदनाच आहे. पुण्यतिथीदिनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन!

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here