Home Education पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.पुरुषोत्तम भापकर

पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.पुरुषोत्तम भापकर

95

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.17ऑगस्ट):-येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, माजी सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची निवड करण्यात आली आह.* अशी माहिती अहमदनगर शहराचे आमदार तथा स्वागताध्यक्ष संग्रामभैया जगताप व शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.

डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे चांदणं उन्हातलं, आकांत शांतीचा ( काव्यसंग्रह), पुरुषार्थाला साथ चौथ्या स्तंभाची, हे शक्य आहे, अग्रेसर मराठवाडा, भाऊ दीदी साथी नव्या युगाचे,शैक्षणिक षटकार इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी शोध मुलांच्या मनाचा, गुणवत्तेचे शिलेदार, शासकीय योजनांचा खजिना इत्यादी पुस्तकांचे संपादन केलेले आहे. डॉ. भापकर यांच्यावर औरंगाबाद लीडिंग टू वाईड रोडस, स्वच्छतेचा वारकरी, प्रशासनातील पुरुषोत्तम इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत.

भेटला विठ्ठल, मी वंदन महाराष्ट्राला,महाराष्ट्र माझी आण, ध्यास गुणवत्ता, माझ्या श्वासात तू, मराठी माझी,मनभावन, चांदणे उन्हातले, तुषार्त, चंद्र पाहिला मी जरा, मी एकटा आहे किती, सखे तुला काय म्हणू, सखे तुझ्यासाठी, लावण्य, आता साठव थेंब थेंब पाणी इत्यादी ऑडिओ व्हिडिओसिडीज व अल्बम प्रकाशित आहेत.

डॉ.पुरुषोत्तम भापकर हे शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र असून एम.ए. अर्थशास्त्र, एलएलबी, पीएचडी, (कृषी अर्थशास्त्र) असे त्यांचे शिक्षण झाले आहे. जळगाव, धुळे निफाड, मालेगाव,पुणे येथे उपजिल्हाधिकारी,पुणे येथे पुनर्वसन उपायुक्त, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलसचिव,नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त,परभणी, धुळे व पुणे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास प्रशासन संचालनालयाचे आयुक्त व संचालक,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, शिक्षण आयुक्त, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव,औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे.त्यांना राष्ट्रपती सिल्वर मेडल,सर्वोत्कृष्ट अतिरिक्त जिल्हाधिकारी,भारत ज्योती अवार्ड,वीर एकलव्य राष्ट्रीय पुरस्कार यासह २५ हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.

त्यांच्या हे शक्य आहे या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण सर्वोत्कृष्ट वाडम: य पुरस्कार मिळालेला आहे. डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्यावर पुरुषोत्तम या नावाने मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.शब्दगंध साहित्यिक परिषदेचे मार्गदर्शक प्राचार्य जी.पी.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची एकमताने ऑक्टोबर मध्ये अहमदनगर येथे होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, मार्गदर्शक बापूसाहेब भोसले, कार्याध्यक्ष डॉ.अशोक कानडे, डॉ गणी पटेल, प्रा.डॉ.संजय पाईकराव, डॉ शेषराव पठाडे व प्राचार्य जी पी ढाकणे यांनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here