




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.8फेब्रुवारी):- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे माता रमाई यांच्या जयंती निमित्त अभिवादन आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी माता रमाई यांना अभिवादन केले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आजच्या काळात जेव्हा कुटुंब व्यवस्था संशयाच्या भुताने बाधित होऊन कोसळत आहे तेव्हा माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दाम्पत्य जीवन समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन केले आणि विद्यार्थ्यानी माता रमाई आणि इतर थोर पुरुषांच्या जिवन चरित्राचे वाचन करून अंगीकारावे आणि आपले जीवन समृद्ध आणि संपन्न करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रा. भीमादेवी डांगे यांनी आपल्या मनोगतात माता रमाई यांची बाबासाहेबांवर असलेले निष्ठा, बाबासाहेबांचा माता रमाई वर असलेला विश्वास, त्यांचे निष्कलंक चारित्र्य, शीलसंवर्धन आणि बाबासाहेब आंबेडकर समाजाच्या उद्धारासाठी अहोरात्र लढत असताना माता रमाईने सांभाळलेली कौटुंबिक जबाबदारी, केलेला त्याग आणि कष्ट यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.




