✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.29नोव्हेंबर):- राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणण्यात केंद्रस्थानी असलेले संजय राऊत यांची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे. ठाकरे गटाची ‘मुलूख मैदानी तोफ’ अशी बिरूदे लावले जाणारे राऊत उरली-सुरला ठाकरे गटही संपवायला निघाले आहेत,अशी टीका इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केली.राऊतांनी त्यामुळे निरर्थक बडबड बंद करावी,असा सल्ला देखील पाटील यांनी दिला आहे. त्यांचा बाष्कळपणा असाच चालू राहील्यानेच ठाकरे गट आणखी डबघाईला आला आहे.
राऊतांकडून रोज केल्या जाणाऱ्या बडबडीतून काहीही सार्थकी लागत नाही. जनतेला देखील त्याचा काही एक फायदा होत नाही. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आता राऊतांनी गटातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजे, संघटनात्मक दृष्टीने त्यांचे सल्ले-सूचना ऐकून घेतल्या पाहिजे.एखादे गाव,तालुका दत्तक घेवून त्यात विकासकार्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावे,असा सल्ला पाटील यांनी दिला आहे. रोज टिव्हीवर येवून, बडबड करीत विकास होणार आहे का? ठाकरे गट वाढणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत राऊत यांच्या वाचाळपणामुळेच पक्षात बंड झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
या ‘सामनावीरा’ची बडबड अशीच सुरू राहीली तर त्यांच्या गटात उद्धव-आदित्य ठाकरे आणि राऊतच नेते शिल्लक राहतील. राऊतांनी राज्यसभेवर निवडून गेल्यावर कुठले भरीव कार्य केले, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभारली, प्रत्येक शिवसैनिकांना भावनिक आधार देत त्यांना आपलेसे केले. परंतु, आताचे नेते शिवसैनिक घडवणे तर दूरच ती संपवायला निघाले आहेत, असा टोला देखील त्यांनी राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.