Home चंद्रपूर महात्मा फुले यांचे कार्य व विचार समाजाला दिशादर्शक – प्रा. डॉ.रवींद्र विखार

महात्मा फुले यांचे कार्य व विचार समाजाला दिशादर्शक – प्रा. डॉ.रवींद्र विखार

32

ब्रह्मपुरी: संत व समाज सुधारक हे विशिष्ट जाती पुरतेच मर्यादित नसतात. ते सर्वव्यापी असतात. त्यांचे विचार हे सर्वांना दिशादर्शक असतात. महात्मा ज्योतिबा फुले यांचे तत्कालीन परिस्थितीत केलेले कार्य व विचार आजही समाजाला दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी केले .
त्रिरत्न बौद्ध विहार, रमाबाई चौक विद्यानगर, ब्रह्मपुरी यांच्या विद्यमाने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा येथील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.रवींद्र विखार बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.इ. एल .रामटेके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मेश्राम उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. डॉ रवींद्र विखार म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केवळ शैक्षणिक कार्य केले नसून सामाजिक, साहित्यिक कार्यही केलेले आहेत. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व पहिली शिवजयंती साजरा करण्याचा मान महात्मा ज्योतिबा फुले यांना जातो. ते उत्तम व आदर्श बिल्डर होते. त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. जनतेने दिलेली महात्मा ही पदवी फार मोलाची असून ते खरे महात्मा होते .महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक विचारांचा काही भाग सव्वाशे वर्षानंतर शासनाने अंशतः स्वीकारले व त्यांच्या शैक्षणिक विचारांची अंमलबजावणी काही प्रमाणात आज होताना दिसत आहे . महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे कार्य समोर नेण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांवर थॉमस पेन यांचाही प्रभाव पडला होता .समाजातील सर्वच घटकांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असले पाहिजे , कौशल्याधिष्ठित शिक्षण असावे असा त्यांचा आग्रह होता .महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने समाजाला नवचेतना दिली .त्यांच्या तृतीय रत्न या नाटिकेतून ,शेतकऱ्यांचा आसूड ,गुलामगिरी या ग्रंथातून समाजाला विवेकाचा दिवा दाखविण्याचे कार्य केले .त्यांचे पुढील कार्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समोर नेले .म्हणून बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानत असेही ते म्हणाले . याप्रसंगी चंदाताई रामटेके, रायपुरे ताई ,विपुल खोब्रागडे, अश्विन मेश्राम यांनीही आपले विचार मांडलेत.
कार्यक्रमाला या समितीचे उपाध्यक्ष बौद्धरक्षक जांभुळकर, सचिव मंगेश नंदेश्वर, रवी गणवीर, मंजू रायपुरे, रिद्धानंद धाकडे सर, चंदाताई रामटेके, रायपुरे ताई ,एस.टी. मेश्राम, प्रा .झाडे प्रा.कु. ज्योती डांगे, सर्व कार्यकारिणीचे सदस्य तसेच अभ्यासिकेचे विद्यार्थी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय या समितीचे अध्यक्ष डॉ. इ. एल. रामटेके , संचालन कमलेश वेलथरे व आभार भास्कर नाकतोडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here