Home अमरावती संत्राचा आंबिया बहार धोक्यात ; संत्रा उत्पादक शेतकरी संकटात ! संत्रा...

संत्राचा आंबिया बहार धोक्यात ; संत्रा उत्पादक शेतकरी संकटात ! संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान !

132

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यासह हिवरखेड महसूल मंडळात बुधवार ता. ६ डिसेंबर रोजी जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, कापूस, तूर, भाजीपाला यासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचा सर्वाधिक फटका हिवरखेड महसूल मंडळाला बसला आहे. २६ ते २९ नोव्हेंबर, १ डिसेंबर व ६ डिसेंबर रोजी हिवरखेड महसूल मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने संत्रा उत्पादक शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे.
मोर्शी तालुका विक्रमी संत्रा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी
प्रसिद्ध असून संत्राचा आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा अवकाळी पाऊस ठरत आहे. मागील बारा दिवसांपासून ढगाळ वातावरण व सतत अवकाळी पाऊस पडत असल्याने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला असताना आता पुन्हा ६ डिसेंबर रोजी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड मंडळातसह आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला असून संत्रा बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मोर्शी तालुक्यात आंबिया बहार संत्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांनी संत्रा बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होऊन कोट्यावधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. त्यानंतर १० ते १५ जानेवारीपासून संत्रा बागेला पाणी दिले जाते. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फूलधारणा होण्यास सुरुवात होते. मात्र अवकाळी पावसामुळे हे सारे व्यवस्थापन प्रभावित झाल्याने संत्राचा आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
गेल्या बारा दिवसांपासून मोर्शी तालुक्यांत अवकाळी पाऊसाने थैमान घातले आहे. अस्मानी संकटाने मोर्शी तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांच्या आयुष्याची घडी विसकटून टाकली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात कधीही झाले नाही ऐवढे कोट्यावधी रूपयांचे नुकसान अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे झाल्याने नैसर्गिक संकटाचे गांभीर्य ओळखून आपद्ग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे.
राज्यकर्त्यांनी प्राधान्यक्रम ठरवताना अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी पावले उचललीच पाहिजेत. राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करायची, अशीच गत मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी पुढे येऊन बळीराजाला आधार देण्याची मागणी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना केली आहे.

—–
अवकाळी पाऊसामुळे संत्रा, मोसंबी, कपाशी, तूर, भाजीपाला यासह शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकर्‍यांचे अर्थचक्र पुन्हा एकदा धोक्यात आल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. सरकारने लवकरात लवकर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला द्यावेत. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून बाधित शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा. — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here