Home अमरावती संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

79

विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबेडकर यांच्या समकालीन;परंतु पंधरा वर्षे वयाने मोठे असले तरी अन्य राजकीय व्यक्ती व समाज सुधारकापेक्षा डॉ.आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने/कार्याने ते अत्याधिक प्रभावित होते.अनिष्ट प्रथा,जुन्या रूढी,प्रथा,परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करणे हे दोन्ही बाबाच्या कार्याच्या समान सूत्राने एकमेकाती प्रभावित होते. त्यांच्यात एकमेकांप्रती प्रचंड आदर,प्रेम,जिव्हाळा आपुलकी सार्थ अभिमान,सामंजस्य, समन्वय आणि प्रचंड आत्मीयता होती.उच्चशिक्षित आंबेडकर सामाजिक सुधारणां व अन्य महत्वपूर्ण कार्याच्या बाबतीत बाबासी सल्लामसलत करीत तर गाडगेबाबा किर्तन प्रसंगी आंबेडकरराच्या चिंतन,मनन,मंथन आणि त्यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करीत असे.
किर्तन हे गाडगेबाबांच्या जनप्रबोधनाचे प्रमुख माध्यम.बाबाचे मुंबईत कीर्तन असताना डॉ आंबेडकर संधी मिळेल तेव्हा आवर्जून किर्तन ऐकायला जात असत आणि इतरांनाही प्रेरित करीत असत. आग्रह करीत असे.बाबासाहेबाचा हा आग्रह ज्ञानात्मक होता मनोरंजनात्मक नाही.एकदा मुंबई च्या भायखळा मार्केट मध्ये बाबाचे कीर्तन होते.वि.मा.दि पटवर्धन आपल्या आठवणीत सांगतात की,डॉ.आंबेडकराच्या आग्रहाखातर एकदा त्यांच्याबरोबर विविध वृत्तपत्राचे संपादक आणि मी बाबाच्या किर्तनाला गेलो.भायखळा मार्केट जे नेहमी घाणेरड असायचं ते आज लख्ख होत.”सालं या म्युन्सीपालटीच्या लोकांना कीर्तनाची पटांगण साफ करायला बर सुचत नाही तर के.ई. एम.च आवार बघा कधी त्यांला झाडू लागेल तर शपथ.रामभाऊ आपल्या स्वभावानुरूप चरफडले आणि रुमाल टाकून त्यावर बसणार तोच बाबासाहेबांनी तो रुमाल ओढून घेतला आणि म्हणाले “अरे ए रामभाऊ,हे मार्केट बाबांनी स्वतःच्या हातानी झाडून,धुऊन काढलं,बस नीट आरामात.बाबाच्या कीर्तनात डॉ आंबेडकर खालीच बसायचे आणि म्हणायचे”जेथे जेथे गाडगेबाबा तेथे तेथे घाण असूच शकत नाही”.आंबेडकर आणि त्यांचे सहकारी खाली जमिनीवर बसले होते.विशेष म्हणजे ते खाली जमिनीवर बसून कीर्तन ऐकत असे.कीर्तन सुरू होताच तटणीस नावाच्या एका श्रोत्यांनी त्यांना विचारले “महाराज एक ईचारू का?त्यावर गाडगेबाबा म्हणाले “ईचारा मायबाप,पण मले महाराज म्हणू नका,मी आपले लेकरू हाय.बोलविते धनीच बसले तुमच्या पलीकडे.तेच आहे खरे महाराज.गरीब लोकांसाठी,आपल्या समाजासाठी लढणारे महाराज तुमच्यासाठी आधीस जमिनीवर बसून माय कीर्तन आईकून राहिले असे म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे अंगुलीनिर्देश केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चक्क जमिनीवर बसून कीर्तन ऐकत होते.
डॉ.आंबेडकरांचे विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्व आणि कर्तुत्वाने गाडगेबाबा अत्याधिक प्रभावित झाले होते.आंबेडकरांप्रती त्यांना प्रचंड आदर,आत्मीयता होती.त्यांना कुठेही बाबासाहेबांविषयी अनादर दिसल्यास ते अस्वस्थ होत असत.म्हणून ते कीर्तनातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास, संघर्ष,शैक्षणिक व इतर कार्य लोकांसमोर मांडत.त्यांचा जयघोष करीत असे.असाच १९४२ चा एक प्रसंग.मनमाड येथे तात्यासाहेब पवार यांच्या बंगल्यासमोर आयोजित कीर्तनाच्या वेळी अन्य महापुरुषाच्या कार्याबरोबरच डॉ आंबेडकरांच्या कार्याची महती त्यांनी लोकांसमोर मांडली. कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात बाबा म्हणाले ” बोलो डॉ.बाबासाहेब आंबेडकर की”असा जयघोष केला.मात्र श्रोत्यांकडून कसलाच पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.त्यावेळी बाबा अस्वस्थ झाले.बाबा पुन्हा बाबासाहेबांचे कार्य,संघर्ष आणि त्यांच्या कार्याची महती अत्यंत पोटतिडकीने सांगू लागलेत.बाबाच्या तळमळतेने संपूर्ण जनसमुदाय प्रभावित झाला होता.तद्नंतर बाबा पुन्हा जयघोष देत म्हणाले, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर की” लोक म्हणू लागले,”जय” “जय”जनसमुदायातून झालेला हा प्रचंड जयघोष गगनाला भेदत होता.यावरून गाडगेबाबाना आंबेडकरांप्रती किती आदर/आत्मीयता आणि सामाजिक कार्याची जाणीव होती हे त्यांच्या तळमळतेतून प्रकर्षाने दिसून येते.
डॉ.आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे सख्य होते. बाबासाहेबांच्या विदवत्तेने गाडगेबाबाचे मन भारावून जाई. तर गाडगेबाबांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने बाबासाहेब प्रभावित होत असे.दोन्ही बाबाचे कार्य हे एकमेकांना परस्पर पूरक असेच होते.दोघांनीही समाज;परिवर्तनासाठी आणि वंचिताच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले.परिवर्तनाच्या लढाईतून दोघांनाही घट्ट ऋणानुबंधात बांधले.संधी मिळेल तेव्हा ते एकमेकांना भेटत असत. गाडगेबाबांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही.तर डॉ. आंबेडकर उच्चविद्याविभूषित होते.असे असतानाही शिक्षणाची दरी त्यांच्या घट्ट नात्यात कधीच आड आली नाही.उलट उत्तरोत्तर हे ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले.म्हणूनच बाबा कीर्तनातून शिक्षणावर अधिक भर देत असताना डॉ.आंबेडकराच्या शैक्षणिक कार्याची दाखले देत असत.आपल्या अखेरच्या कीर्तनात गाडगेबाबा म्हणतात, ” “विद्या केवढी मोठी गोष्ट आहे. डॉ.आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यान पिढीनं झाडू मारायचं काम केलं, यांच्या वडीलाले सुबुद्धी सुचली आणि डॉ. आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं.आंबेडकर साहेबांनी काही लहानसान कमाई नाही केली. त्यांनी घटना केली.हिंदुस्तानची घटना केली.घटना.अन तेच शाळेत जाते ना,अन शिकते ना, तर झाडू मारनच त्यांच्या कर्मात होत.विद्या मोठ धन आहे. जेवणाचं ताट मोडा.बायकोला लुगडं कमी भावाचा घ्या. मोडक्या घरात राहा.पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू– नोका! असे बाबा डॉ. आंबेडकरांचा गौरव करून त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत.
भारतीय चातुर्वर्ण व्यवस्था अत्यंत प्रबळ होती.प्रस्थापितांनी अस्पृश्य व पददलिताना त्यांचे हक्कच नाकारले होते. इतरराप्रमाणे दलित,वंचित अस्पृश्य समाजाला सुद्धा अधिकार व हक्क मिळावेत यासाठी डॉ.आंबेडकर आग्रही होते.त्यासाठी त्यांनी आंदोलने केलीत.लढे उभारलेत हेच कार्य गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून केले आहे.दोघांच्या कार्याचा समान धागा होता. प्रस्थापितांनी नाकारलेल्या समाजाला न्यायासाठी अखेर डॉ.आंबेडकरांनी १९३५ ला येवले येथे हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली.तेव्हा अन्य धर्माचे लोक डॉ.आंबेडकरांना त्यांचाच धर्म स्वीकारण्यासाठी विनंती करीत होते.दरम्यानच्या काळात डॉ.आंबेडकर गाडगेबाबाच्या भेटीस आवर्जून गेले.त्यांच्याशी सल्ला, केली.बाबासाहेब बाबांना म्हणाले “आमच आपल्याशी काम होतं,बाबा म्हणाले,अहो आपणास मात्र इतकी काम आहेत त्यातल एक काम करायचे आम्ही मदत केली” बाबासाहेब आपल्याला त्रास झाला.बाबा म्हणाले, आपण किती तरास घेता,भारताची घटना बनविली चहूकडे विद्येचा प्रकाश पाडला.! दलितांसाठी रात्रंदिवस खटपट करून राहिले! धन्य आपले माता पिता.असे उद्गगारले! बाबासाहेब हात जोडून गाडगेबाबांना म्हणाले “बाबा आपण माझे गुरु आहात एका बाबतीत मला आपला सल्ला पाहिजे,बाबा म्हणाले,”बोला मले अडाण्याले उमगत!समजत!त्यावेळी डॉ.आंबेडकरांनी गाडगेबाबा जवळ हिंदू धर्म त्यागाचा आणि नवा धर्म स्वीकारण्याचा मनोदय व्यक्त केला.तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, मले काय धर्माचे ज्ञान?मी अडाणी धोबी! बाबा साहेब सांगत होते.बाबा ऐकत होते. स्तब्ध होते.पण थोड्यावेळाने म्हणाले डॉ.साहेब मी अडाणी माणूस! तुम्ही शिकले-सवरले हायेत!लय बुक वाचली हायेत. तुम्हाले आपल्या समाजाची दुक दैना माहित आहे.तुम्ही जो निर्णय घ्याल तो बेसच असंन.सगळी पद दलित जमात तुमच्या मागे आहे. तुम्ही रस्ता दावान त्या रस्त्याने ते सगळे येतील त्येची तुमच्या वर श्ररदा आहे.तुमच्या एका अक्षरापायी हे लोक जीव टाकतील.भलत्या वाटेने नेऊ नका !”,बुध्द आणि त्याचा धरम माणुसकीचा धरम हाये.आम्ही बाप्पा त्याच धर्माचे वारकरी आहोत.हाच धर्म माणुसकीने अन साऱ्या समाजाला पुढे नेईन.तुम्ही करान ते बरुबबर आसन.सारा समाज तुमच्या पाठीशी हाये.यावरून गाडगेबाबाचा संकेत सुद्धा बाबासाहेबाप्रमाणेच बौद्ध धर्माकडे अधिक होता. दोन्ही बाबाच्या विचारातील साधर्म्य तंतोतंत जुळणारे होते. दोघांच्याही सल्ला-मसलत करण्याच्या प्रक्रियेत कुठलीच औपचारिकता आणि कुठलाच पूर्वग्रह नव्हता.परस्परविषयी आत्मीयता प्रेम व सहकार्य होते. दोघेही मानवतावादाचे पाईक!एक उच्चविद्याविभूषित तर दुसरे निरक्षर पण दोघांच्याही कार्याची गती व दिशा जवळपास समान होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत सरकारमध्ये मंत्री असतानासुद्धा बापाची भेट घेण्यास कधी विसरत नसत.१४ जुलै १९५१ ची गोष्ट.बाबाची प्रकृती ठीक नव्हती.ते मुंबईतच दादर येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले होते.ही माहिती महानंद स्वामी करवी डॉ.आंबेडकर यांना कळाली होती.डॉ.आंबेडकर त्यावेळी कायदामंत्री होते.त्याच दिवशी सायंकाळी त्यांना दिल्लीला परतणे आवश्यक होते. त्यासाठी ते बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पोहोचले सुद्धा होते. परंतु बाबांच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला सारून गाडगेबाबांच्या भेटीसाठी थेट दवाखान्यात पोहोचले.त्यावेळी त्यांनी सोबत बाबासाठी दोन घोंगड्या खरेदी केल्या होत्या.बाबा कुणाकडून काहीच स्वीकारत नसंत पण बाबासाहेबांनी आणलेल्या घोंगडी मात्र त्यांनी स्वीकारल्यात.गाडगेबाबा तेव्हा म्हणाले,डॉ.साहेब तुम्ही कशाला आले?मी एक फकीर,तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे.तुमचा किती मोठा अधिकार आहे.तितक्याच तन्मयतेने डॉ. आंबेडकर म्हणाले,बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा.उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही.तुमचा अधिकार मोठा आहे.”” याप्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यातून सुखद अश्रू तरळले होते.कदाचित हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत असावे.यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा उपस्थित होते.बाबासाहेबांनी गाडगेबाबांना तब्येतीला जपा, धर्मशाळा व अन्य कामाची चिंता करू नका,ते केव्हाही पुढे करता येईल.आपण आज विश्रांती घ्या.याच भेटीदरम्यान गाडगेबाबांनी डॉ.आंबेडकरांना पंढरपुरातील चोखामेळा धर्मशाळा पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक कामासाठी दिली तसेच पंढरपूर धर्मशाळेचे दानपत्र आणि धर्मशाळेच्या खात्यात जमा असलेली एकूण रक्कम १५,०००/ डॉ.आंबेडकराकडे सुपूर्द केली होती.या बाबातील त्यांचा हा स्नेह अतूट होता.बाबा डॉ. आंबेडकराना म्हणाले की, आपली लई आधीच भेट झाली असती तर धर्मशाळा काढण्याच्या ऐवजी शिक्षण शाळा काढल्या असत्या.पण आता हे काम तुम्हीच करा,समाजाले अशा लय स्कूलची,कॉलीजाची गरज आहे. या भेटीदरम्यानचा संवाद दोघांच्याही दुर्दम्य इच्छाशक्तीचा आणि परस्पराची समाजाप्रतीची असलेली आस्था,तळमळ प्रकर्षाने दिसून येते.डॉ. आंबेडकरांनी हे कार्य तितक्याच पोटतिडकीने पुढे रेटले. त्यानुषंगाने गाडगेबाबाची शिक्षणा प्रतीची स्वप्नपूर्तता यानिमित्ताने झाली आहे.
स्वतःचा मुलगा गोविंदा आणि जन्मदात्री आईच्या मृत्यूचा परिणाम इतका झाला नाही तितका परिणाम डॉ.आंबेडकराच्या महापरिनिर्वानाचा झाला.६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.ही बातमी बाबाच्या कानी पडली तेव्हा गाडगेबाबा धायमोकलून रडले.गाडगे बाबा का रडतात हे उपस्थितना उमगलेच नाही.तेव्हा बाबा आपल्या सहकाऱ्यांना म्हणालेत,”अरे तुमचा आमचा बाप आज या जगात नाही राहिला.अरे तुम्ही आम्ही पोरके झालो रे”असे म्हणत दुःखांना वाट मोकळी करून दिली.असे गेले कोट्यानु कोटी काय रडू एकल्यासाठी असे म्हणणारे गाडगेबाबा डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अवघ्या १४ दिवसाने म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.अज्ञान,अंधश्रद्धा,दारिद्र्य,अअनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी जीवन खर्ची घातलेले तसेच गावोगावी फिरून दिवसाच्या वेळी गावाची स्वच्छता आणि रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करणाऱ्या गाडगेबाबा चा आज (२० डिसेंबर)स्मृतिदिन.(कर्मयोगाने दोन्हीही बाबाचा स्मृतिदिन डिसेंबर महिन्यातच) त्यांच्या या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम व अभिवादन………….
—————————————
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४
ईमेल-nareshingale83@gmail.com
—————————————————–

Previous articleसंगीतकार शाहजहां शेख सागर का लेटेस्ट म्युज़िक वीडियो “दिल तोड़ गए” ज़ी म्युज़िक द्वारा रिलीज
Next articleभीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने बीजवडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here