



(भद्रावती)- तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे लगत असलेल्या वडाळा- मुधोली या ७ कि.मी. च्या मुख्य रस्त्याची गेल्या २ वर्षांपासून पुर्णतः दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची वाहतुक १२ कि.मी.अंतर असलेल्या विलोडा-काटवल तु. या रस्त्याने ५ कि.मी. जास्त अंतराने जावे लागत असल्यामुळे विभागातील जनमानसात संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, या रस्त्याची स्थिती पाहता ७ कि.मि.रस्ता संपुर्ण उखडलेला आहे, रस्त्याची गिट्टि उकळुन रस्त्याचे दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत आहे. डांबरीकरण उकळुन मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने चालवताना चालकाला मोठी कसरत करावी लागते. केव्हा वाहणाची मोडतोड किंवा पंचर सारखी परिस्थिती नित्याचीच झाली आहे. त्यामुळे काही लोकांनां तर ५ कि.मी.जास्त अंतराने विलोडा काटवल मार्गाने वाहतुकीची मजबुरी ठरत आहे. या विभागातील आरोग्य, शिक्षण व आठवडी बाजार, पर्यटन आणि इतर महत्वाच्या कामांचे दृष्टीकोनातून मुधोली हे गाव महत्वाचे केंद्र आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा, बैंक, वनविभागाचे कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तलाठी कार्यालय इत्यादी शासकिय कार्यालये आहेत. त्यासोबतच मेडिकल, कृषी केंद्र, ट्रेडर्स, किराणा हे लोकांना सेवा आणि लोकांना रोजगार देणारे हाटेल, रिसार्ट, आठवडी बाजार आहे. त्यामुळे विभागातील अनेक गावांचा प्रत्येक्ष संबंध मुधोली गावाशी आहे. त्यात या रस्त्यांशी संबंधित वडाळा तु. घोसरी, खुटवंडा, आष्टा, किन्हाळा, कोकेवाडा, सोनेगाव, कारेगाव, मानोरा या गावातील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था पहाता संबंधित बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी विशेष लक्ष देऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी विभागातील जनतेनी केली आहे.


