Home लेख देशाभिमान, क्रांती अन् हौतातम्याचे चरीत्रनाट्य : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके हे नाटक’

देशाभिमान, क्रांती अन् हौतातम्याचे चरीत्रनाट्य : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके हे नाटक’

45

 

ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे लिखित ‘गोंडवानाचा क्रांतियोद्धा: वीर बाबूराव शेडमाके ‘ नाटक पुणे येथील मधुश्री प्रकाशनाने प्रकाशित केले असून जेष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशूराम खुणे यांच्या शुभहस्ते येत्या रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. तीन अंकातील १७ प्रसंगातील १७२ पृष्टामधून ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनातील पेचप्रसंग, संघर्ष , युव्हरचना, कोंडी यानुषंगाने चरित्राचा मर्मस्पर्शीपणे आढावा घेतला आहे.

नाटकांत वीर बाबुराव शेडमाके, मेटासिंग ,विस्तारी बोगाबाबा, राजे व्यंकटराव, गंगाधर कावडकर, वजीर अली, रमण सावकार ,रामजी गेडाम सिताराम दीक्षित , कोंडय्या सावकार, कॅप्टन क्रिप्टन, कॅप्टन शेक्सपियर, कॅप्टन स्कॉट, कॅप्टन गार्ड लँड, कॅप्टन हॉल पीटर, रघुनंदन, राजेश्वर राव, बारीकराव, दोन सैनिक या पुरुष पात्राप्रमाणेच राणी राजकुवर ,लक्ष्मीबाई, सुकरी आणि नर्तकी या स्त्री पात्रासह एकूण 27 कलावंतांच्या माध्यमातून क्रांतिकारक बाबुरावजी शेडमाके यांची शौर्यगाथा नाटककाराने रेखाटली आहे. गोंडवानाच्या आद्य क्रांतियुद्धाची महन्मंगल गाथा अशी अभ्यासपूर्ण व नाटककार व नाटक या अनुषगाने सामर्थ्यस्थळांची नोंद घेणारी प्रस्तावना ज्येष्ठ नाट्य समीक्षक प्राचार्य डॉ. शाम मोहरकर यांनी लिहिलेली असून नाट्य अभ्यासक डॉ.जनबंधू मेश्राम यांनी गोंडवानाच्या महायोद्धाची शौर्यगाथा: क्रांतिवीर बाबुराव शेडमाके हे नाटक असल्याचे विवेचन करीत या नाटकाविषयीचा अभिप्राय व्यक्त केला आहे.प्रायोगिकदृष्ट्या दर्जेदार असलेले वाचनीय नाटक प्रेक्षक व वाचकांच्या मनात वीरगाथाभिमान जागृत करणारे आहे. वयाच्यापंचविसाव्या वर्षी बलाढ्य ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या बाबूराव शेडमाके यांची क्रांती गाथा सर्वश्रृत आहे. वीर हौतात्म्य पत्करलेल्या आदिम जंननायकाची शौर्य, त्याग, बलिदान , स्वदेशाभिमानाने ओतप्रोत भरलेली गौरवगाथा नाटकांतून प्रत्ययास येते.

गोंडवन राज्य स्वतंत्र झालं पाहिजे यासाठी अल्पावधीत म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षीच ब्रिटिशा सारख्या बलाढ्य शत्रूशी लढत प्राणत्याग करणाऱ्या क्रांतिवीर बाबुराव शेडमाके या राजांच्या शौर्याचे हे नाटक आहे. गुलामगिरी व अत्याचार नष्ट करण्यासाठी देहत्याग करणाऱ्या शूर वीरांची ही गाथा आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत स्वभाषा, स्वधर्म आणि स्वतंत्रतेचा जागर करणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणांची ही वीरगाथा आहे. ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या क्रांतियोद्धाची ही संघर्ष गाथा आहे. सत्तासंघर्षाचे व मुक्ती लढ्याची शौर्यगाथा म्हणजेच हे नाटक . ब्रिटिशांच्या आक्रमणाला आदिवासी राजांचे स्वकियांच्या रक्षणार्थ केलेले बलिदान म्हणजे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके हे नाटक.
महामृत्युंजय सारख्या महानाट्याचे लेखक चुडारामजी बल्लारपुरे यांनी लिहिलेले हे नाटक आहे. जाणकार ज्येष्ठ नाटककाराने गोंडवानातील क्रांतिकारक राजाच्या जीवनावरील गोंडवानाचा महायोद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चरित्रनाटय आहे. आदिम जीवनाच्या प्रश्न- समस्यांचे प्रत्ययकारीपणे चित्रणाप्रमाणेच भूमितत्त्वाशी निगडित सामूहिक जीवनाचा आविष्कार घडविणारे नाट्य म्हणजे आदिवासी नाटक .आदिम जीवनातील विविध जिवंत प्रसंग चित्रण, लोकसंस्कृतीचे दर्शन, आदिम देवता, परंपरा, रितीरिवाज आणि निसर्गाश्रयी जीवनशैलीचे प्रतिबिंब आदिवासी नाटकातून उमटलेले असावे. आदिवासी समाजातील तंट्या भिल्ल, खाजा नाईक, बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, रघुनाथ शहा या क्रांतिकारकांच्या कार्य मोलाचे आहे. आदिवासी क्रांती नायकावर फार कमी नाट्य लेखन झाले आहे. अलक्षित आणि समाजासाठी फार मोठे योगदान देणाऱ्या नायकावर नाट्य लेखनाचे केलेले नाटककाराचे धाडस कौतुकास्पद आहे.इतिहास आणि नाट्य यांचा सुंदर मिलाफ असणारे असे वास्तवाभिमुख शोकात्म नाटय म्हणजेच ‘क्रांतीयोद्धा वीर बाबुराव शेडमाके ‘हे नाटक होय. समर्पित क्रांतिवीर बाबुराव शेडमांके यांच्या अंतरंगाचा शोध घेणारे नाटक त्यांच्यातील असामान्यत्व सुचित करते.बाबुरावजींच्या शोकात्म जीवनाने भारावलेले नाटक.वीरमरण पत्करणाऱ्या क्रांतिकारकाच्या हौतात्म्याची जाणीव चंगळवादात अडकलेल्या ,इतिहासाचे विस्मरण होणाऱ्या आजच्या पिढीला करून देण्याच्या प्रयोजनातून नाटककाराने हा विषय हाताळला आहे.महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेले गोंडवनातील महान योद्धाची ही वास्तव कथा आहे. गोंडवनातील राजे परंपरा दीर्घकालीन स्वरूपात असून जनतेच्या सेवेत असणारे राजे इतिहासात उल्लेखनीय योगदानामुळे प्रसिद्ध आहेत. आदिम जन जीवनातील जनवेदनेचे विद्रोही रूप असलेले क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचेच . गुल्लेर, भाले , तीरकमठे, गोफण या पारंपारिक शस्त्रानिशी बलाढ्य ब्रिटिश सरकारच्या सैनिकांशी सामना करण्यासाठी ,परकीय गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी निर्धास्थपणे पुढाकार घेणारे राजे म्हणजेच वीर बाबुराव शेडमाके होय. परकीय दृष्ट ब्रिटिश कंपनी, दगाबाज आप्तस्वकीय, धर्म परिवर्तक, फितूर, महाराणी लक्ष्मीबाई ,शोषक सावकार, हव्यसू जमीनदार यांच्याशी झालेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. अर्थातच वीर बाबुराव शेडमाके यांचा मुकाबला केवळ एकाशीच होता असं नव्हे ;तर या विविध अपप्रवृत्तींशी तोंड देऊन स्वराज्य स्वधर्म स्वअस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे.
नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या क्रांतिवीर बाबुराव शेडमाके हे नाटक तीन अंकातील 17 प्रवेशातून साकार होते. क्रांतिवीर बाबुरावजींच्या विवाह प्रसंगापासून सुरू नाटक विविध घटना- प्रसंगाचे दर्शन घडवीत फाशी पर्यंतच्या जीवन चरित्रांचा आलेख मांडणारे आहे. बाबुरावजी-राजकुंवर यांचा विवाह, तलवार युद्ध ,शोषक सावकाराविरुद्धचे बंड, कलेक्टर क्रिकटन, गडीसूर्ल्याचे दीक्षित आणि राजगडचे रामजी गेडाम यांची ब्रिटिशांशी जवळीकता, बाबुराव शेडमाके यांना बोचणारे परकीय आक्रमण, संघटन क्रांतीसाठी जंगोमची स्थापना, क्रांतीसाठीची सज्जता, घोटचे राजे व्यंकटराव , मोलमपल्लीचे राजे बाबुराव यांचां अहेरीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्याशी मतभेद, राजगडच्या रामजी गेडाम यांच्यावरील हल्ला इत्यादी प्रसंग पहिल्या अंकातून नाटककाराने दर्शविले आहे.
दुसऱ्या अंकात दीक्षित यांची याचना ,बाबुरावला पकडण्याचे फर्मान, 1000 सैनिक ,500 घोडेस्वार व तोफासह डेप्युटी कमिशनर शेक्सपियरची आगेकूच, भोसरी नांदगाव जवळ घनघोर युद्ध, इंग्रज पराभूत होऊन पळाले परंतु प्रतापराव व मालोजीराव शहीद, क्रिक्टन- शेक्सपियरचे व बाबुराव -व्यंकटराव राजे यांच्यात सल्लामसलत, युद्धनीतीचे नियोजन शेक्सपियरचा पराभव ,गडीसूर्ल्यावर विजय, विस्तारीचा मृत्यू , ब्रिटिशांमध्ये खळबळ राजमाता लक्ष्मीबाईवर दबाव, राजमाता लक्ष्मी यांचे बाबुराव व व्यंकटराव शेडमाके यांना समजावून माघार घेण्यास सांगतात पण बाबुराव मात्र आपल्या मताशी ठाम निर्धार करतात. सगनपूरच्या लढाईत गनिमी काव्याने शत्रूला हैराण करून कॅप्टन स्कॉटला ठार केले जातात त्यात बोगाबाबा धारातीर्थी पडतात,हे सर्व प्रसंग दुसऱ्या अंकात दर्शविले आहेत.
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या आक्रमक हल्लेप्रवृत्तीमुळे इंग्रजांमध्ये दहशत, प्रचंड खळबळ. कॅप्टन गार्डन हॉल यांच्यावर हल्ला, शेक्सपियरचे राणी लक्ष्मीबाईला कटकारस्थानात सहभागी करून बक्षिसाचे आमिष, बडी महाराणी बनविण्याचे लालच, घोटमध्ये बाबुराव शेडमाके व व्यंकटराव शेडमाके यांच्या सैन्या सभोवताल घेराव, महासंग्राम, जंगोमची सैनिकांचे नुकसान, वैनगंगा नदी ओलांडल्यानंतर 700 ब्रिटिश सैनिकांना जंगोमची सैनिकांनी कापणे, लक्ष्मीबाईवर शेक्सपियरचा वाढता दबाव, राजमाता लक्ष्मीबाईने धोक्याने बाबुरावांना पकडून दिले, पराक्रमी होतात्म्याला फाशी असे स्वरूप तिसऱ्या अंकाचे आहे.

नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी ‘गोंडवानाचा महायोद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके ‘या नाटकात बाबुराव शेडमाके यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूचे दर्शन घडविले आहे. सामान्य जनतेचे शोषण करणारे रमण सावकार,कुलकर्णी, कोंडय्या सावकार या अमानवीय शोषण करणाऱ्या सावकाराकडचे पैसे लोकांना वाटणारा, सावकारांना धडा शिकविणारा,वतन राखणे हेच कर्तव्य समजणारा, जमीनदार ,भांडवलदार, सावकारांना जेरीस आणणारा, शूरवीर प्रतापी ,क्रांतीचे रणशिंग फुंकणारा,कुशल नेतृत्व करणारा, गनिमी काव्यात तज्ञ, सामान्य जनतेची कर्जमुक्ती करणारा, लयलुटीने जमलेले सावकारांचे पैसे लोकांना वाटणारा, सावकारांनी जमिनी गहाण ठेवलेले गहाण पत्र लोकांना परत देणारा दयावान, ब्रिटिशाविरुद्ध एल्गार पुकारणारा, निष्ठावान सहकारी गमावल्याने हळहळणारा, वध करण्यासाठी आलेल्या रोहिल्यांचेही मतपरिवर्तन करणारा , यदुराय मोकाशी सारख्याना आश्रय देउन जेऊ घालणारा, ब्रिटिशांच्या हस्तकांना धडा शिकवून त्यांच्या परगणातील लोकांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करीत स्वाभिमान जागृत करून आपल्या सोबत घेत ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारणारा, ब्रिटिश सत्तेला हादरे देत सळो की पळो करून सोडणारा, इंग्रजांचे राज्य हस्तांतरित करण्याची कुटनीती हेरत हाणून पाडणारा, जुलूमशाहीच्या विरोधात सशस्त्र उठाव करणारा, शस्त्र प्रवीण, युद्ध चातुर्य गनिमी कावा पारंगत जंगोम सेना निर्माण करणारा दूरदृष्टीचा संघटक, अमाननीय जाचक अशा जुलूमशाही विरोधात बंड करणारा, दगाबाज व फितुरांना शिक्षा करणारा, जनतेत देशाभिमान निर्माण करणारा धान्याची कोठारे लोकांसाठी खुली करून लोकहित जपणारा असा हा लोकनेता वीर बाबुराव शेडमाके यांच्यातील बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू नाटककारांनी समर्थपणे मांडले आहे. एकूणच वीर बाबुराव शेडमाके यांचे युक्तिवाद कौशल्य, संघटन कौशल्य, युद्धचातुर्य व गनिमी कावा वगैरे पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखेच झंझावात कार्य केले आहे.

अठरा वर्षे वयाच्या बाबुराव यांच्या लग्न प्रसंगापासूनच नाटकास प्रारंभ होतो. पहिल्या अंकातील पहिला प्रवेशच बाबुराव यांच्या व्यक्तिमत्त्वातील विद्रोहाची जाणीव करून देणारा आहे .किंबहुना परतंत्र ,परकीय जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी बंड करणारे बाबुराव सावकार शाहीला कसे प्रखर विरोध करतात, हे नाटकाच्या प्रारंभीच प्रेक्षकांच्या लक्षात येते.
“बाबुराव : मेटासिंगबाबा सांग त्या कुलकर्ण्याला, हा बाबुराव तुला घाबरणारा माणूस नाही .जंगलचा राजा आहे .राजा पुल्लेसूर बापू शेडमाकेचा वीर पुत्र .लवकरच 24 गावचा जमीनदार होणार आहे. तुझ्यासारख्या सामान्य सावकाराला घाबरून पळून जाणार नाही”,
असं छाती ठोकपणे म्हणणारे बाबुराव यांचे क्रांतिकारकत्व त्यांच्या रक्तात भिनल्याचे अनेक प्रसंग नाटककारांनी नाटकात दर्शविलेले आहेत.
ब्रिटिश कंपनी सरकार विरोधातला लढा, जल, जंगल, जमीन, धर्मस्वातंत्र्यासाठी चाललेली ओढातान, स्वधर्म प्रेम, परकीयां प्रमाणेच स्वकीय शत्रूशी असलेला संघर्ष या सर्व विरोधात बाबुरावजींना संघर्ष करावा लागला तो ऐतिहासिक स्वरूपाचाच आहे.
‘आमचे गोंडधर्माचे शंभू शेक पेरसापेन यांची कृपा, कोया- कोईतुर समाजाचे धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो व आमचे पिताश्री पुल्लेसुरु बापूंचे आशीर्वाद, आमच्या माय माऊजी जुरजाकुंवर मातेची माया -ममता आणि राणी सरकारचे पाठबळ, यामुळे आम्ही यापुढे जीवनातील प्रत्येक लढाई निर्धास्तपणे जिंकणार’
हा अंतरिक आत्मविश्वास वाखाण्याजोगाच. किंबहुना नाटककाराने कमीत कमी शब्दातून बाबुराव यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची कल्पना प्रेक्षकांना करून दिलेली आहे. अर्थातच अल्प संवादातून संपूर्ण पार्श्वभूमी प्रेक्षकापर्यंत पोहोचविण्याचे लेखन सामर्थ्य अनेक संवादातून जाणवते. खरे तर जो इतिहास सर्वांनाच माहिती आहे त्यावर नाटक लिहिणे हे अत्यंत जिकिरीचे कार्य परंतु बारा नाटके लिहिणाऱ्या श्री.बल्हारपुरे या सिद्धहस्त नाटककाराने ते समर्थपणे पेलले आहे. संवादातूनच ऐतिहासिक काळ उभा करणे तत्कालीन स्थितीची जाणीव करून देणे वेगवेगळी पात्रे प्रेक्षकांसमोर आणणे आणि दोन पात्रातील संवादातून व्यक्तिमत्व उभे करणे यात नाटककार यशस्वी झालेले आहेत.
गरिबांवर अन्याय करणाऱ्या सावकारांचा, जमीनदारांचा, जुलूमशहांचा कर्दनकाळ,बाबूराव सवंगड्यांना वास्तव स्थितीची जाणीव करून देत संघटनकौशल्याने जवळ आणणारा बाबुराव, आवाज बुलंद करण्यासाठी क्रांती सेना जंगोमची स्थापना करणारा बाबुराव ‘काळाची पावलं ओळखणारा घोट मोलमपल्लीचे जमीनदार बाबुराव शेडमाके व घोट अडपल्लीचे जमीनदार व्यंकटराव शेडमाके यांच्यावर इंग्रजांच्या विरोधात उठाव केल्याबद्दल राजद्रोहाच्या खटला दाखल केला जातो .त्यांनी ब्रिटिश अधिकारी गार्डन हॉल यांना मारल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याने ब्रिटिश सरकारने या दोघांना जिवंत व मुर्दा पकडण्याचे फर्मान काढलेलें असतानाही निर्भीडपणे क्रांतिकार्य अविरत ठेवणारे बाबुराव शेडमाके हे लढवय्येच होते.
चांदागडचे जिल्हाधिकारी क्रिक्टन, विनोद निर्माण करणारा शिपाई रघुनंदन, फुटीर -स्वार्थी रामजी गेडाम-सीताराम दीक्षित, सगा साथीदार विस्तारी, डेप्युटी कमिशनर इलस,घोटचे जमीनदार राजे व्यंकटराव शेडमाके, व्यंकटरावचे दिवाण वजीर आणि गंगाधर, नर्तकी सुकरी , फितूर लालची अहेरीची राजमाता लक्ष्मीबाई ,शस्त्र पारंगत प्रशिक्षक मालगोराव तलांडी ,निष्ठावान विस्तारी- मेटासिंग आणि क्रांतिकारी, बेडर ताडवावीर बाबुरावजी शेडमाके या व्यक्तिरेखा विशिष्टस्वभावधर्मानिशी नाटकातून जिवंत साकरल्याने ठळकपणे नजरेत भरतात. सुविचार सदृश संवाद हे ही विशेष प्रकर्षाने जाणवतात.
‘घराबाहेर पुरुषार्थ गाजवणारा जगातील प्रत्येक पुरुष हा स्वतःच्या पत्नीसमोर हतबल आहे’,’प्रेमाने केल्या गेलेला वार हृदयाला भुरळ पाडतो मग तो तलवारीचा असो की बाहुपाशांचा’,
गरुडभरारी घेऊ इच्छिणाऱ्या गिधाडांची नजर खाली वळवळणाऱ्या सापांवर असतेच ना ‘
अशा खटकेबाज संवाद लेखनाबरोबरच नाटककारच्या लालित्यपूर्ण प्रवाही लेखनशैलीमुळे हे नाटक अधिक भावते. त्यामूळे अनेक वाक्यांना सुभाषिताचे मोल प्राप्त झालेले आहे.तद्वतच
“बाबुराव: या बाबुरावच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा गणिक एक नवा बाबुराव क्रांतिकारक म्हणून या
देशात जन्म घेईल. फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊन तो तुटून पडेल ब्रिटीशांच्या छाताडावर लचके तोडील तो ब्रिटीश सत्तेचे…! या मातृभुमीचं स्वातंत्र्य खेचून आणण्याकरीता हा बाबुराव पुन्हा पुन्हा जन्म घेईल. कॅप्टन, क्रांतिकारकाचं हौतात्म्य ही क्रांतिची नांदी असते न संपणारी !…हे धरती माते, तुझ्या उदरातून पुन्हा एक नवा कोंब फुटू दे नव्या उमेदीचा, सळसळत्या रक्ताचा, तळपत्या तलवारीच्या धारेचा, आणि मशालीच्या पेटत्या ज्वाळेचा…याद राखा कॅप्टन, माझ्या फाशीनंतर गोंडवाना पेटून उठेल. त्याच्या ज्वाळा ब्रिटीश साम्राज्याला जाळून टाकतील.
…कॅप्टन, मी ताडवा वीर आहे. बांबुच्या रांझीतील ताडवा खावून मी वज्रदेही झालो आहे. मला मारण्याकरिता आपण बांबुच्या बेतांचा दोर करुन मला फांसी द्या. ”
तिसऱ्या अंकातील शेवटचा प्रसंग बाबुरावजींच्या जिंदादिलाचे आणि शौर्याचे जसे दर्शन घडते तसेच नाटककाराच्या चिंतनशीलतेचा, लेखन शैलीचा आणि ज्ञानाचा आवाका स्पष्ट करणाराच आहे. हे आत्म निवेदन वाचकास अंतर्मुख करणारे आहे.
वीर बाबुराव शेडमाके हे नाटक चरित्रनाट्य आहे. या नाटकातील विविध पात्रे बाबुराव शेडमाके यांच्या जीवनाशी संबंधित आहेत.तत्कालीन काळाशी संबंधित परिवेश,परिणामकारक भाषा,खटकेदार संवाद, प्रवाही शैलीत नाटककाराने ऐतिहासिक घटना- प्रसंग कलात्मकतेने मांडल्याने नाटक वाचनीय आहे.
नांदगाव भोसरी, गडीसुर्ला, सगनापूर,कोनसरी, बामनपेठ येथे झालेले वेगवेगळ्या हल्ले त्यात कॅप्टन हॉल, कॅप्टन गार्डन यांना यमसदनी पाठवून निर्माण केलेल्या दहशतीमुळे ब्रिटिश अधिकारी व सैनिकांमध्ये बाबुरावजींचे नाव काढताक्षणी थरकाप उठायचा. शेक्सपियर सारख्या अधिकाऱ्यालासुद्धा सळो की पळो करून सोडलेले. वीर महात्म्याची शोर्यगाथा उत्कटपणे रेखाटली आहे. बाबुरावजी शेडमाके यांच्या क्रांतीमय जीवनाचा आलेख नाटकातून प्रभावीपणे साकारला आहे. नाट्यतंत्राचे सूक्ष्म ज्ञान व इतिहासाच्या सखोल अभ्यासामुळे नाटयकृती सरस झाली आहे.वेधक, चटकदार,, खटकेबाज आशियानुरूप घटना प्रसंगांना गतिमान करणारे अभिनय गर्भ संवाद , विविध घटना -प्रसंगांची साखळी,पात्रानुरुप भाषा , तेच प्रसंग ऐतिहासिक दृश्याचा चढता आले का संविधानक,आशयाचे गांभीर्य राखणारी प्रवाही शैली, उत्कंठावर्धकता,आशयवाहक गीते ,या वैशिष्ट्यामुळे हे नाटक वाचनीय व प्रेक्षणीय आहे.क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या चरित्राचे दर्शन घडविणारे,सत्तासंघर्षाचे,,मुक्तीलढ्याचे नाटक स्वभान जपणारे पुढच्या पिढीस प्रेरित करणारे आहे. स्वाभिमान जागृतीने अस्तित्वासाठीच्या आक्रंदनाचे आणि अन्याय -अत्याचाराविरोधाच्या संतापाचे हे क्रांतिनाट्य आहे.आदिम नायकविषयी प्रेम जागे करणे, अस्मिता जागृती, स्वभागप्रेम, स्वसंस्कृती,स्वधर्म, स्वातंत्र्य, बाबुरावजींच्या निष्ठा , शौर्य, त्याग यांविषयीचे महत्त्व प्रतिपादन करणाऱ्या नाटकाचे सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या योगदान ही अनन्यसाधारण आहे.क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या अंतरंगाचा वेध घेणारे नाटक त्यांच्यातील असामान्यत्व व सुचित करणारे आहे. मर्यादित शस्त्रसाठांसह बलाढ्य शत्रूशी लढा देणाऱ्या सामान्य क्रांतिकारकाचा आसामान्य लढा दर्शविणारे
अस्तित्वसंघर्षाचे शौर्यनाट्य, स्वाभिमान जागृतीचे क्रांतीनाट्य,स्वजाणिवांचा बुलंद अविष्कार घडविणारे आदिम जनचेतनेचे क्रांतीनाट्य म्हणजेच
‘गोंडवानाचा महायोद्धा: क्रांतिवीर बाबुराव शेडमाके ‘ नाटक आहे.
प्रा.डॉ.राजकुमार मुसणे,
आष्टी,जि.गडचिरोली

Previous articleमुधोली येथे तीन दिवसीय प्रयास शिबिराचे आयोजन
Next articleस्व. गणपतराव देशमुख यांना पोलिस मित्र संघटनेच्या वतीने अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here