Home खेलकुद  जगजेत्ती बॉक्सर लवलीना

जगजेत्ती बॉक्सर लवलीना

117

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती भारताची महिला बॉक्सर लवलीना बोर्गेहन हिने नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिक पदक आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक अशी दुहेरी कामगिरी करणारी ती भारताची केवळ दुसरी बॉक्सर आहे. या आधी अशी कामगीरी फक्त मेरी कोम हिलाच करता आली आहे. मेरी कोम नंतर अशी ऐतिहासिक कामगिरी करणारी लवलीना ही दुसरीच बॉक्सर आहे म्हणूनच तिच्या या कामगिरीचा देशवासियांना सार्थ अभिमान आहे. अर्थात अशी ऐतिहासिक कामगिरी करणे वाटते तितके सोपे नाही त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते लवलीनाने ती घेतली म्हणूनच ती इतकी मोठी कामगीरी करू शकली. लवलीनाचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. तिचा आजवरचा प्रवास नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी असाच आहे. लवलीनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी आसामच्या गोलाघाट येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव टिकेम बोर्गेहन असे आहे.

तिच्या दोन मोठ्या बहिणी लीचा आणि लिमा या देखील राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळल्या आहेत. तिच्या बहिणी बॉक्सर असल्याने तिनेही बॉक्सिंगमध्येच करियर करण्याचे ठरवले. तिच्या शाळेत बॉक्सिंगसाठी चाचणी शिबीर घेण्यात आले त्यात ती सहभागी झाली. त्यात प्रशिक्षक पदूम बोरो यांनी तिची निवड केली. २०१२ सालापासून तिचे बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रख्यात बॉक्सिंग प्रशिक्षक शिव सिंह यांच्याकडून तिने प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय स्तरावर तिने दर्जेदार कामगिरी केली त्यामुळे २०१७ साली व्हिएतनाम येथे झालेल्या आशिआई स्पर्धेसाठी तिची निवड झाली. या स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले याच कामगिरीच्या जोरावर तिची २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत ती पदक मिळवू शकली नाही पण त्याची कसर तिने मंगोलिया आणि पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत भरुन काढली. या दोन्ही स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले.

२०१९ साली रशिया येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतही तिने कांस्यपदक मिळवले याच पदकाच्या जोरावर तिने टोकियो ऑलिंपिकचे तिकीट मिळवले. लवलीनाने टोकियो ऑलिंपिकची तिने जोरदार तयारी सुरू केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचेच असा निश्चय तिने केला पण ऑक्टोबर २०२० मध्ये तिला कोरोनाने गाठले. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयातुन आल्यावर काही दिवस तिला विलगिकरणात राहावे लागले त्यामुळे तिचा सरावात खंड पडला. आता सर्व संपले ऑलिम्पिक पदकाचे आपले स्वप्न अपुरेच राहणार असे तीला वाटले यावेळी तिच्या कुटुंबीयांनी आणि प्रशिक्षकाने तिला खूप धीर दिला. कोरोनातून बरी झाल्यावर तिने पुन्हा सरावाला सुरवात केली. भरपूर सराव केला. खूप मेहनत घेतली. फिटनेस टिकवण्यावर भर दिला.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचेच या निश्चयाने ती झपाटून गेली. तिने दिवस रात्र एक केले आणि टोकियो गाठले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला खडतर ड्रॉ मिळाला तिचे सर्व प्रतिस्पर्धी मातब्बर होते त्यामुळे ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकेल अशी आशा कोणालाही नव्हती पण तिला मात्र स्वतःवर खूप विश्वास होता. या विश्वासाच्या जोरावरच ती रिंगमध्ये उतरली. सुरवातीचे सामने तिने लीलया जिंकले. उपांत्यपूर्व फेरीत चीनची मी चेन ही तिची प्रतिस्पर्धी होती. मी चेन ही जगातील सर्वोत्तम बॉक्सर म्हणून ओळखली जाते. या मी चेन ने लवलीनाला याआधी चार वेळा पराभूत केले आहे त्यामुळे हा सामना देखील मी चेनच जिंकेल असेच भाकीत जाणकारांनी केले होते. मी चेन देखील लवलीनाला आपण सहज हरवू या भ्रमात होती. रिंगमध्ये उतरण्यापूर्वी तिने तशी वलग्नाही केली होती मात्र रिंगमध्ये उतरल्यावर वेगळेच घडले. मी चेनला फाजील आत्मविश्वास नडला. लवलीनाने तिला चारी मुंड्या चित केले. उपांत्य फेरीत मात्र लवलीनाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने ती निराश झाली मात्र हिंमत हरली नाही.

उपांत्य फेरीतील पराभवानंतरही देशासाठी पदक मिळवायचेक हा तिचा निश्चय ढळला नाही. कांस्य पदकाच्या लढतीत ती जीव तोडून खेळली आणि तिने देशासाठी पदक जिंकलेच. तिचा निश्चय पूर्ण झाला. तिने कांस्यपदक जिंकले आणि देशवासीयांना जल्लोष करण्याची एक संधी मिळाली. हारकर भी जितने वालों को बाजीगर कहते है! असा एका चित्रपटात डायलॉग आहे. लवलीनाचा बाबतीत हा डायलॉग तंतोतंत लागू पडला. उपांत्यफेरीत पराभूत होऊनही ती शेवटी जिंकलीच त्याअर्थी ती खरीखुरी बाजीगर ठरली. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पुन्हा तिच्या नशिबाने तिला दगा दिला. तिला दुखापतीने ग्रासले. दुखापतीमुळे तिचा फॉर्म हरपला तिला राष्ट्रकुल स्पर्धेत आणि मागील वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगीरी करता आली नाही. या दोन्ही महत्वाच्या स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयश आल्याने तिच्यावर अनेकांनी टीका केली. लवलीना संपली आता ती देशासाठी काही करू शकणार नाही अशी टीका तिच्यावर होऊ लागली. तिने मात्र या टिकेकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. पुन्हा मेहनत घेतली. रात्रीचा दिवस केला.

तासंतांस रिंगमध्ये घाम गाळला. अखेर तिला त्याचे फळ मिळाले. जागतिक स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आणि तिने देशासाठी सुवर्णपदक जिंकून या संधीचे सोने केले. आता तिचे लक्ष आगामी ऑलिम्पिकवर आहे. तिने आगामी ऑलिम्पिकमध्येही पदक मिळवले तर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळणारी ती तिसरी खेळाडू ठरेल याआधी अशी कामगीरी कुस्तीपटू सुशीलकुमार आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांनीच केली आहे. लवलीनाचा सध्याच्या फॉर्म पाहता ती नक्कीच आगामी ऑलिम्पिकमध्येही पदक मिळवेल यात शंका नाही त्यासाठी तिला शुभेच्छा आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here