Home चंद्रपूर सर्वधर्मीय सण आनंदात व शांततेत साजरे करा- जिल्हाधिकारी विनय गौडा

सर्वधर्मीय सण आनंदात व शांततेत साजरे करा- जिल्हाधिकारी विनय गौडा

45

🔹शांतता समितीच्या बैठकीत पोलिस प्रशासन व नागरिकांना सुचना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 28मार्च):- पुढील एक ते दीड महिन्यात सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात येत आहेत. सोबतच चंद्रपूर शहरात 27 मार्चपासून महाकाली यात्रेला प्रारंभ झाला असून बुधवारी काष्ठपुजन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच काळात रमजान महिनासुध्दा सुरू झाला आहे. पुढील काही दिवसात श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुडफ्रायडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद (ईद – उल – फित्र) हे सण साजरे होणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा शांततेसाठी ओळखला जातो. हीच ओळख कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सर्व सण आनंदात आणि शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालिवाल, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील उपस्थित होते.

समाजाच्या विकासासाठी शांततेची अत्यंत गरज आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपल्या गावाची, जिल्ह्याची तसेच राष्ट्राची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली तरच विकासाकडे वाटचाल होते. शांतता भंग करणे सोपे काम आहे मात्र ती कायम टिकवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांवर शांतता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. सर्व धर्मात शांततेचाच संदेश देण्यात आला आहे. सण, उत्सव पाहून काही समाजकंटक परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशांना वेळीच आळा घाला. कोणताही असामाजिक विषय मोठा होऊ देऊ नका. पोलिस प्रशासन, नागरीक आणि शांतता समितीच्या सदस्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून अशा विषयाला वेळीच निर्बंध घालावा.

डीजे पथक प्रमुखांची यादी पोलिसांनी त्वरीत मिळवावी. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना नियमांची जाणीव करून द्या. शहरातील जेटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक तसेच इतर ठिकाणीही वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घ्या. कोणतीही शहानिशा न करता आजकाल तरुणाई सोशल मिडीयावर व्यक्त होत असते. त्यामुळे नकारात्मक संदेश जाणार नाही, यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातूनच जनजागृती करावी. सण, उत्सव साजरे करतांना जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलिस अधिक्षक श्री. परदेशी म्हणाले, आपली परंपरा सर्वधर्मसमभावाची आहे. त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. कोणतीही समस्या उद्भवली तर त्यातून मार्ग निघतो, यावर चंद्रपूरकरांचा विश्वास आहे. मिरवणुकीदरम्यान मुख्य रस्ते, मशीद आदींसमोर पार्किंगची समस्या निर्माण होणार नाही, याबाबत पोलिसांनी दक्ष राहावे. डीजे वाजविणा-यांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पथक प्रमुखांना सुचना द्या. जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणेने एकमेकांच्या संपर्कात राहावे. होणीही नॉट रिचेबल राहता कामा नये. सोशल मिडीयावर येणाच्या पोस्टची शहानिशा झाल्याशिवाय नागरिकांनी व्यक्त होऊ नये, अशा सुचना त्यांनी दिल्या.

शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण असावे. अफवा पसरू नये, याबाबत योग्य नियोजन करावे. परीक्षा कालावधी असल्याने डीजेचा आवाज कमी किंवा बंद ठेवावा. समाजकंटकाचा बंदोबस्त करावा. सोशल मिडीयावर सामाजिक सलोखा बिघडविणा-या किंवा धार्मिक भावना भडकविणा-या पोस्टवर कडक कारवाई करावी. मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होणार नाही किंवा पार्किंगच्या समस्याबाबत योग्य नियोजन करावे. तरुणाईला प्रत्येक कुटुंबाने समज द्यावी. बॅनरबाजीमुळे तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. मद्यप्राशन किंवा धिंगाणा करणा-यांवर कडक कारवाई करावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस उपअधिक्षक शेखर पाटील यांनी केले. संचालन श्री. आवळे यांनी तर आभार विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांनी मानले. बैठकीला पोलिस उपअधिक्षक (गृह), यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here