Home Education ऑलिंपिकला जाण्यास राहाते घर गहाण!

ऑलिंपिकला जाण्यास राहाते घर गहाण!

185

(कुस्तीगीर खाशाबा जाधव जयंती विशेष)

भारत सरकारतर्फे सन २०१०मध्ये आदरयुक्त भावनेने दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला खाशाबा जाधव हे नाव देण्यात आले. सन २००१मध्ये त्यांना अतिशय प्रसिद्ध असा अर्जुन ॲवाॅर्ड दिला गेला. ख्यातनाम कुस्तीगीरबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त हा अलककार- श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींचा प्रेरक लेख…

कुस्तीगीर खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी भारतीय होते. इ.स.१९५२ साली ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक होते. हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक ठरले. कुस्तीगीर खाशाबा जाधवांनी इ.स.१९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. त्यांनी इ.स.१९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले. खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. त्यांचे वडीलच कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्यांना त्यांच्या वयाच्या ५व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. खाशाबा हे ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे सर्वात लहान म्हणजे ५ क्रमांकाचे पुत्र होते. त्यांनी ८ वर्षाचे असताना त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला २ मिनिटांत लोळवले होते. महाविद्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते. शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही.

ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. सन १९००मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्व्हर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हे एकमेव ऑलिंपिक पदक विजेते असे होते, की त्यांना भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. ते स्वतःच्या हिमतीवर तयार झाले. त्यांची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्यांना १९४८च्या ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी मार्गदर्शन केले. त्यांनी सन १९४०-४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. उर्वरित जीवन त्यांनी कुस्तीकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले. लहानपणापासून त्यांना कुस्तीचे भारी वेड होते. खाशाबांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. त्यांनी ऑलिंपिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा फडकविण्याचाही निश्चय केला होता.

सन १९४८मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते ६व्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा ६वा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही. पुढील सन १९५२ सालच्या हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी जरी ते बाॅटमवेट-५७ किलोग्रॅम गटात गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली.

ऑलिंपिक कार्यकारी मंडळातील सुंदोपसुंदीमुळे पुढील १९५२च्या ऑलिंपिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला गेला. त्यामुळे ऑलिंपिकसाठी निवड झाली नाही. या वेळी ते शांत बसले नाहीत तर याचा खुलासा घेणेसाठी त्यांनी पतियाळाच्या महाराजांकडे न्याय मिळण्यासाठी विनंती केली. पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्या विरोधी कुस्तीगीराशी त्यांनी पुन्हा त्याची ट्रायल घेतली. या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगीराला चितपट केले व त्यांची ऑलिंपिकसाठी निवड झाली होती. हेलसिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत! कुटुंबाची पळापळ सुरू झाली. गावात लोकवर्गणी जमा झाली. खाशाबा कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिंपिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेऊन त्याला रु.सात हजार दिले. त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचेकडे निधीसाठी गळ घातली पण त्यांनी फक्त रु.चार हजार दिले.

गादीवरील कुस्तीत पाय घसरतात. खेळताना दोन चुका झाल्या, त्यामुळे गोल्ड मेडल हुकले. ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले. त्या गटात विविध देशांचे २४ स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनलपर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी खाशाबांना ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले, पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले. कराड तालुक्यातील गोळेश्वर हे लहानसे गाव. कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबाचे स्वागतासाठी त्या परिसरातील सजविलेल्या १५१ बैलगाड्या, हजारो लोक, ढोल तासे, लेझीम पताका, फटाके आदी घेऊन हजर होते. गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता. हे अंतर पायी चालावयाचे झाले तरी १५ मिनिटांचे आहे, पण हेच अंतर पार करण्यासाठी विनातक्रार सात तास लागले. हा प्रकार मी पूर्वीही आणि त्यानंतरही कधी पाहिला नाही, असे खाशाबांचे बंधू संपतराव जाधव म्हणाले. एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वर गाव भारताचे नकाशावर ठळकपणे दिसू लागले. भारत देशाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या गोळेश्वर गावाची जगभर प्रसिद्धी झाली. भारताच्या हॉकी टीमनेही गोल्ड मेडल पटकावले होते, पण खाशाबांचे विशेष कौतुक झाले. कोल्हापूर मधील सर्व तालीम आखाड्यानी तसेच महाविद्यालयांनी भरभरून कौतुक केले.

खाशाबांनी कोल्हापूरमध्ये स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले. त्यात स्वतःही भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या. त्यात जी कमाई झाली, ती त्यांचेवर स्वतःचे घर गहाण ठेवून मदत करणारे आणि वरदहस्त ठेवणारे महाविद्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर त्यांना परत मिळण्यासाठी पैसे दिले.

सन १९५५मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात सब-इन्स्पेक्टर या हुद्दयावर भरती झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्‌स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून निवृत्त झाले. पेन्शनसाठी त्यांना खुप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्‌स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचे उरलेले जीवन गरिबीत गेले. खाशाबा जाधव यांचा दि.१४ ऑगस्ट १९८४ रोजी एका रस्ता अपघातात दुर्दैवी अंत झाला.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे महान कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

✒️अलककार:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.मु. पो. ता. जि. गडचिरोली,मो. नं. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here