Home Education काका, तुम्ही जगावे आमच्यासाठी !

काका, तुम्ही जगावे आमच्यासाठी !

117

शिक्षण झाले.नोकरी लागली.खेड्यातून शहरात गेलो.तेथे सुखाची लयलूट असते.कोणालाही कोणतेही सुख निर्लज्जपणे घेता येते.कोणीच कोणाला अढवत नाही.राखी,उर्फीसारखे मोकाट जगता येते.म्हणून शहरांचे आकर्षण वाढलेले आहे.ग्रामीण लोकांना खुणावत आहे.महिलांना जास्त.नोकरीवाला आणि शहरात राहाणारा असेल तरच नवरा म्हणून स्वीकारू.नाहीतर माझे एकटीचे झकास चाललेले आहे.

नोकरी लागली.खुर्चीवर बसून प्रत्येक येणाऱ्या आगंतुकाला गिऱ्हाईक समजून पाहिले.पैसे देत असेल तर अर्ज काढतो.साहेबापुढे ठेवतो.माझे वेगळे आणि साहेबाचे वेगळे पडतील.याच धोरणाने चिक्कार पैसा कमवला.आधी बंगला.नंतर गाडी.मग काय,आता स्वर्गातच.हिच गाडी आणि महागडी साडी नेसून खेड्यात नेले कि ,बाया माणसांचे डोळे फाटतात.तरूण कुजबुजतात.दाबून माल कमवतो हा.आपली भी अशी लॉटरी लागली कि आपण भी अशीच महागडी साडी आणि गाडी घेऊन फिरू.

कलेक्टर असो कि कारकून.अगदी सिपाई सुद्धा पगारापेक्षा जास्त कमवून घेतो.पोलिस,तलाठी,टिसी तर जेथे उभा राहिल तेथे गंगा स्नान करतो.या तिर्थ स्वरूप यात्रेत बायको पोरांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.आधी बायको कटकट करायची.पण म्हटले,हा घे तुझा पाकीटमनी आणि ही स्कूटी.पण माझ्या मागे दाती नको.पोरं मोठी झाल्यावर त्यांचे वेगळेच इंटरनेट कनेक्शन सुरू झाले.त्याचेही दरमहा मानधन देऊन मोकळा झालो.आता मी केंव्हाही जायला यायला मोकळा.रात्री घरी नाही आलो तरी नो प्रॉब्लेम.

मुलगी मोठी झाली.थाटामाटात लग्न लावून दिले.सर्वच मोठे मोठे साहेब,आणि पुढारी, मंत्री बोलवले. दाऊद ,मल्या भारतात असते तर त्यांनाही लग्नात बोलवले असते. आधी कोणीच केले नाही,अशी धुम उडवली. सगळे साहेब आणि मंत्री जाम खुष झाले.जातांना म्हणाले,काही मदत लागली तर सांगा, आम्ही वरून काम करून आणू.म्हटले,हो साहेब!तुमचा आशीर्वाद असू द्या.वधूवरांना नको,मला आशिर्वाद पाहिजे.म्हणून तर एकदा अण्टीकरप्शनने ट्रॅप केले तरी सही सलामत सुटलो.आता थोडी प्रीकॉशन जास्त घेतो.पण ट्रॅप होऊन पेपरात नांव आल्याने लोकांना कळले कि आपुणभी कामाचे माणूस आहे.ट्रॅप झाल्यानंतर तर वरकमाई जास्त होऊ लागली.जेलमे गया तो गया लेकिन अखबारमे नाम तो आया.बदनामी हुई तो हुई मगर कमाई तो हुई.आता मस्तपैकी कोकणात राऊत आणि परब च्या शेजारी रिसॉर्ट बनवून लाईफ एन्जॉय करू.

रिटायर झालो.स्टॉफ ने जंगी सत्कार केला.म्हणे , भाऊसाहेब होते तोपर्यंत कशाचीच कमी पडू दिली नाही.आता ही जबाबदारी आमची आहे.आम्ही तुमची धुरा समर्थपणे सांभाळू.असे कौतुकाने म्हणाले.गळ्यात क्विंटल हार.गुलालाने तोंड माखले.गाडी,डीजे वाजतगाजत घरी आणले.चीनचा पराभव करून आल्यासारखे वाटले.

दोन चार महिने घरचे वातावरण आनंदात होते.नंतर हिशोब सुरू झाले.मुलगा म्हणतो ,मी आता फॉरेनलाच राहिन.मुलगी म्हणते मी आता बंगलोरलाच राहिन.येथील सर्व विकून टाका.तुम्हाला जेथे योग्य वाटेल तेथे राहा.बायकोने दुजोरा दिला.येथले विकून टाकून पोरांना दिले.माझ्यासाठी फक्त पेन्शन आणि बायको उरली.पोरांना आता बिझी शेड्युल मधे वेळ नाही.ते म्हणतात,तेथेच राहा.काही लागले तर कळवा , आम्ही पे टीएम करून देऊ.नंतर ते ही बंद झाले.आता साथीला बायको, हाताशी पेन्शन आणि डोक्यावर छत इतकेच उरले.आता माझ्याकडे कोणताही नातू किंवा नातेवाईक फिरकत नाही.मी मॉर्निंग वाक ला जातो,इतकेच हिरणे फिरणे.बायको भाजीपाला घ्यायला जाते.इतकाच काय तो संचार.पैसा कमवला पण माणसे दूर गेलीत.

घरात बसून बसून कंटाळा आला.आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या व काळे डाग सांगतात कि,आता एकमेकांचे चेहरे सुद्धा पाहाण्यासारखे राहिले नाहीत.माझा बराच वेळ पिण्यात जातो.तिचा वेळ पोथीत जातो.तरीही मन स्वस्थ बसत नाही.खरे सांगू! रिटायरमेंट नंतर तर जगण्याची इच्छाच उरली नाही.पैशांच्या नद्या नाले आटले.पोरांचे प्रेम आटले.असा हा सुकसुकाट खायला उठतो.

कालच, शिवराम पाटील यांचा व्हिडिओ पाहिला.हा माणूस ६५वर्षाचा.पांढरे केस.आणि रस्त्यावर उभा राहून फाडफाड बोलतो.जसा सीमेवर गोळ्या झाडतो.आमदार, खासदार मंत्री संत्री कोणाचीही तमा बाळगत नाही.एकटा येतो आणि गर्दी जमवतो.प्रत्येक बाईला,माणसाला ,पोराला,मजुराला वाटते कि,या माणसाशी बोलावे. मला हेवा वाटला.म्हणून मला वाटले कि, आपणभी या माणसाला भेटावे.विचारावे.

“का हो! तुम्ही कोणत्या शाळेत शिकले हे? तुम्हाला भीती नाही वाटत का,कि कोणी उडवून देईल?”
तर मला उत्तर मिळाले.

“वयाच्या पन्नास नंतर मी अर्थाजन करणे बंद केले.स्टेशन मास्टर ची नोकरीचा राजीनामा देऊन आण्णा हजारेंच्या आंदोलनात शिरलो.समाजसेवा व राजकारण.बस्स! लोकांना माझी गरज असेल तोपर्यंत जिवंत ठेवतील.जेंव्हा अडचण वाटेल तेंव्हा गोळ्या घालून मारतील.मी लोकांच्या गरजेचा माणूस आहे का?यावर हे अवलंबून आहे.तुम्ही पण लोकांची गरज बनले तर मरायचा, आत्महत्येचा विचार डोक्यात येणार नाही.नातू, नातेवाईक सोडून गेले तरी एकटेपण वाटणार नाही.मी जेवण कमी करतो.पण लोकांचे प्रेम जास्त पितो.दोन पोळ्या खाऊन जितके बळ येत नाही, त्यापेक्षा जास्त लोकांच्या नमस्काराने येते.रस्त्यावर निघालो कि,रीक्षावाला, भाजीपाला,लॉरीवाला ,केळीवाला, डॉक्टर, इंजिनिअर, वकील,शिक्षक,बेपारी जेंव्हा हात वर करतो,तो नमस्कार नाही, मला आशिर्वाद देतो.”काका, तुम्ही जगावे आमच्या साठी.”

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here