Home Education फुले दांपत्य सन्मान: वाढे व्यसन समप्रमाण!

फुले दांपत्य सन्मान: वाढे व्यसन समप्रमाण!

78

[नुतनवर्ष, विश्व धुम्रपानविरोधी दिन व म.फुले दांपत्य सन्मान दिवस]

तंबाखूचे खैनी, चैनी, गट्टू, गुटका, गुडाकू, जर्दा, तईबूर, स्नफ इत्यादीच्या रूपात सेवन होते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याने इतरांना फारसा त्रास होत नाही. मात्र, सिगारेट, विडी, सिगार, पाईप्स, हुक्का, चिलीम, हुकलीस, चुट्टा, चिरुट इत्यादीने परिसरातील इतर व्यक्तींना त्रास होतो. शरीरात धुराने प्रवेश केल्याने न ओढणारेही अप्रत्यक्षपणे धूम्रपानाचे बळी ठरतात. यामुळेच नववर्षाच्या आरंभी धुम्रपानास विरोध हा झालाच पाहिजे. म.फुले दांपत्यांनी दिलेले शिक्षण सुसंस्कारमय होते, हे त्यातून दिसेल आणि हाच त्यांचा मोठा सन्मान ठरेल. श्री कृष्णकुमार जी.निकोडे गुरूजींचा हा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख… संपादक.

संपूर्ण जगावर इंग्रजीचे सर्वाधिक प्राबल्य आहे. त्यामुळे साहजिकच १ जानेवारी हा दिवस नववर्षारंभ म्हणून धुमधडाक्यात त्याचे स्वागत होत आहे. महाराष्ट्रात म.फुले सन्मान दिन साजरा करण्यात येतो. कारण याच दिवशी कामगार बंधूंनी त्यांना महात्मा ही पदवी देऊन गौरविले होते. म्हणून तो दिवस उजाडण्याची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा केली जाते. त्याबरोबरच याच नुतनवर्ष आरंभदिनी पार्टी करून नव्या वर्षाच्या तोंडावर पान खाऊन कसे थुंकता येईल? याचे मनसुबे रचले जातात. तशी मनोमन अपेक्षा बाळगली जाते. त्यामुळे वर्षारंभ लक्षात घेऊन जागतिक धुम्रपानविरोधी दिन पाळण्यात यावा, असेही ठरविले गेले. मात्र याकडे कानाडोळा केला जातो. संकल्प तर भरमसाठ आणि अशक्यप्राय केले जातात. डोंगर, चंद्र, मंगळ, समुद्र, आकाशात बंगला बांधेन, अमुक धरेन, तमुक सोडेन. मात्र धुम्रपान विरोधावर ब्र शब्दही उच्चारणार नाही. म.फुले दांपत्याने बहुजनांसाठी याच दिवशी शाळा उघडली. म्हणून महाराष्ट्रात हाच दिवस म.फुले दांपत्य सन्मानदिन साजरा केला जातो. एकीकडे सुशिक्षितांची संख्या वाढली. त्याच्या समप्रमाणात वाईट व्यसनांधांची संख्याही फोफावली. हेच धुम्रपान- व्यसनांचे व्यस्तप्रमाण असावयास हवे होते. शिक्षणामुळे मती प्रकाशली, गुलामगिरी उधळून लावली व नवे-जुने कळू लागले. पण व्यसने- धुम्रपानाचे प्रमाण का वळू शकत नाही? स्वतःसह प्रियजनांच्या व इतरांच्याही आरोग्याचे वाभाडे निघाले. कसे का? याचे आत्मपरीक्षण व आत्मचिंतन होणे अत्यंत गरजेचे आहे.

सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना, कामाच्या ठिकाणी आणि घरातील सदस्यांजवळ धूम्रपान केल्यास त्याच्यातील विषारी रासायनिक घटकांमुळे कर्करोग होण्याचा संभव अधिक असतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तंबाखू सेवनामुळे हृदय विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, गुंतागुंतीचे फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग, स्ट्रोक, श्वसन संस्थांचे आजार होतात. यापैकी ४० टक्के आजार हे धूम्रपानाशी संबंधित आहेत. महिलांच्या धूम्रपानामुळे वेगवेगळी गुंतागुंत निर्माण होते. गर्भधारणेशी संबंधित गुंतागूंत, अपुर्‍या दिवसांची प्रसूती, कमी वजनाच्या बाळाचा जन्म इत्यादी. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम माहिती असतानाही आजही भारतात २४.३ टक्के भारतीय पुरुष आणि २.९ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत आहेत. केरळमधील काही गावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत लहान मुलांद्वारे तंबाखू देऊन केले जाते. भारतातील काही विशिष्ट भागातील कुटुंबातील लग्न समारंभात पाहुण्यांना तंबाखू देऊन सन्मान करण्याची प्रथा आहे. मिझोरमच्या ग्रामीण भागात स्वागत करण्याची ताइबूर ही प्रथा तंबाखू देऊनच साजरी केली जाते.

तंबाखू सेवनाने तोंडाचा कर्करोग होण्याच्या दाट शक्यतेसह इतर आजारही बळावत आहेत. याबाबत जनजागृती होत असतानाही देशात २४.३ टक्के पुरुष आणि २.९ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत आहेत. दरवर्षी १ जानेवारी हा जागतिक धूम्रपान विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय माणसाच्या जगण्याशी आणि संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही. तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे आाढळून आले आहे. तंबाखूमध्ये जवळपास चार हजार रसायने आढळतात. त्यात कमीत कमी २०० विषारी घटक आहेत. जे निकोटीन, कार्बन मोनोक्साईड, टार, अर्सेनिक, फॉर्मल्डिहाईड इत्यादींचा विषारी घटकांमध्ये समावेश होतो. तंबाखू खाण्यास वा धुम्रपानाची सवय जडण्यास कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींचादेखील परिणाम होतो. याशिवाय समवयस्कांचा प्रभाव, प्रयोग करून पाहणे, मतांचा प्रभाव, उत्सुकता, फिल्मी कलाकारांचे अवलोकन व नक्कल, चित्रपटातील मॉडेल्स, जाहिरातींचा प्रभाव, स्वत:चे मन शांत करण्यास, जल्लोस व आनंदोत्सव साजरा करण्यास, जागरुक राहण्यास, ताजेतवाने वाटण्यास, धाडस वाढवण्यास, कामाची क्षमता वाढवण्यास, विरंगुळा, टाइमपास आणि मानसिक आरोग्यासाठी तसेच निष्काळजी प्रवृत्ती असल्यास तंबाखूचे सेवन किंवा धुम्रपान केले जाते.

भारतात १० पैकी सात स्मोकर्सना धूम्रपान धोकादायक आहे, याची जाणीव असते. ५३ टक्के लोक धूम्रपान सोडण्यास असमर्थ आहेत, अशी फाऊंडेशन फॉर अ स्मोक-फ्री वर्ल्डने प्रसारित केलेल्या माहितीतून हे सत्य उघड झाले आहे. भारतात दर दिवशी १०४ दशलक्षाहून अधिक लोक तंबाखू सेवनामुळे आपल्या आरोग्याशी खेळत असतात. देशात रस्त्यारस्त्यांवर हाताने वळलेल्या विड्या क्षुल्लक किमतीत उपलब्ध असतात. या प्रकारामुळे भारतात मोठ्या प्रमाणात तंबाखू सेवन चालते. हा पारंपरिक सिगरेट प्रकार भरपूर लोकप्रिय असून त्यांच्यावर कराचा भार नाही. त्यामुळे भारतासारख्या देशात इतर देशांच्या तुलनेत तंबाखू नियंत्रणाचे निराळे पर्याय राबवून तंबाखू विरामाला चालना देऊन धोके कमी केले पाहिजेत. आपण म.फुले दांपत्य सन्मान दिनाचे स्मरण ठेवून नववर्षारंभी विश्व धुम्रपान विरोध केले, तर मोठ्या कौतुकास पात्र ठरू शकतो

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे सर्वांत सुमती निर्माण होणेस्तव नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️अलककार- श्री कृष्णकुमार जी. निकोडे गुरूजी(मराठी व हिंदी साहित्यकार)मु. पो. ता. जि. गडचिरोली,फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here