Home गडचिरोली भुताने पछाडलेल्या घराचे किरकोळ भाडेदाते भाडेकरू!

भुताने पछाडलेल्या घराचे किरकोळ भाडेदाते भाडेकरू!

187

(भारतीय योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार जयंती विशेष)

भारतीय योगशैलीने आता सबंध विश्व व्यापले आहे. योगदिनाच्या निमित्ताने त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. निरनिराळ्या क्षेत्रांतील सेलिब्रेटींच्या योगातील सहभागामुळे त्याला प्रचंड वलयही प्राप्त झाले आहे. परंतु ज्यांनी योगशिक्षणाच्या प्रसारासाठी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले, त्या योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांचे मात्र विस्मरण होतंय. योगाला आज प्राप्त झालेले हे महत्व पाहता ते आठवायला हवे होते. कारण जगाच्या सर्वांगीण घडणीत त्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांची उपयुक्त माहिती श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजी यांच्या शब्दांत… संपादक.

योगमहर्षी बी.के.एस. तथा बेल्लूर कृष्णम्माचार सुंदरराज अय्यंगार यांचा जन्म दि.१४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकातील बेल्लूर, जिल्हा कोलार येथे झाला. हा पहिल्या महायुद्धाचा काळ होता. तशात देशभर इंफ्ल्यूएन्झाची भयानक साथ आलेली होती. त्यांच्या वडिलांना बालपणी त्याची लागण झाली. त्याकाळी हा रोग महाभयंकर समजला जाई. तशात त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. ते या अय्यंगार कुटुंबातील नववे अपत्य होते. त्यांचे कुटुंब एकंदर अकरा मुलांचे होते. वडिल शालेय शिक्षक होते. त्यावरून घरातील आर्थिक परिस्थिती काय असेल, याची सहज कल्पना येईल. त्यात भरीस भर म्हणजे त्यांना क्षयाची बाधा झाली. त्याकाळी हे दोन्ही आजार राक्षसीच होते. तेव्हा त्यावर औषधोपचार जणू नसल्यातच जमा होते. घरची परिस्थिती आणि साथीचे आजारपण यामुळे त्यावेळी १३-१४ वर्षांचे असलेले योगाचार्य अशक्तपणा, कुपोषणासह औषधोपचारांचा अभाव यामुळे निराशेच्या खोल गर्तेत गेले नसते तरच नवल. त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे थोरले मेव्हणे एकदा त्यांच्या घरी आले.

त्यांनी या अशक्त व रोगग्रस्तास पाहिले आणि ते म्हणाले, “अरे सुंद्रा- सुंदरराज, तू माझ्याबरोबर म्हैसूरला चल.’’ त्यांचे नावही कृष्णम्माचारी होते. ते योगोपचार करीत आणि योग शिकवीत. त्यांना आपल्या घरी नेण्यामागे त्यांचा हेतू हा होता, की याला घेऊन जाऊन थोडेफार जुजबी उपचार करावे आणि त्याच्याकडून मुख्यत: घरगडी म्हणून कामे करवून घ्यावीत. ते त्यांच्यासोबत म्हैसूरला गेले व थोरल्या बहिणीकडे राहू लागले. कर्मधर्मसंयोगाने हा कालावधी केवळ सहा-आठ महिन्यांचाच होता. नंतर मेव्हण्यांनी त्यांना धारवाडच्या दौऱ्यावर नेले. त्याकाळचे पुण्याचे सिव्हिल सर्जन व्ही.बी.गोखले हे कृष्णम्माचारींच्या धारवाडच्या या योगवर्गासाठी आले होते. गोखल्यांनी त्यांच्याकडे एका योगशिक्षकाची मागणी केली. सुंदरराजला तेव्हा जुजबी इंग्रजी येत असल्याने त्यांनी गोखल्यांच्या विनंतीनुसार पुण्यास पाठविले.

इ.स.१९३८साली पुण्यातले घरभाडे योगप्रशिक्षकांना परवडणारे नव्हते. पुणे कॅम्प परिसरात एका भुताने पछाडलेल्या घरात भाडेकरू मिळत नसल्याने ते त्यांना किरकोळ भाड्याने मिळाले. लग्नाआधी अनेक वेळा पूर्ण दिवस त्यांना कॉफी व पाण्यावर काढावा लागले. सन१९४२ साली जेव्हा त्यांनी संसार थाटला, तेव्हा तर मेहनतीला मर्यादाच उरली नव्हती. पण तरीही त्यांनी योगविद्येचा सराव सोडला नाही. शरीराला वेदना व थकवा जाणवत होता. अशा वेळी आपल्या मुलांकडून ते हात, पाय, कंबर आदी दाबून घेत असत. सन १९५१ ते १९६६ सालापर्यंत योगविद्या शिकविण्यास निरनिराळ्या ठिकाणच्या दौऱ्यांमध्ये जेवणाचे अतिशय हाल होत असत. त्या महिना-दोन महिन्यात त्यांचे वजन १५ ते २० पौंड कमी झालेले असे. पुण्यात योगविद्या शिकवायची म्हटल्यावर त्यांनी स्वत:चीच शागिर्दी पत्करली. स्वयं योगशिक्षण, त्यासंबंधीचे स्वतंत्र प्रयोग व शिकविणे सुरू झाले. योगाद्वारे त्यांनी स्वत:च स्वत:वर उपचार करून रोगांना पिटाळून लावले होते.

योगाचे लोकाभिमुख आणि लोकोपयोगी अंग विकसित करून त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवहार्य योग शिकविला. रोगोपचार, आरोग्य आणि स्वास्थ्य लोकांपर्यंत पोहोचविणे हा हेतू त्यामागे होता. हे काम व्यापक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी योगाच्या प्रचार-प्रसारार्थ अनेक विद्यार्थी जगभर घडवले. त्यातून योगविद्या जगभर झपाट्याने पसरली. त्यांचा प्रथम ग्रंथ ‘योगदीपिका’ हा याकामी मोलाचा दुवा ठरला. त्यांनी दुसरी वाहिनी हाताळली ती अशी- त्यांनी योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेवर अभूतपूर्व प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या पुस्तकांतील छायाचित्रांतून याची प्रचीती येते. त्यांनी योगासने कलेच्या अंगाने पेश केली. त्यांची योग-प्रात्यक्षिके म्हणजे एक अत्युच्च कलाविष्कार असे. त्यांना योगातील मायकेल अ‍ॅन्जेलो अशी ख्याती युरोपात प्राप्त झाली होती. एखादा कवी काव्य करतो किंवा गायक बंदिशी बसवतो व पेश करतो तसे ते आसन संचलन करून लोकांना एका अनोख्या कलाविष्काराचा आनंद देत असत. त्यांच्या अप्रतिम योग-कलाविष्काराच्या अनेक ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. तिसरी वाहिनी म्हणजे ते स्वत: जी योगसाधना करत ती एक तत्त्वसाधना होती. ती निरपेक्ष, निर्हेतुक असे. योग-तत्त्वज्ञान जगणे व श्वासणे हा त्यामागे उद्देश असे. पतंजली योगसूत्रांच्या कोंदणात त्यांची ही साधना बसविलेली होती.

ते म्हणत, “आपण स्वत:मध्ये काय करतो ते जाणा. स्वत:लाच प्रश्नोत्तरे करा. हे शिकवता येत नाही, पण शिकता येते. हा दिव्य अनुभव दाखवता वा पाहता येत नाही. त्याचा केवळ बोधच होऊ शकतो. मी जेव्हा योगसाधना शिकवतो तेव्हा वैज्ञानिक असतो. जेव्हा ती पेश करतो तेव्हा कलाकार असतो. पण स्वत: जेव्हा ही साधना करतो तेव्हा तिचा मी एक निरपेक्ष उपासक असतो, पूजक असतो, अनुष्ठाता असतो. ते अनुष्ठान असते.” अशा प्रकारे त्यांची योगप्रणाली त्रिमुखी होती. त्यांचे जगभरातील विद्यार्थी हा त्रिमुखी योग होय.

योगा प्रशिक्षक अय्यंगार यांच्या मागचे दुर्भिक्ष्य संपले ते सन १९४३-४४ सालानंतरच. तोपर्यंत त्यांनी पुण्यात स्थिरस्थावर होत आपल्या योगविद्येच्या आधारावर जम बसवला होता. त्यांची आर्थिक विवंचनाही काहीशी कमी झाली होती. वयाच्या पस्तिशीनंतर तर आर्थिक संपन्नताही आली. योगासने-प्राणायामाने त्यांना केवळ स्वास्थ्य व आरोग्यच प्राप्त झाले नाही, तर दहा माणसांचे बळ, सामर्थ्य आणि उत्साह त्यांच्यात संचारले होते. त्यानंतर ६० वर्ष्यांत त्यांनी इतके प्रचंड कार्य केले की सामान्य माणूस तीन-चार जन्मांतही तितके कार्य करू शकले नसते. या वाटचालीत जगभरात जवळपास १२५ ते १५० अय्यंगार योग संस्था सुरू केल्या. हा सगळा विश्वव्यापी पसारा त्यांनी लीलया सांभाळला होता. सुमारे दहा लाख जणांना त्यांनी योगदीक्षा दिली. परोक्ष-अपरोक्ष ६०-७० लाख विद्यार्थी घडवले. जागतिक स्तरावर योगशिक्षणाचे संपूर्णपणे एकहाती व्यवस्थापन करून त्यांनी चमत्कारच घडवला होता. ५५-५६व्या वर्षी त्यांच्या शारीरिक क्षमतेबद्दल युरोपातील डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त कले. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्याही केल्या. त्यांची फुफ्फुस क्षमता १८-२० वर्षांच्या अ‍ॅथलीटला लाजवील अशी होती. पूर्वायुष्यात त्यांना फुफ्फुसांचा क्षय झाला होता.

हे आपल्याला अविश्वसनीय वाटत असल्याचे या डॉक्टरांनी कबूल केले. त्यांच्या बाबतीत दुसरी अविश्वसनीय वाटावी अशी गोष्ट म्हणजे मृत्यूच्या वेळेखेरीज ते कधीही हॉस्पिटलची पायरी चढले नव्हते. अनेकांना वाटे की त्यांना ही शरीरसंपदा, स्वास्थ्य, आरोग्य आणि सामर्थ्य हे योगासने व प्राणायामाने प्राप्त झाले होते. मात्र याबाबतीत ते म्हणत असत, “योगासने-प्राणायामाचे स्वास्थ्य व आरोग्य हे अवांतर फळ असते. योगसाधना ही आरोग्यासाठी नसते, तर त्यातून जीवनामृत मिळते. जे ज्ञान-विज्ञानस्वरूप आणि आत्मानंद स्वरूप असते. या सगळ्या गोष्टींचे फलित म्हणजे स्वास्थ्य, आरोग्य, बल व सामर्थ्य होय. या बाह्य रंगाला भुलून जायचे नसते. योगाचे प्रधान फळ म्हणजे आध्यात्मिक बल होय!”

अय्यंगार गुरुजींचा भारी पगडा संपूर्ण समाजावर होता. बालक-किशोरांपासून सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांतील लोक, आस्तिक-नास्तिक, बुद्धिवादी-भाववादी अशा सगळ्यांना भावेल, रुचेल, पचेल अशा प्रकारे ते योगविद्या शिकवीत. ते अष्टपैलू योग मार्गदर्शक होते आणि त्यातील प्रत्येक पैलूमध्ये ते एकमेवाद्वितीय होते. त्यांचे विद्यार्थी त्यांना हार्ड टास्क मास्टर म्हणून ओळखत. पण ते तेवढेच आणि तसेच नव्हते. येहुदी मेनुहिनसारख्या कलाकाराला ते अत्यंत हळुवारपणे शिकवीत. अशा योगविद्या प्रशिक्षकांनी दि.२० ऑगस्ट २०१४ रोजी आपला देह ठेवला.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे जयंतीनिमित्त त्यांना शतकोटी विनम्र अभिवादन !!

✒️संत चरणरज:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.द्वारा- प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, फक्त व्हॉ.नं.९४२३७१४८८३.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here