Home Education महाराष्ट्र वाल्मीकी गदिमा

महाराष्ट्र वाल्मीकी गदिमा

94

मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार, पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर उर्फ ग. दि. मा यांची आज पुण्यतिथी. १ ऑक्टोबर १९१९ रोजी जन्मलेल्या गदिमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गदिमा यांना लहानपणापासून लेखनाची आवड होती. जेष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्याकडे त्यांनी काहीकाळ लेखनिक म्हणून काम केले त्याचा त्यांना खूप फायदा झाला. वि स खांडेकर यांचे सर्व पुस्तके त्यांनी वाचून काढले. वि. स. खांडेकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनीही लिहिण्यास सुरवात केली. त्यांनी कथा आणि कविता यांचे विपुल लेखन केले. के. नारायण काळे यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काही काळ काम केले.

भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले. लोकशाहीर रामजोशी या गाजलेल्या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली इतकेच नव्हे तर या चित्रपटाची कथा आणि संवादही त्यांनीच लिहिले. हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाल्याने कवी आणि लेखक म्हणून त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा आणि गाणी लिहिली. त्यांच्या चित्रपटाच्या कथा वैविध्यपूर्ण होत्या. संवादही सोपे पण प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे होते. त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटासाठी कथालेखन केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेले गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहित आहे, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही चित्रकथा ही मराठी चित्रकथा या नावाने प्रकाशित झाल्या आहेत. गदिमांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, परंतु प्रभावी गीतांतून येते.

त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार दिसून येते. त्यांनी लोकगीते, समरगीते आणि बालगीतेही लिहिली. त्यांच्या गीतरामायणाने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. गीतरामायणाच्या कार्यक्रमाचे हजारो कार्यक्रम झाले अजूनही होत आहेत. गीतरामायण ऐकले नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. लोकांना गीतरामायण इतके आवडले की लोकांनी त्यांना महाराष्ट्र वाल्मिकी ही पदवी दिली. ते कवी, लेखक तर होतेच पण उत्तम अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. गदिमांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या कथेवर आधारित २५ हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली. दो आँखे बाराह हाथ, नवरंग, गुंज उठी शहनाई, तुफान और दिया, आदमी सडक का या गाजलेल्या हिंदी चित्रपटांची पटकथा त्यांनीच लिहिली. गुरुदत्त यांचा प्यासा, राजेश खन्ना यांचा अवतार, अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी यांचा ब्लॅक या चित्रपटांच्या मूळ कथाही गदिमा यांच्याच. चार दशकांहुन अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य केलेल्या गदिमांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सरकारने गौरव केला.

१९७३ साली यवतमाळ येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचेही ते सदस्य होते. १४ डिसेंबर १९७७ रोजी गदिमांचे निधन झाले. गदिमांसारखी बहुमुखी प्रतिमा असलेले रत्न मराठी मातीत जन्माला आले हे महाराष्ट्राचे भाग्यच. आपल्या बहुमुखी प्रतिमेने मराठी साहित्याची त्यांनी जी सेवा केली त्यासाठी मराठी माणूस कायम त्यांचा ऋणी राहील. बहुमुखी प्रतिमा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गदिमांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here