Home महाराष्ट्र दहीवद आश्रमशाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैचारिक प्रबोधन…

दहीवद आश्रमशाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैचारिक प्रबोधन…

0

🔸बाबासाहेबांच्या रक्ताचे नाही तर विचारांचे वारसदार बना — लक्ष्मणराव पाटील

✒️अमळनेर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमळनेर(दि.6डिसेंबर):- तालुक्यातील दहीवद येथील शासकीय आश्रमशाळेत जनसाहस फौंडेशन व आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महापरिनिर्वाण दिनाचे’ औचित्य साधून वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सर्वप्रथम प्रज्ञासूर्य, महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतातून जनसाहस फौंडेशन चे जिल्हा समन्वयक निलेश शिंदे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. ऊस तोडणी कामगार, स्थलांतरित कामगार व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी जनसाहस फौंडेशन देशातील १३ राज्यात काम करत आहे. आदिवासी भागातील कामगारांची पिळवणूक टाळण्यासाठी जळगांव जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, चोपडा, पारोळा या तालुक्यात आम्ही काम करतोय असं सांगून खरे बाबासाहेब समजून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मत निलेश शिंदेंनी व्यक्त केले.

धरणगाव येथील विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष, सामजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, शेतकरी नेते, कामगारांचे नेते, प्रज्ञासूर्य, स्त्री – शूद्रांचे उध्दारक, बहुजनांचे कैवारी असलेले बाबासाहेब म्हणजेच महान भारतीय व्यक्तिमत्त्व. बाबासाहेबांचे गुरू तात्यासाहेब, तात्यासाहेबांचे गुरू आबासाहेब हे नातं रक्ताचं नसून विचारांचं आहे त्यामुळे ‘बाबासाहेबांचे रक्ताचे नाही तर विचारांचे वारसदार बना’, असं प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक नितीन वसंत शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून प्रबोधनपर कार्यक्रमाची स्तुती केली. बाबासाहेब वाचून आणि बोलून समजून घेण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत अंगिकारले पाहिजे, असे मत शिरसाठ सरांनी व्यक्त केले.

भारताच्या मूळ कृषी संस्कृतीचे प्रतिक असलेली पितळाची बैलगाडी देऊन व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन वसंत शिरसाठ, प्रमुख अतिथी ACS कॉलेज धरणगावचे माजी उपप्राचार्य प्रा.आर.एन.भदाणे, डी.बी. बोरसे, एन.ए.चौधरी, एस.बी.पाटील, पी.बी.पाटील मॅम, व्ही.पी.पाटील मॅम, एस.जी. पाटील मॅम, जितेंद्र शिंदे, राजू लांबोळे, पं.स.धरणगावचे दिनेश भदाणे तसेच जनसाहस फौंडेशन चे जिल्हा समन्वयक निलेश शिंदे यांच्यासह राहुल चौधरी, माधुरी ढिवरे, सोनम केदार, मीनाक्षी पाटील, प्रवीण मोरे, आकाश साठे विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.पी.पाटील मॅम यांनी तर आभार प्रदर्शन आकाश बिवाल सरांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here