Home लाइफस्टाइल बाबासाहेबांना कोलामांची आगळी वेगळी आदरांजली-कोलाम गुडा ‘आदर्श’ करण्याचा ग्रामसभेत निर्धार

बाबासाहेबांना कोलामांची आगळी वेगळी आदरांजली-कोलाम गुडा ‘आदर्श’ करण्याचा ग्रामसभेत निर्धार

106

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7डिसेंबर):-शेवटच्या घटकापर्यंत विकासाची किरणे पोहोचावी व स्वातंत्र्याची फळे प्रत्येकाला चाखता यावी, यासाठी बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने अतिशय मौल्यवान ग्रंथ या देशाला दिला. मात्र, राज्यकर्त्यांच्या बेजबाबदारपणा मुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही अनेक वस्त्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिलेत. आता आपल्या विकासाचे सुत्रधार आपण स्वतःच बनायचे व आपल्या वस्तीचा विकास करायचा असा ध्यास जिवती तालुक्यातील कोलामांनी घेतला आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. महामानव बाबासाहेबांना वाहिलेली हीच खरी आदरांजली आहे, असे मत कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी व्यक्त केले.*

आदर्श ग्राम विकास योजनेतून गावांचा विकास साधण्यासाठी आयोजित ग्रामसभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिवती तालुक्यातील अतिशय दुर्गम व दुर्लक्षित अशा खडकी, रायपूर व कलीगुडा या कोलामगुड्यांतील आदिम कोलामांनी मंगळवारी (ता.६) ग्रामसभा आयोजित केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सपना कोटनाके हे उपस्थित होते. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श ग्राम योजना जिल्हा समितीचे सदस्य किशोर चौधरी, उपसरपंच राजेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य झाडू कोडापे, अरविंद चव्हाण, संजय कोटनाके, ग्रामसेवक विनोद शेरकी, जिवती वन विभागाचे बालाजी भिंगेवाड व वनसडी वन परिक्षेत्राचे महादेव जाधव, आशा वर्कर धर्मी जाधव, आंगणवाडी सेविका मिना पडवेकर, खडकीचे गाव पाटील जैतू कोडापे, रायपूरचे बाजीराव कोडापे, कलीगुडाचे रामा सिडाम, कोलाम विकास फाऊंडेशनचे सचीव मारोती सिडाम, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष नामदेव कोडापे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच सपना कोटनाके यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहीली. तदनंतर ग्रामसभेला सुरूवात करण्यात आली. ग्राम सेवक विनोद शेरकी यांनी प्रस्तावाचे वाचन केले. तर किशोर चौधरी यांनी या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. आदिम कोलामांच्या वस्तीतील दारिद्रय संपवून सर्वांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी खडकी, रायपूर व कलीगुडा येथील कोलामांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. यापुर्वी याच गावांनी सामुहिक वन हक्कांसाठी दावा दाखल केला आहे. सुटाबुटातील माणसांना बघून जंगलात धूम ठोकणारे कोलाम आता कायद्यांचा आधार घेऊन आपले हक्क मागू लागले असल्याचे पाहून परिसरात कोलामांचे कौतुक होवू लागले आहे.सभेचे संचालन व आभार प्रदर्शन अनिल येमले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here