Home महाराष्ट्र ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

41

 

 

हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांचा आज स्मृतिदिन. मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मेहजबिन असे होते. कलेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट आणि पारशी रंगभूमीवरील कलाकार होते. आई इकबाल बानू या प्रसिद्ध नृत्यांगना होत्या. कामिनी या नावाने त्या अभिनयही करत. मीना कुमारी या चार वर्षाच्या असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. लेदर फेस नावाच्या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले. त्यांनी जवळपास २० चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले. वयाच्या १४ व्या वर्षी बच्चो का खेल या चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून भूमिका केली. त्या काळात नर्गिस, नूतन, निम्मी या आघाडीच्या अभिनेत्री चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत होत्या. मीना कुमारी यांनीही दमदार अभिनयाद्वारे त्यांच्यात स्थान मिळवले आणि लवकरच त्याही आघाडीच्या अभिनेत्री बनल्या. कमाल अमरोही दिग्दर्शित महल हा त्यांचा चित्रपट खूप गाजला. पुढे कमाल अमारोही यांनी मीना कुमारी यांना घेऊन अनारकली नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली . या चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच मीना कुमारी यांना अपघात झाला त्यात त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. यावेळी कमाल अमारोही त्यांना नियमित भेटायला येत त्यातूनच त्यांचे प्रेम जमले. आर्थिक अडचणीमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही मात्र दोघांमधील प्रेम वाढत गेले. कमाल अमारोही मीना कुमारी यांना मंजू म्हणत तर मीना कुमारी कमाल अमारोही यांना चंदन नावाने संबोधत असे. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तरी घरच्यांच्या संमती शिवाय लग्न करण्यास मीना कुमारी तयार नव्हत्या. मात्र कमाल अमारोही यांनी खुप आग्रह केल्याने त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी त्यांच्या वडिलांना समजल्यावर ते खूप संतापले. त्यांनी दोघांच्या भेटीवर बंधने आणली. कमाल अमारोही यांनी मीना कुमारी यांना घेऊन डेरा नावाचा चित्रपट काढण्याची घोषणा केल्यावर वडील अली बक्ष यांनी मेहबूब यांच्या अमर नावाच्या चित्रपटात काम करण्यासाठी मीना कुमारी यांच्यावर दबाव आणला. चार पाच दिवसांचे शूटिंग झाल्यावर त्यांनी तो चित्रपट सोडला व थेट आपल्या नवऱ्याकडे म्हणजे कमाल अमारोही यांच्याकडे गेल्या. कमाल अमारोही यांचे पहिले लग्न झाले होते व त्यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्येही होते. त्यामुळे मीना कुणारी यांची तीव्र इच्छा असतानाही मीना कुमारी यांना मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांच्याकडून तिच्यावर लादला गेला. मीना कुमारी यांच्या कौटुंबिक जीवनात इतकी उलथापालथ होत असताना त्यांचे चित्रपट मात्र यशस्वी होत होते. एक ही रास्ता, दिल अपना प्रीत पराई, दायरा, परिणिता, दिल एक मंदिर, शारदा, साहब बीबी और गुलाम, फुल और पथर हे त्यांनी अभिनय केलेले उल्लेखनीय चित्रपट. मीना कुमारी या फिल्म फेअर पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या अभिनेत्री आहेत . १९५३ साली त्यांना बैजू बावरा साठी तर पुढील वर्षी म्हणजे १९५४ साली परिणितासाठी देखील फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. साहब बीबी और गुलाम तसेच काजल या चित्रपटातील भूमिकांसाठीही त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. मीना कुमारी या जितक्या चांगल्या अभिनेत्री होत्या तितक्याच चांगल्या कवियत्री देखील होत्या. नाझ या नावाने त्यांच्या काही उर्दू रचना प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचा आवाजही गोड होत्या. मधुबाला यांना त्यांचा आवाज खुप आवडायचा. त्यांच्या यशाचा आलेख जसा उंचावत गेला तसा कमाल अमरोही यांचा हेवा वाढत गेला. मीना कुमारी यांनी अभिनय सोडून द्यावा यासाठी ते दबाव आणू लागले. मीना कुमारी यांनी अभिनय सोडण्यास नकार दिल्याने दोघांतील तणाव वाढत गेला. पुढे दोघे विभक्त झाले. त्यानंतर धर्मेंद्र यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचीही चर्चा होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाल्याचे अनेक दाखले जुन्या चित्रपट मॅगझीन मधून मिळतात. फुल और पथर या चित्रपटानंतर धर्मेंद्र यांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवण्यास सुरवात केल्यावर त्या व्यथित झाल्या. त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी त्यांना रोज एक पेग ब्रांडी घेण्याची सूचना केली. पण एक पेगचे दोन पेग, दोनचे चार पेग असे पेग वाढत गेले. औषध म्हणून सुरू केलेली ब्रांडी लवकरच व्यसनात रूपांतरित झाली. त्या नशेच्या आहारी गेल्या. शूटिंगच्यावेळी, प्रवासात त्यांच्या पर्स मध्ये ब्रांडीची बाटली असायची. साहब बीबी और गुलाम तसेच छोटी बहू या चित्रपटातील भुमीका आपल्या वास्तव जीवनाशी साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत असे त्या म्हणत. नशेच्या आहारी गेल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली त्यातच त्यांचे निधन झाले. पडद्यावरील आणि वास्तव जीवनातील साधर्म्य असणाऱ्या ट्रॅजेडी क्वीन ३१ मार्च १९७२ रोजी काळाच्या पडद्याआड गेल्या. ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांना भावपूर्ण आदरांजली.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here