Home गंगाखेड रमो रमा रे रंगपंचमि केळूया, रो त्योहार रंगपंचमि रमलो रे…

रमो रमा रे रंगपंचमि केळूया, रो त्योहार रंगपंचमि रमलो रे…

50

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

 

 

गंगाखेड :-रंगपंचमी या पारंपरिक सणाचे औचित्य साधून मौजे.उमला नाईक तांडा येथे बंजारा समाजाने आयोजित केलेल्या रंगोत्सव कार्यक्रमात स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी स्वतः सहभागी होत ‘रमो रमा रे रंगपंचमि केळूया, रो त्योहार रंगपंचमि रमलो रे’ या बंजारा गीतावर ठेका धरला. तसेच याप्रसंगी बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य व पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे त्या उत्सवास आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
आपल्या अनोख्या परंपरेमुळे वेगळी आणि रंजक वाटणाऱ्या बंजारा रंगपंचमीची लोकप्रियता आधुनिक काळातही कायम आहे. कधी काळी तांड्या वस्तीवर गुजराण करणारा बंजारा समाज सध्या आधुनिक प्रवाहात आला आहे. मात्र, आधुनिकता आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाली असली तरी या समाजातील उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे.
बंजारा होळीच्या रंगपंचमीचे आकर्षण प्रचंड आहे. या दिवशी कुळ आणि आडनावानुसार ठरलेला प्रत्येक तांडा काही खेळांचे आयोजन करत असतो. हारेर लकडा हा या दिवशीचा महत्वाचा खेळ. लोखंडी खांबाला तेल लावून त्याच्या वरच्या टोकाला साखरेच्या गाठ्या आणि बक्षिसाची रक्कम ठेवली जाते. खांबाभोवती गेरणी म्हणजे बंजारा महिला झाडाच्या ओल्या फांद्या घेऊन उभ्या राहतात अन त्या खांबावर चढू पाहणाऱ्या गेरियाला झोडपून काढतात. या दिवशी घरोघरी जाऊन फाग म्हणजे प्रथेनुसार देणगी मागून मग त्यातून नायकाच्या घरी प्रसाद केला जातो. आधुनिक काळातही बंजारा होलिकोत्सवाची लोकप्रियता कायम आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह बंजारा बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंजारा परंपरा महत्त्वाची – आ.डॉ.गुट्टे
अलिकडच्या काळात शहरात वास्तव्यास असणाऱ्या बंजारा बांधवांमध्ये सामूहिक परंतु पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तांड्यावर राहणाऱ्या बांधवांमध्ये आजही ही प्रथा जपली जात आहे. होळी व धूळवड म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच आहे. बंजारा समाजात या उत्सवाची धूम सुरू झाली आहे. फगवा हा प्रकारही बंजारा समाजात बराच लोकप्रिय आहे. फगवा मागताना देखील विविध गीते गायली जातात. एकूण बंजारा समाजाची आगळी होळी साजरी होत आहे. म्हणून बंजारा परंपरा महत्त्वाची आहे, असे मत आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here