Home महाराष्ट्र सरोज आल्हाट यांच्या काव्यसंग्रहातून प्रकट झालेला संघर्ष खचलेल्यांना उमेद देणारा-आ. संग्राम जगताप

सरोज आल्हाट यांच्या काव्यसंग्रहातून प्रकट झालेला संघर्ष खचलेल्यांना उमेद देणारा-आ. संग्राम जगताप

125

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेला ठेवा पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरणार असुन चांगल्या वैचारिक साहित्यातून भावीपिढीला दिशा मिळणार आहे. भावीपिढी लिहिणार की नाही, याची शाश्‍वती राहिलेली नसल्याने साहित्याचा हा खजिना भविष्यातील पिढीला मौल्यवान वाटणार आहे. कवयित्री सरोज आल्हाट यांच्या काव्यसंग्रहातून प्रकट झालेला संघर्ष खचलेल्यांना उमेद देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महिलांच्या संघर्षमय जीवनातून प्रकट झालेल्या कवयित्री सरोज आल्हाट यांनी जीवनातील अनुभवातून लिहिलेल्या अनन्यता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शहरातील हॉटेल फरहत येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विचारपिठावर ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.मिलिंद कसबे, मसाप, पुणे चे जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, ज्ञानदेव पांडूळे, कवयित्री आल्हाट आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, साहित्यातून जीवनातील संघर्षाचा उलगडा होऊन तो भावी पिढीला स्फुर्ती देणारा व नवीन आव्हानांना तोड देण्यासाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे. महिला जीवनातील संघर्षातून कशी सावरते? हे या काव्यातून कवियत्री आल्हाट यांनी व्यक्त केले आहे. सक्षम समाज निर्मितीसाठी प्रेरणादायी नवीन साहित्य आणावे लागणार आहे.
प्रास्ताविकात प्रा.डॉ.अशोक यांनी कवयित्री सरोज आल्हाट यांनी यापूर्वी तीन काव्यसंग्रहाची निर्मिती केली असून, अनन्यता हा चौथा काव्यसंग्रह स्वत:च्या जीवनातील संघर्ष शब्दबब्ध केला आहे. हे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक काव्य आहे. त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले असून, दलित, शोषित, पीडित, आदिवासी वर्ग व एड्स रुग्णांसाठी त्यांचे सामाजिक कार्य सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.प्रा.डॉ.रमेश वाघमारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
कवयित्री सरोज आल्हाट म्हणाल्या की,अनन्यता याचा अर्थ म्हणजे एकरूपता होय. मी, माझी आई व आमचा सांभाळ करणारी मावशी यांच्या एकरुपतेतील संघर्षमय जीवन काव्यसंग्रहात उमटला आहे. आई-वडिलांचे टोकाला पोहचलेले भांडण, त्यातून झालेला घटस्फोट व दोघांचा सांभाळ करणारी मावशी त्यानंतर मोठी होऊन आई व मावशीला शेवट पर्यंत दिलेला आधार व आई, मावशी व स्वतःने जे यातना भोगल्या ही संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब कवितेतून मांडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनातील अनुभव कथन करताना त्यांचे डोळे पाणावले. तर सभागृह देखील भावनिक झाले होते. पिडीत, वंचितांसाठी सुरु असलेल्या कार्याची माहिती देऊन डोरकास रिज्यूविनेशन मिशन या नवीन सामाजिक संस्थेची त्यांनी घोषणा केली.
सुनील गोसावी यांनी कवयित्री सरोज आल्हाट यांच्यासह महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देऊन आल्हाट यांना पुढील साहित्य व सामाजिक क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, साहित्य वास्तवता मांडण्याचे काम करते. स्वप्नातल्या कवितांचे जीवन संपले आहे.विसाव्या शतकातील कवी, साहित्यिकांनी वास्तवता मांडण्याचे काम केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचे साहित्य कळू लागले तेंव्हा जीवनात क्रांती कशी करावी यासाठी प्रेरणा मिळू लागली. वास्तवतेला भर देऊन समाजाच्या व्यथा कवितेतून मांडल्या गेल्या पाहिजे. विषमतेच्या दरी कमी करण्यासाठी साहित्य निर्मिती करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रा. डॉ. मिलिंद कसबे म्हणाले की, काळजातील यातना रिक्त झाल्याशिवाय काव्य बाहेर येत नाही. यातनातून मुक्त करणारा हा काव्यसंग्रह हुंकार भरणारा आहे. श्रद्धेतून जन्माला आलेला आतला हुंकार म्हणजे नैसर्गिक संवेदनांची अध्यात्मिक कविता आहे. यातना घेऊन कवी तयार होतो. याच प्रकारे कवयित्री सरोज आल्हाट यांच्या यातनांचा हा काव्यसंग्रह हुंकार आहे. कवीने नवीन सामाजिक प्रश्‍नांना भिडायला पाहिजे. व्यवस्थेला प्रश्‍न विचारुन समाजाला जागरुक केले पाहिजे. सामाजिक व परिवर्तनवादी साहित्यातून क्रांती घडणार आहे. सामाजिक दृष्ट्या सक्रिय बुद्धिजीवी वर्गामुळे समाज शहाणा होऊन परिवर्तनाचे वारे वाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पालवे म्हणाले की, वेदनांना मुठीत घेऊन जीवनातील संघर्ष कवितेतून मांडण्यात आला आहे. या काव्यसंग्रहातून नवीन पिढीला ऊर्जा व उर्मी मिळणार आहे. नवीन पिढीला योग्य दिशा मिळाल्यास चांगले साहित्य, कविता निर्मिती होऊ शकणार आहे. मनातील वेदना कवितेतून प्रकट होताना काव्य फुलत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक भुषण देशमुख, प्राचार्य डॉ चंद्रकांत जोशी,आयुब खान, शैलजा शर्मा, शाहुराव गरुड, प्रा डॉ विजयकुमार पोटे, डॉ. श्याम शिंदे, रवींद्र सातपुते,कॉ. अनंत लोखंडे,प्रा. दिलीप गायकवाड,हेरंब कुलकर्णी, ऋता ठाकूर, सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, शर्मिला रूपटकके, शामा मंडलिक, जयश्री राऊत,गणेश भगत, बबनराव गिरी, दशरथ शिंदे, विठ्ठल शिंदे, भगवान राऊत, डॉ रमेश वाघमारे, पौलस वाघमारे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले. शेवटी आभार प्रविण त्रिभुवन यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित अमर, बॉबी लोखंडे, प्रदीप सरनाईक, जॉय लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here