Home चंद्रपूर नवीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे गरजेचे- अपर जिल्हाधिकारी देशपांडे

नवीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे गरजेचे- अपर जिल्हाधिकारी देशपांडे

71

🔸जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचा आढावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 30ऑगस्ट):- मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येयसमोर ठेवून ज्ञान, माहिती व कौशल्यासह त्यांचा विकास करण्याची जबाबदारी शिक्षकासह आपल्या प्रत्येकाची आहे. नवीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. याकरीता शाळा व महाविद्यालयीन परिसर तंबाखूमुक्त करावा, यासाठी पोलीस व शिक्षण विभागाचा समन्वय आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक व्यापक करण्याच्या सुचना बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, मध्य चांदा वनविभागाचे वनसंरक्षक शेख तौसिक शेख हैदर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील, गुप्तचर विभागाचे उपकेंद्रीय अधिकारी वैभव सिंह, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक विजयकुमार नायर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. बाघमारे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, डाक निरीक्षक एस. जी. दिवटे, डॉ. बंडू रामटेके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, शिक्षकांच्या व्यसनांबाबत शिक्षण विभागाने तपासणी करावी. शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करावा. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांना सुचित करावे. कृषी विभागाने जिल्ह्यात खसखस व गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुरीअर व पार्सलच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होऊ नये यासाठी डाक विभागाने पार्सलची नियमित तपासणी करावी व दैनंदिन पार्सलचे स्कॅनिंग होत आहे का? याची खात्री करावी. त्यासोबतच पोलीस विभागाने अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी धाडसत्र मोहीम राबवावी.

जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील दवाखाने, ग्रामीण रुग्णालये आदींचा परिसर तंबाखुमूक्त करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पोलीस विभागामार्फत अंमली पदार्थासदंर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here