चिमुर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित शहिद स्मृतीदिन सोहळ्यास नागरीकांची बहुसंख्य उपस्थिती
सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.16ऑगस्ट):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या “चले जाव’ आंदोलनात चिमुरात झालेल्या क्रांतीकारी लढ्याने इतिहासाला कलाटणी दिली होती. या लढ्यातील शहिदांना अभिवादन करणे आपले कर्तव्य आहे. हा समतेचा इतिहास पुसुन मनुवादी विचारधारा रूजविण्याचा प्रयत्न केंद्र व राज्यातील सत्ताधारी करीत आहेत. बहुजन समाजामध्ये जातीयवाद, भेदाभेद, धार्मिक तेड निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा इरादा मोडुन काढणे आवश्यक आहे. दोन टक्के मनुवादी हे बहुसंख्य बहुजनांना गुलामीत ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
चिमुर तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने आयोजीत शहिद स्मृती दिन कार्यक्रमात विजय वडेट्टीवार बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे महासचिव तथा चिमुर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विचार मंचावर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा चिमुर विधानसभा कॉंग्रस समन्वयक डॉ. सतिश वारजुकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस (ओ.बी.सी) चे प्रदेश संघटक धनराज मुंगले. डॉ. नामदेवराव किरसान, सेवा दल कॉंग्रेस चे सरचिटनीस प्रा. राम राऊत, जिल्हा परिषद माजी सदस्य तथा काँग्रेस जिल्हा सरचिटनीस गजानन बुटके, प्रफुल खापर्डे, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, राजु लोणारे, संजय डोंगरे, आदि मान्यवर उपस्थीत होते.
अमृत महोत्सवी समारोपीय स्वातंत्र्य दिनानिमीत्त संपूर्ण देशात तिरंगा फडकत असतांना महाराष्ट्रात मनोहर कुलकर्णी (भिडे) यांच्या नेतृत्वात भगवा झेंडा घेऊन मिरवणुक काढण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरूषांचा अवमान करणे, स्वातंत्र्यदिनी भगवा झेंडा घेऊन मिरवणुक काढणे, जातिभेद निर्माण करून धार्मीक तेढ निर्माण करण्याचे उपद्रव सत्ताधाऱ्यांचा पाठींब्याने होत आहे. देशद्रोहासारखे वागणाऱ्यांना पाठीशी घालण्याऱ्या भाजप व त्यांचा मित्रपक्षापासून बहुजनांनी सावधान राहण्याचे आवाहन करीत विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “हर घर तिरंगा” सारखे अभियानाने राष्ट्रध्वजाचा आदर व नियमांना पायदळी तुडविण्याचा प्रयत्न होत असतांना आपण गप्प राहणार आहोत का? हा खरा चिंतनाचा विषय आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इ.डी, सी. बी.आय.चा धाक दाखवुन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. मनुवादी विचारधारा अमलात आणण्याकरीता पर्यायी मनुवादी संविधान बनविणे सुरू असुन भारतीय सविधान हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व समस्येवर कॉंग्रेस पक्षाला सत्तेत आणने हाच उपाय असल्याचे वडेट्टीवार यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणातुन सांगीतले. यावेळी डॉ. सतिश वारजुकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुरवातीला शहिद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीआई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, संचालन राजु दांडेकर, यांनी केले. उपस्थितांचे आभार उमेश हिंगे यांनी मानले.कार्यक्रमातील लक्षवेधक बहुसंख्य उपस्थिती हा चिमुरकरांच्या चर्चेचा विषय ठरला.
