Home गडचिरोली इन्कम टॅक्स रिफंडचा सायबर फ्रॉड वेळीच सावध व्हा – अॅड. चैतन्य एम....

इन्कम टॅक्स रिफंडचा सायबर फ्रॉड वेळीच सावध व्हा – अॅड. चैतन्य एम. भंडारी

117

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.2ऑगस्ट):- भोवतालच्या परिस्थिती आणि सीझनप्रमाणे हॅकर मंडळी आपले नवनवीन सापळे रचून त्यात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतात. आताच हा इन्कमटॅक्सचा असाच एक हा नवा सापळा रचला गेलाय. सध्या सगळीकडेच, विशेषतः व्यापारी वर्गात इन्कम टॅक्स भरण्याची धांदल उडाली आहे. त्या गडबडीत सगळे आहेत. आणि ते सगळं भरून झाल्यावर तुम्ही मंडळी रिलॅक्स होणार आणि नेमक्या त्यावेळी तुम्हाला मेसेज येतो की, तुमचे बिजिनेस बॅलन्सशीट तपासले गेले असून त्यानुसार तुम्हाला अमुक अमुक इतकी रक्कम रिफंड होणार आहे. ती तुमच्या अधिकृत बँक खात्यात लवकरच जमा केली जाईल.

मात्र त्यासाठी तुमचा अकाउंट नंबर xxxxxx हाच आहे का ते तपासून आम्हाला सांगा आणि तो अकाउंट बरोबर नसेल तर कृपया खालील लिंकवर क्लिक करून तुमचा योग्य तो नंबर व तुमच्या खात्याची इतर सर्व माहिती त्या लिंकवर जाऊन भरा. म्हणजे मग तुम्हाला रिफंड मिळेल. तुम्ही त्यांनी दिलेले xxxxx मधील शेवटचे चार आकडे पाहता. आणि तुम्हाला कळत की तो नंबर तुमचा नाहीय. तुम्ही एकदम पॅनिक होता. गांगरून जाता की माझा नंबर कसा काय चुकला ? त्यामुळे तुम्ही मग घाईघाईने त्या लिंकला क्लिक करून पुढे मग तिथं जे जे मागितलं जाते ते ते तुम्ही देत जाता.

त्याच दरम्यान सांगितलं जातं की आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला द्या.तुम्हीही त्यावेळी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी अनावधानाने समोरच्याला देता आणि नंतर तुम्हाला मेसेज / कॉल येतो की, “आता सगळं व्हेरिफाय झालेलं असून, काळजी नसावी. तुमचं अकाउंट अपडेट केलं आहे. नंबरही करेक्ट करून घेतला आहे. लवकरच तुम्हाला रिफंड जमा होईल”तुम्हीही हुश्शह करून निवांत होता.

आणि मग पाच दहा मिनिटांनी जेव्हा तुमच्या बँकेचा मेसेज येतो की तुमच्या खात्यातून अमुक इतकी रक्कम डेबिट झाली असून आता मिनिमम बॅलन्स शिल्लक आहे. तेव्हा तुम्ही हादरता. कारण तुमच्या खात्यात जे काही लाख दहा लाख असतील ते सगळे “धुवून” नेलेले असतात. मग डोळ्यासमोर अंधारी येते ! काय करावं सुचत नाही ! तर मंडळी असं होण्यापासून तुम्ही स्वतःला सुरक्षित करू शकता ! उपाय सोप्पा आहे ! तर असा काही मेसेज आला तरी आनंदाने हुरळून जायचं नाही. शांतपणे तो मेसेज दोनचार वेळा वाचायचा. आणि नंतर तुमच्या सीए ला कॉल करून या मेसेज बद्दल माहिती द्यायची. त्यावेळी तो लगेच सांगेल की, हे फ्रॉड आहे.

असं काही इतक्या तातडीने रिफंड येत नसतो. त्याला प्रोसिजर असते, बॅलन्सशीट व्हेरिफिकेशन असत या गोष्टीला वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही नुकताच इन्कम टॅक्स भरला अन लगेच सरकारने लागू असलेला रिफंड केला असं होत नाही. तेव्हा घाईघाईत अशा कोणत्या मेसेजमधील लिंक ला क्लिक करायला जाऊ नका. हा सर्वात प्रभावी उपाय आहे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here