Home पुणे सच्चा रंगकर्मी काळाच्या पडद्याआड!

सच्चा रंगकर्मी काळाच्या पडद्याआड!

102

मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे सोमवार दिनांक २४ जुलै रोजी वृद्धपकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. जवळपास पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर आपल्या अभिनयाचे रंग भरणाऱ्या जयंत सावरकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने रंगभूमीची अविरत सेवा करणारा सच्चा रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेला आहे. ३ मे १९३६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात जन्मलेले जयंत सावरकर हे नोकरीसाठी मुंबईत आले. काही काळ त्यांनी मुंबईत नोकरीही केली मात्र अभिनयाचे बाळकडू पिलेल्या जयंत सावरकर यांचे मन नोकरीत रमले नाही. नोकरी सोडून ते नाटकात काम करू लागले. नोकरी सोडून त्यांनी नाटकात काम करणे हे त्यांच्या सासऱ्यांना आवडले नाही.

जयंत सावरकर मात्र अभिनय करण्यावर ठाम राहिले. रंगभूमीवर त्यांना जी भूमिका मिळत गेली ती त्यांनी निष्ठेने पूर्ण केली. सुरवातीचे काही वर्ष तर त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनच काम केले मात्र आपल्यालाही आपल्या क्षमतेप्रमाणे नाटकात अभिनय करण्याची संधी मिळेल असा विश्वास त्यांना होता याच विश्वासाच्या जोरावर त्यांना भूमिका मिळत गेल्या. आपल्याला मिळणाऱ्या भूमिकांची लांबी किती मोठी आहे हे त्यांनी कधीही पाहिले नाही. जयंतराव भूमिकेच्या लांबीपेक्षा भूमिकेची रुंदी पाहत म्हणूनच त्यांना काही नाटकात छोट्या भूमिका मिळाल्या मात्र या छोट्या भूमिकेतही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली त्यामुळे लवकरच मराठी रांगभूमिवरील एक प्रख्यात अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांना अनेक नाटकात मुख्य भूमिका मिळाल्या त्या भूमिकांचे त्यांनी सोने केले.

एकच प्याला मधील तळीराम, तुझं आहे तुझ्यापाशी मधील आचार्य, व्यक्ती आणि वल्ली मधील अंतु बर्वा आणि हरितात्या या त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर ठरल्या. जुन्या काळातील मामा पेंडसे, केशवराव दाते, दत्ताराम यांच्यापासून ते आजच्या काळातील चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम यासारख्या सर्वच दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनात त्यांनी काम केले. त्यांनी अभिनय केलेले सौजण्याची ऐसीतैशी, टिळक – आगरकर, ययाती – देवयानी, सूर्यास्त ही नाटके खूप गाजली जवळपास १०० हुन अधिक नाटकात भूमिका केलेल्या जयंतरावांनी ३० हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. दूरचित्रवाणीवरील काही मालिकातही त्यांनी भूमिका केल्या आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही ठिकाणी आपल्या अभिनयाचे रंग भरणारे जयंतराव मात्र प्रेक्षकांना भावले ते नातकातच! सहज सोपा अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकण्याची त्यांची खासियत होती म्हणूनच त्यांचा अभिनय पाहताना हा माणूस आपल्या घरातीलच एक व्यक्ती असल्याचा भास प्रेक्षकांना होत असे. त्यांच्या अभिनय कलेसाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत.

अखिल भारतीय नाट्य परिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले आहे. १९९७ साली झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. एक छोटा माणूस या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या निधनाने पाच दशकांहून काळ रंगभूमीची अविरत सेवा करणारा सच्चा रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेला आहे. जेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here