Home Education हायब्रिड दहशतवादी म्हणजे काय ?

हायब्रिड दहशतवादी म्हणजे काय ?

88

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गेल्या आठवडयात जम्मु-काश्मीरच्या तीन जिल्हयात मोठया प्रमाणात छापेमारी केली. सुत्रांच्या माहितीनुसार, हायब्रीड दहशतवाद्यांचा शोध घेणे, त्यांच्या जवळील डेटा आणि माहिती जप्त करणे हा या छापेमारीतील प्रमुख उद्देश होता. एनआयए असो किंवा सुरक्षा दल किंवा जम्मु-काश्मीर पोलीस यांच्या अलिकडील काळातील प्रत्येक कारवाईत हायब्रीड दहशतवाद्यांचा आणि ओव्हरग्राऊंड वर्करचा उल्लेख वारंवार होत आहे. त्यामुळे अनेकांना हे हायब्रिड दहशतवादी नेमके कोण आहेत. ही कोणती नविन अतिरेकी संघटना आहे का? ते कसे काम करतात. पोलीस किंवा सुरक्षा दलांना यांचे मोठे आव्हान का वाटते? हे हायब्रिड दहशतवादी फक्त जम्मू-काश्मीरमध्येच आहेत काय? भारताला याचा किती धोका आहे? या सगळया प्रश्नांचा आढावा येथे घेतला आहे.

हायब्रिड दहशतवाद हा शब्द किंवा ही संज्ञा जम्मु आणि काश्मीर पोलीसांनी सर्वप्रथम वापरली, सामान्यपणे २०२१ नंतर या हायब्रिड दहशतवादी यांच्याबाबत जम्मु-काश्मीर पोलीसांनी उललेख केला. पोलीसांनी या संज्ञेची अशी व्याख्या केली आहे की, पारंपारीक पध्दतीने प्रत्यक्ष दहशतवादी नसतात. पोलीसांजवळील अतिरेक्यांच्या यादीत ते सुचीबध्द नसतात. सामान्य जीवनात राहुन जे कट्टरवाद जोपासतात आणि दहशतवादी गटासाठी कार्य करणे, दहशतवादी गटाने किंवा त्यांच्या गटाने दिलेले एखादे विशिष्ट देशविरोधी लक्ष्य पुर्ण करणे आणि पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात रुळणे त्यांना हायब्रिड दहशतवादी असे म्हटले जाते.

ओव्हर ग्राऊंड वर्करचे कार्य देखील थोडेफार अशाच प्रकारचे असते. मात्र ओव्हर ग्राऊंड वर्कर बहुतेक वेळा प्रत्यक्ष हिंसक कारवायांमध्ये सहभागी होत नाही. ते संदेश, शस्त्र, पैसे पोहोचवणे इत्यादीसारखी कामे करतात. मोठया दहशतवादी संघटना आपले सौम्य किंवा लहान लक्ष्य गाठण्यासाठी सर्व सामान्य स्थानिक लोकांमधुन हायब्रिड दहशतवादी तयार करतात. सोशल मिडीया तसेच अन्य मार्गानी त्यांचे ब्रेन वॉश करण्यात येते. यामध्ये तरुणांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र त्यांचा दहशतवादी संघटनांशी थेट संबंध येत नाही किंवा दहशतवाद्यांप्रमाणे ते थेट मोठया कारवाया करत नाही. मात्र कट्टरवादी असतात. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा नसतो. ते कधीही भुमीगत पध्दतीने कार्य करत नाही. दहशतवादी संघटना त्यांना एखाद्या हँडलरच्या माध्यमातुन लहान लहान देशविरोधी कृतीने लक्ष्य देते. तसेच ते पोलीस किंवा सुरक्षा दलाच्या वॉन्टेडच्या यादीत नसतात. ही हायब्रिड दहशतवाद्याची सर्वात मोठी बाजु किंवा ओळख म्हणता येईल आणि हेच खुप मोठे आव्हान देखील आहे.

✒️सुरेश दौलतराव डांगे(संपादक-साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-८६०५५९२८३०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here