नाशिक -:शांताराम दुनबळे
नाशिक -: पावसाळयाच्या पुरपरीस्थितीचा कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा. पूरपरिस्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे. सर्व पुलांचे निरीक्षण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सुस्थितीबाबत खात्री करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यंत्रणांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात मान्सुन- २०२३ पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, मान्सूनच्या काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारणासाठी नियोजन करुन सज्ज रहावे. प्रत्येक विभागाने २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव साहित्य पोहोच करणे आणि ते साहित्य चालुस्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. पूरपरिस्थितीत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे. तसेच सर्व पुलांचे निरीक्षण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सुस्थितीबाबत खात्री करावी. यासोबतच दरडी कोसळणे, वीज पडणे, झाडे रस्त्यावर पडून वाहतुक बंद होणे यावर संबंधित विभागाने व्यवस्था करावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपतग्रस्त भागातील नागरिकांना अन्न धान्य, पिण्याचे पाणी, निवारा, कपडे , आदी आवश्यक वस्तुंचा पुरवठा करून पुरात घरे वाहून गेलेल्या निरश्रितांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. महसूल विभागाने मदत व पुनर्वसन आणि पंचनामे करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात यावी अशा सूचना यावेळी बैठकीत यंत्रणांना दिल्या. यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नगर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते.
