Home महाराष्ट्र नाशिक मनपा लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर अँटी करप्शनच्या जाळ्यात ५५ हजारांची लाच...

नाशिक मनपा लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर अँटी करप्शनच्या जाळ्यात ५५ हजारांची लाच ; लिपिकासह अटक

64

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-नाशिक शहरातील तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक सेवेत रुजू करुन न घेणाऱ्या संस्थेवर कारवाईचे पत्र देण्याच्या मोबदल्यात महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह एका लिपिकाला कार्यालयातच शुक्रवारी (दि. २) दुपारी ५५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. दोघांना अटक करुन शनिवारी न्यायालयात हजर केले असून, दोघांच्या घरांची झडती सुरू आहे. या लाचखोरीमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. दोघांवर सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सुनीता सुभाष धनगर (वय ५७, रा. रंचित सनशाइन, उंटवाडी, नाशिक) व लिपीक नितीन अनिल जोशी (४५, रा. पुष्पांकुर, बंगला चव्हाणनगर, तपोवन, नाशिक ) अशी दोन लाचखोरांची नावे आहेत. धनगर या वर्ग दोनच्या अधिकारी आहेत. तर, जोशी हा वर्ग तीनचा कर्मचारी आहे. ५० वर्षीय तक्रारदार हा मुख्याध्यापक असून, तो एका खासगी शैक्षणिक संस्थेत कार्यरत होता. दरम्यान संस्थेने त्यांना बडतर्फ केले. या कारवाईविरोधात त्यांनी नाशिकच्या शैक्षणिक न्यायाधीकरणात दाद मागितली होती. न्यायाधिकरणाने बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती दिली. तरीदेखील संस्थेने या मुख्याध्यापकास सेवेत दाखल करून घेतले नाही. याप्रकरणी तक्रारदाराने महापालिकेच्या शिक्षणाधिकारी धनगर यांच्याकडे संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. धनगर यांनी संस्थेवर कारवाई करण्याचे पत्र देण्यासाठी तक्रारदार मुख्याध्यापकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. धनगर व लिपिक जोशी यांनी कार्यालयातच तक्रारदाराकडून ५५ हजारांची लाच स्विकारली.

लिपिक जोशी याने आदेशाचे पत्र बनवण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार, वैशाली पाटील यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी सापळा यशस्वी केला.
नाशिक महापालिकेच्या
शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अँटी करप्शन ) ५० हजार रूपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने घेतलेल्या झाडाझडतीत धनगर यांच्या घरात मोठे घबाड हाती लागले. या तपासात धनगर यांच्या राहत्या घरातून तब्बल ८५ लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे ३२ तोळे सोनेही हाती लागल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले.

यासंदर्भात वालावलकर यांनी शनिवार रोजी तपासाबाबत माहिती दिली. एका खासगी शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाला काही कारणास्तव संस्थेने निलंबित केले होते. या कारवाईविरोधात त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरणात दाद मागितली. न्यायाधिकरणाने मुख्याध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, तरीही संस्थेने त्यांना नियुक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे मुख्याध्यापकांनी अर्ज केला होता संस्थेला नियुक्ती प्रकरण समोर आले. यानंतर धनगर यांना ताब्यात घेण्यात आले. एसीबीने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तपास सुरू केला असता आतापर्यंतच्या तपासात लाचखोर सुनीता धनगरांकडे मोठे घबाड सापडले असल्याची माहिती वालावलकर यांनी दिली. धनगर यांच्या घरात तब्बल ८५ लाख रोख रक्कम आणि ३२ तोळे सोन्याचे दागिने करण्यात हस्तगत आले आहेत. त्याचबरोबर धनगरांच्या नावावर २ आलिशान फ्लॅट आणि एक प्लॉटदेखील आहे. महत्वाचे म्हणजे उंटवाडी परिसरातील त्यांच्या राहत्या फ्लॅटचीच किंमत दीड कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक खाते असून या खात्यात पाऊणे तेरा लाखांची रोकड असल्याचे समजते. धनगरांची बँकखाती, लॉकर्स याबाबत तपशील गोळा केला जात असून, धनगरांनी आणखी किती माया कमावली याचा आलेख लवकरच समोर येणार आहे.

घर केले सील : धनगरांना ताब्यात घेतल्यानंतर तपासी पथक त्यांच्या उंटवाडीतील निवासस्थानी घर बंद असल्याने ते सील करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here