Home Breaking News डॉ.बाबासाहेबांचे संविधान जगण्याचे हक्क तर महात्मा फुले यांचे सत्यशोधकी विचार जगण्याला समृद्धी...

डॉ.बाबासाहेबांचे संविधान जगण्याचे हक्क तर महात्मा फुले यांचे सत्यशोधकी विचार जगण्याला समृद्धी देतात : डॉ.सुरेश झाल्टे ( व्याख्याते ) सत्यशोधकी विचार प्रबोधनाने वडिलांचे द्वितीय पुण्यस्मरण विजय लुल्हे यांचा प्रेरणादायी उपक्रम – सौ.आशाताई माळी [ माजी पंचायत समिती सदस्य ]

63

 

प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

जळगांव – ” डॉ.बाबासाहेबांचे संविधान जगण्याचे हक्क तर महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार जगण्याची समृद्धी देतात.” असे मार्मिक प्रतिपादन सत्यशोधक समाज संघ राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे संत सावता माळी नगरातील माळी पंचमंडळ सभागृहात दि.१८ एप्रिल २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला.” सत्यशोधक विचार ही काळाची गरज ” या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. झाल्टे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशाताई माळी ( माजी पंचायत समिती सदस्या ) असून प्रमुख अतिथी संगिता माळी ( संचालक , कुमूद पब्लिकेशन ), श्रीमती सिंधु सुतार , माजी सरपंच विकास पाटील ( नशिराबाद ), लालचंद पाटील ( उपाध्यक्ष जि.प.जळगाव) , डॉ.मिलींद बागुल (जिल्हाध्यक्ष,सत्यशोधकीय साहित्य परिषद ), जयसिंग वाघ ( जिल्हाध्यक्ष,सत्यशोधकीय समाज ), योगेश माळी (अध्यक्ष,नशिराबाद शिक्षण मंडळ ), मुकुंद सपकाळे (सत्यशोधक समाज संघ अधिवेशन माजी स्वागताध्यक्ष ), जनार्दन माळी ( संचालक , नशिराबाद शिक्षण मंडळ ), युवराज माळी ( संचालक अथर्व पब्लिकेशन ), प्रमोद पाटील सर ( जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ ), प्रा. विश्वनाथ महाजन ( राजे संभाजी शिक्षणशास्र महाविद्यालय ),एम.टी.लुले ( सचिव,विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ ) ,संयोजक विजय लुल्हे मान्यवर उपस्थित होते.
पुढील मार्गदर्शनात सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे म्हणाले की, ‘ महात्मा फुले यांचे कार्य मानवतावादी व पथदर्शक आहे .भीतीपोटी अंधश्रद्धा वाढतात परिणामी संस्कृती व परंपरा अन् कष्ट आपले असले तरी विनाकष्ट विशिष्ट वर्ग वर्षानुवर्षे सांस्कृतिक व आर्थिक शोषण करून पोट तुडुंब भरतो आहे ! आपण क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्विकारून शाळा, कॉलेजेस विविध सामाजिक संस्था उभारल्या पण सर्वार्थाने त्यांचे विचार आचरणात आणले नाही हिच खरी परिवर्तन न होण्याची निरंतर समस्या आहे .शिक्षण व्यवस्थेने एकतर्फी महापुरुषांच्या कार्यातील वैचारिक खंडण शिकवले मात्र क्रांतिकारी समाज पुरुषांच्या सृजनात्मक विचारांच्या क्रांतदर्शी अभ्यासाची दिशा कधीच दिली नाही म्हणून भारतापेक्षा एक परदेशी गेल ऑम्वेट महात्मा फुले यांचा जीवन अभ्यासासाठी भारतीय नागरिकत्व स्वीकारून आयुष्य भारतात घालवते पण आपण फक्त जयंती अन् पुण्यतिथी साजरी करण्यात धन्यता मानतो.शासन जीवनाभिमुख मूलभूत शिक्षण न देता कलगीतुऱ्याचे शिक्षण देते . ढकलपास शिक्षण,मेरिट बंद करून पदोन्नती यातून प्रशासकीय शोषण करीत आहे,जातीय आरक्षण मोडीत काढण्याचे शासकिय षडयंत्रही त्यांनी सोदाहरण मांडले. वैदिक संस्कृती आपली नाहीच. ज्याची संस्कृती असते त्यांचेच राज्य असते हे पूर्वीच्या परकिय अल्पशिक्षित सत्तालोलूप राजांना समजले परंतु आजच्या काळातील उच्चशिक्षित अंधश्रद्धेला बळी पडून आत्म विनाशाबरोबर पुढच्या पिढीच्या भविष्याचाही नकळत विनाश करते आहे.!
धार्मिक चित्रपट व आकर्षक तत्त्वशून्य जाहिरातीतून दिशाभूल केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणा अन्यायाविरुद्ध लढा व अधिकार प्राप्तीसाठी संघर्ष न करण्यासाठी मजबूर व हतबल करणे हे बहुजनांच्या सत्यानाशाचे कारण आहे.”
डॉ.झाल्टे यांच्यापूर्वी सत्यशोधकी विचारवंत जयसिंग वाघ मार्गदर्शनात म्हणाले की, ‘ सत्यशोधकी पद्धतीने लग्न होतात परंतु सत्यशोधकी विचार जागर तथा प्रबोधन करून पिताश्री सुपडू नथु सुतार यांचे द्वितिय पुण्यस्मरण करणे हा विजय लुल्हे यांनी उत्कृष्ट पायंडा पाडला या बाबत गौरवोद्गार काढले. हा प्रेरणादायी उपक्रम आहे सांगत पुरोगामी विचारांनी व्यवहार करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाज लग्न विधीत कसे त्रास देतात याबाबत सोदाहरण मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात आशाताई माळी ( माजी पं.स.समिती सदस्य ) म्हणाल्या,’अल्पशिक्षितांपेक्षा सुशिक्षित वर्गालाच सर्वार्थाने जागृतीची गरज आहे. कालसर्पयोग या पूजा विधीतील फोलपणा त्यांनी स्वतः अनुभवल्याचा किस्सा सांगितला.कर्मकांडातून सुख समाधान मिळते यासमजामुळे अंधश्रद्धा महिलांमध्ये जास्त प्रमाणात फोफावतात याची खंत त्यांनी व्यक्त केली. वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सत्यशोधकी विचारांचे जागरण घडवून आणल्याबद्दल आशाताईनी विजय लुल्हे यांचे कौतुक केले.
प्रारंभी प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. महात्मा फुले लिखित सत्यशोधक समाजाची सामुदायिक प्रार्थना झाली. प्रस्तावना व आभार कार्यक्रमाचे संयोजक विजय लुल्हे ( जिल्हा समन्वयक , सत्यशोधक समाज संघ,जळगाव ) यांनी केले. पिताश्री अण्णासो.सुपडू सुतार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ विजय लुल्हे मान्यवरांसह उपस्थितांना महात्मा जोतीराव लिखित तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायकांच्या संदर्भात लिहिलेली प्राध्यापक गौतम निकम ( चाळीसगाव ) लिखित वाचनीय वैचारीक पुस्तकांची ग्रंथभेट दिली. प्रारंभी प्रमुख अतिथींचा परिचय व दमदार सूत्रसंचालन सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक प्रमोद पाटील सर यांनी करून दिला. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार शाल व वाचनीय ग्रंथ देऊन संयोजक विजय लुल्हे , बाळकृष्ण लुल्हे,समीक्षा लुल्हे,अक्षय बुंदेले एडव्होकेट देवश्री तांबट यांनी केले. कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार, संजीव मिस्री, निवृत्त स्थापत्य अभियंता भानुदास सोनवणे, साहित्यिका डॉ.वंदना नंदवे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरीनाथ महाजन , प्रकाश महाजन,प्रविण माळी ( मुख्याध्यापक न्यू इग्लिश स्कूल प्राथमिक विभाग ), कलाशिक्षक शाम कुमावत , मोहन माळी ,भुषण पाटील,ग्रंथपाल सुदर्शन बडगुजर, सुनिल माळी यांनी अमूल्य सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here