Home Education आधुनिक काळातील विज्ञानसूर्य : स्टीफन हॉकिंग

आधुनिक काळातील विज्ञानसूर्य : स्टीफन हॉकिंग

90

आधुनिक काळातील विज्ञानसूर्य म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा आज स्मृतिदिन. ५ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १४ मार्च २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रॅंक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. स्टीफन हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी डॉ. फ्रॅंक आणि इसाबेल या दाम्पत्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्ड येथे स्थलांतर केले, कारण तेंव्हा दुसरे महायुद्ध चालू होते. पण काही दिवसांतच ते पुन्हा लंडनला परतले कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनमध्ये पार्सिटोलॉजी विभागाचे प्रमुख बनले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १०५३ अशी तीन वर्ष त्यांनी सेंट अल्बान्स स्कुल फॉर गर्ल्स या शाळेत शिक्षण घेतले. ही शाळा मुलींची असली तरी तिथे मुलांनाही प्रवेश दिला जात होता. स्टीफन लहानपणापासून हुशार होते.

त्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि संगीताची खूप आवड होती. स्टीफन हॉकिंग यांनी ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात विश्व उत्पत्ती शास्त्राचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतला, पण अवघ्या २१ व्या वर्षी अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (एएलएस ) या असाध्य रोगाने त्यांना ग्रासले. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्ष जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला पाहून त्यांना आशेचा किरण दिसू लागला. या आजाराने त्यांना बहुविकलांगत्व आले.

चालण्याफिरण्यासाठी त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. मग व्हील चेअरवर एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरुन ते संगणकावर काम करू लागले. १९८५ साली त्यांना न्यूमोनिया झाला. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेनंतर त्यांचा आवाजही गेला पण त्यांनी हार मानली नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मकता, कार्यमग्नता आणि जीवनाविषयीचे प्रेम या गुणांच्या जोरावर त्यांनी दुर्धर आजारावर मात करीत कृष्णविवरासंदर्भात अनेक संशोधन करुन जगाला अचंबित केले.

कृष्णविवरासंदर्भात त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाने अनेक विक्रम केले. या पुस्तकावर आधारित अनेक मालिका व चित्रपट निघाले. रॉजर पेनरोज या सहकाऱ्याच्या मदतीने त्यांनी सापेक्षतेवादाच्या सिद्धांतावर आधारित अवकाश व काळाची सुरवात बिगबँगमध्ये झाली असेल तर कृष्णविवरात शेवट असेल असा सिद्धांत मांडला. कृष्णविवरे काळी नसतात. कृष्णविवरे उत्सर्जन करतात. ब्रह्मांडाला कोणतीही सीमा नाही असे सिद्धांत त्यांनी मांडले. त्यांची अनेक संशोधने ही काळाच्या पुढची होती. म्हणून त्यांना आधुनिक काळातील न्यूटन असे म्हणतात. स्टीफन हॉकिंग यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी व स्तिमित करणारे आहे. काळाच्या पुढे असणारा हा शास्त्रज्ञ आधुनिक काळात होऊन गेला, ही गोष्टच पुढील पिढीला स्तिमित करणारी ठरेल. स्टीफन हॉकिंग यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here