Home Education हवालदिल बळीराजाला सावरा

हवालदिल बळीराजाला सावरा

104

फेब्रुवारी-मार्च महिना आला की, बळीराजाच्या मनात धडकी भरते. कारण फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत पिके काढणीला आलेली असतात वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार असते. वर्षभराची बेगमी तयार झालेली असते त्यामुळे चेहऱ्यावर समाधानाचे भाव असतात मात्र त्याचवेळी मनात भीतीही असते कारण कधी अवकाळीचा फेरा येईल आणि कधी होत्याचे नव्हते होईल अशी मनात धास्ती निर्माण होते. बहुतेकदा ही धास्ती खरी ठरते आणि चेहऱ्यावरच्या हास्याचे अश्रूत रूपांतर होते. मागील काही वर्षांपासून हेच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. यावर्षीही तेच झाले मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने बळीराजाच्या हातचा घास हिरावून घेतला. उभे पीक क्षणात आडवे झाले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उभ्या पिकाची नासाडी झाली.

उभ्या पिकाची नासाडी झाल्याने बळीराजा हवालदिल झाला. कांदा, गहू, द्राक्षे, डाळिंब, मोसंबी, सफरचंद, केळी, कोथिंबीर, हरभरा आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. ऐन सुगीच्या काळात आसमामी संकटाने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणले. वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी पडल्याने शेतकरी हवालदील झाला. अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या बळीराजाला या संकटातून सावरण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले याबद्दल सरकारचे आभार मानावे लागतील मात्र पंचनामा हा सोपस्कार ठरू नये ही अपेक्षा कारण दरवेळी पंचनामा होतो पण नियमांच्या कचाट्यात बळीराजाला अडकवले जाते त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास अनके अडचणी निर्माण होतात. सरकारने बळीराजाच्या हिताचा विचार करून तातडीने पावले उचलायला हवीत.

शेती करण्यासाठी बळीराजा सोसायटी, बँक किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज काढूतात. वेळीच कर्ज फेडले नाही तर कर्जाचा डोंगर उभा राहतो. हे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. हे कर्ज जर फेडता आले नाही तर बळीराजाला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे राज्यात आत्महत्येचे सत्र सुरू होते. राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरू होऊ द्यायचे नसेल तर सरकारने बळीराजाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी. वास्तविक दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळते. गेल्या पाच दहा वर्षांपासून तापमान बदलामुळे कधी कमी तर कधी अधिक तापमान असते. काहीवेळा गारपीट, मुसळधार पाऊस, यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. पारंपरिक पीक यावेळेस नुकसान करत नाही. मात्र दूरदृष्टीने शेती केल्यास अशा अचानक आलेल्या संकटांवर मात करता येऊ शकते.

हवामान बदल, तापमानवाढ, अलनिनो यासारख्या गोष्टींमुळे यापुढे असे आसमामी संकट नेहमीच येणार आहे. त्यामुळे बळीराजाने आपली पीक पद्धती बदलणे गरजेचे आहे. निसर्गात मानवाने अवास्तव ढवळाढवळ केली आहे त्यामुळे यापुढे निसर्ग देखील आपले रौद्ररूप दाखवणारच आहे त्यामुळे निसर्गाच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा येणाऱ्या संकटांवर कशी मात करता येईल याचा विचार बळीराजाने करावा. शेतकरी, शासन, प्रशासन आणि कृषी संशोधक यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here