Home Education सनातन धर्माला अमृता फडणवीस फाट्यावर मारतात त्याचे काय ?

सनातन धर्माला अमृता फडणवीस फाट्यावर मारतात त्याचे काय ?

242

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

‘महाराष्ट्र केसरी’ च्या कुस्ती मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “सनातन धर्म की जय ।” अशी घोषणा दिली. सध्या त्यावरून वादंग सुरू आहे. कुस्तीच्या मैदानात धर्माचा जयजयकार आजवर कुणीच केला नव्हता. कारण तिथे फक्त खेळ हाच धर्म असतो. खेळाला अजून कुणी धर्म चिटकवला नव्हता. फडणवीसांनी तो चिटकवला. फडणवीस तो चिटकवणारच कारण धर्म हा त्यांचा पिढीजात भांडवली धंदा आहे. धर्माच्या नावाने ते, त्यांचे पुर्वज, पै-पाहूणे पिढीजात जगत आलेत. देव आणि धर्म त्यांची रोजगार हमी योजना आहे. विनासायास पोट चालवणा-या, श्रेष्ठत्व देणा-या, लोकांचे शोषण करण्याची एकतर्फी परवानगी देणा-या सनातन धर्माचा जयघोष करायचा नाही तर करायचा कशाचा ? त्यामुळे ते हल्ली जास्तच धर्म धर्म करतात. त्यात ते ज्या पक्षाचे काम करतात त्याचेही भांडवल धर्मच आहे. त्यामुळे जाईल तिथे धर्म धर्म करत लोकांना मुर्ख बनवता येते. आपल्याच विनाशाची भांग प्यायलेल्या बहूजनांना धर्म म्हंटलं की कोण फुरफुरी येते काय माहित ? मेंदू नावाचा प्रकार डोक्यात असतो, तो चालवायचा असतो ? याचे त्यांना भानच रहात नाही. अनेक मोठमोठे लोक सांगून सांगून थकले, संपले पण ही मेंढर येड्याच्या कळपातून बाहेर यायला तयार नाहीत. भट, बडवे धर्माचे नाव घेतात, दुटप्पी वागतात हे त्यांना अजून समजत नाही. धर्माचा वापर केवळ बहूजनांना फसवण्यासाठी, त्यांच्यावर सत्ता गाजवण्यासाठी केला जातो. त्यांचे सामाजिक, राजकीय व आर्थित शोषण करण्यासाठी केला जातो हे त्यांना अजून उमजत नाही.

“सनातन धर्म की जय ।” म्हणणा-या देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस वेळोवेळी फडणवीसांचा सनातन धर्म फाट्यावर मारतात. त्या ज्या पध्दतीने वागतात, बोलतात ते सनातन धर्माच्या आचरणाच्या चौकटीत कुठेच बसत नाही. सनातन धर्माने स्त्रीला ज्या मर्यादांचा उंबरठा घालून दिला आहे तो कधीच त्यांनी उखाडून टाकला आहे. अमृता फडणवीस यांच्यासमोर सनातन धर्म टनाटन उड्या मारत कोप-यात जाऊन कधी बसतो ते कळत नाही. कुस्तीच्या मैदानात “सनातन धर्म की जय । म्हणणारे देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस यांना तो समजून सांगणार का ? सनातन धर्माच्या मनूस्मृतीने स्त्रीला ज्या मर्यादा घातल्या आहेत त्या मर्यादा पाळायला त्यांना सांगणार का ? सनातन धर्माची चौकट जोपासायला सांगणार का ? पाश्चिमात्य संस्कृतीचे वेड झुगारून सनातन संस्कृती जोपासायला सांगणार का ? ते तिथं असे सांगू शकत नाहीत. कारण तो फक्त बहूजनांनी आचरायचा आहे. त्यांचे हे दुटप्पी वागणे धर्माची भांग प्यायलेल्या लोकांना नाही समजणार. सनातन धर्माने स्त्री साठी जी चौकट सांगितली आहे ती अमृता फडणवीस जोपासत नाहीत त्याचे काय ?

अमृता फडणवीस ज्या पध्दतीने वागतात, जगतात ते चड्डीवाल्यांच्या संस्कृती कोषातही अजिबात बसत नाही. त्यांच्या या वागण्या-बोलण्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप नाही. त्या मुक्तपणे जगतायत आणि त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी खुषाल गायन कराव, नर्तन करावं, राजकारण कराव, राजकारणावर बोलावं आणि त्यांना वाट्टेल ते करावं. त्यांना आम्हाला काहीच सांगायचे नाही. त्यांनी काय करावं ? हा त्यांचा अधिकार आहे. या देशात लोकशाही आहे. त्यांनी काय कराव ? कसं वागावं ? त्यांनी काय घालावं ? त्यांची राजकीय मतं काय असावीत ? हा सगळा त्यांचा हक्क आहे. आम्हाला त्यावर अजिबात बोलायचं नाही. उलट त्यांच्या या स्वातंत्र्याचा आम्हाला पुर्ण आदर आहे. पण सनातन धर्माचा, संस्कृतीचा प्याला लोकांना जरा जास्तच पाजून खुळे करणा-या बीजेपीवाल्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. अमृताजी फडणवीसांचे वागणे बसते का तुमच्या सनातन धर्मात, सनातन संस्कृतीत ? तुमच्या सनातन धर्माला हे मान्य आहे काय ? हल्ली सतत चिडणा-या व उर्फी जावेदला तंबी देणा-या संस्कृती रक्षक चित्रा मावशींना त्यांचे वागणे मान्य आहे काय ? नंगाट होवून समुद्र किनारी पळालेला, नंगाट होवून मधू सप्रेला मिठी मारत अजगराचा विळखा घेतलेला मिलिंद सोमन पासून ममता कुलकर्णी पर्यंत कुणीच कधी संस्कतीला धक्का लावलेला नाही.

सई ताम्हणकर, धर्म रक्षक केतकी चितळे वगैरे पोरी नेहमीच चापून चोपून घातलेल्या कपड्यात असतात. उर्मिला मातोडकरचे तनहा तनहा चित्रा मावशींना आठवत नसेल कदाचित. यातले कुणी संस्कृतीला धक्का लावत नाही, फक्त उर्फीच संस्कृती मोडीत काढते आहे. म्हणूनच चित्रा मावशी खवळतात. उर्फीवर खवळणा-या चित्रा मावशींना अमृता फडणवीसांचे वागणे मान्य आहे काय ?

अमृता फडणवीस माजी मुख्यमंत्र्याच्या व विद्यमान उपमुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी आजवरच्या प्रचलित परंपरेला फाटा देत थेट राजकारणावर भाष्य करायला सुरूवात केली. विरोधकांच्यावर तुटून पडायला सुरूवात केली. त्यांनी लोक काय म्हणतील ? आजवरची परंपरा काय होती ? याचा अजिबात विचार न करता स्वत:ची मते ठामपणे मांडली. त्या खुप वादग्रस्त ठरल्या. त्यांना खुप ट्रोल केले गेले पण त्या हटल्या नाहीत. त्यांनी त्यांचा ठेका सोडला नाही. कितीही ट्रोल केले तरी त्या डगमगल्या नाहीत. यापुर्वी आम्ही अमृता फडणवीस यांना ट्रोल करणाच्या विरोधात भूमिका घेत त्यांची बाजू घेतली होती. आजवरच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नींचे अस्तित्व काकूबाई टाईपचे होते. त्या कधी व्यक्त होत नव्हत्या. विरोधकांच्यावर टिका करत नव्हत्या. राजकारणावर बोलत नव्हत्या. त्यांच्या डोक्यावरचे पदर कधी ढळत नव्हते. उंब-याच्या बाहेर कधी त्यांचे दर्शन होत नव्हते. दर्शन फक्त वार्षिकी असे ते ही आषाढी वारीला पंढरपुरात विठ्ठलपुजा करताना. इतरवेळी त्या कधीच दिसत नव्हत्या. पण या सगळ्या परंपरेला अमृता फडणवीस यांनी फाटा दिला. त्या धीटपणे पुढे येत स्वत:ची मते ठामपणे मांडत राहिल्या. विरोधकांना तोडीस तोड उत्तरं देत राहिल्या. नव-याच्या मागे भूमिका घेवून उभ्या राहतात. विशेष म्हणजे सनातन धर्म की जय। ची घोषणा देणा-या देवेनभाऊनीही त्यांना मुक्तपणे मोकळीक दिली.

त्यांच्यावर नवरोबाचे प्रेशर टाकले नाही. स्व प्रतिष्ठेच्या, घराण्याच्या इभ्रतीचा, संस्कृतीचा, धर्माचा बडेजाव मांडून त्यांचे पाय बांधले नाहीत. त्या स्टेजवर नाचल्या, गाणी म्हंटल्या, अपु-या कपड्यात नाचल्या. अंगप्रदर्शन केले पण देवेनभाऊंनी त्यांना कोंडून घालण्याचा प्रयत्न केला नाही. या बद्दल त्यांचेही कौतुक करावे लागेल. पण तेच देवेनभाऊ घराबाहेर मात्र सनातन धर्म की जय कसे म्हणतात ? अगदी कुस्तीच्या मैदानात घुसून घोषणा कसे देतात ? त्यांच्या पत्नीचे वागणे त्यांच्याच सनातन धर्मात बसते का ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांना अमृता फडणवीसांचे वागणे मान्य असेल तर हल्ली नंगनंग नगाट चा नारा देणा-या चित्रा मावशींना पक्ष कार्यात जास्त लक्ष घालण्यास सांगावे. लोकांच्या मुलभूत समस्यांवर काम करण्यास सांगावे.

अमृता फडणवीस मंगळसुत्र घालत नाहीत. सनातन धर्माला अपेक्षित असेलेल्या स्त्री सारखे अजिबात वागत नाहीत. त्यांचे वागणे, बोलणे आणि त्यांची भूमिका सनातन धर्माला फाट्यावर मारणारी आहे. त्यांनी मंगळसुत्राबाबत केलेले भाष्य, त्यांचा नाच, त्यांची कपडे सगळच सनातन धर्माला कोलणारे आहे. या बाबत चड्डीवाले, संस्कृतीचे ठेकेवाले, चित्रामावशी बोलणार का ? हाच खरा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here