Home महाराष्ट्र चिमूर मतदारसंघातिल नागभीड येथे 300 कोटी रुपये कामांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र...

चिमूर मतदारसंघातिल नागभीड येथे 300 कोटी रुपये कामांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

170

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 21डिसेंबर):-गावातील रस्ता हा शहरापर्यंत तर शहर हे गावातील रस्त्याला सहजपणे जोडले जाते. त्यावेळी खऱ्या अर्थाने गावांमध्ये समृद्धी येते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

नागभीड येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव श्री. साळुंखे, नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते, अधीक्षक अभियंता श्री. गाडेगोणे, नागभीडच्या कार्यकारी अभियंता जया ठाकरे, श्री. टांगले, सुनील कुंभे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या क्षेत्रात गेली अनेक वर्षे सातत्याने विकास कामे होत आहे. असे सांगून मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, मागील अडीच वर्षात अनेक विकास कामांना ग्रहण लागले. या क्षेत्रातील 14 कि.मी. लांबीचा अपूर्ण रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती मदत करणार असून या भागातील 100 कि.मी.चे सर्व रस्ते दर्जाउन्नती करावयाचे आहे. दर्जा उन्नतीसाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून देण्यात येईल. हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत विकास कामांना गती देण्याचे काम केल्या जात आहे. हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत जवळपास 10 हजार कि.मी.च्या कामांना मंजुरी दिली. त्यापैकीच काही कामांचे लोकार्पण आज या ठिकाणी पार पडत आहे.

मंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले, गतिमान सरकार कसं असावं व गतिमान सरकार होण्यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी गावातील रस्ता हा शहरापर्यंत जोडला पाहिजे आणि शहर हे गावातील रस्त्याला सहज जोडले जाते, त्यावेळी खऱ्या अर्थाने गावांमध्ये समृद्धी येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कष्टकरी समाज, महिला व विद्यार्थी वर्ग सर्वांना विकासाच्या खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहे. किसान सन्मान योजनेचे प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा केले जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात धान पिकतो धानाला चांगला भाव मिळवून देण्याचे काम तसेच गेल्या 6 महिन्यात सिंचनाच्या विविध भागात असणाऱ्या 18 योजनांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम या सरकारने केले आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचं काम होत आहे. आज या क्षेत्रातील 300 कोटीपेक्षा जास्त विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न होत आहे.

आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी घेताच मंत्री श्री. चव्हाण यांनी मागील पावसाळी अधिवेशनात 500 कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासकामांसाठी मिळवून दिले, हे सर्वात मोठे योगदान आहे. तर नागभीड बसस्थानकासाठी 6 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. लवकरच या बसस्थानकाचे भूमिपूजन देखील करण्यात येईल. मंत्री श्री. चव्हाण यांनी चालू हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीत 50 कोटी रुपये निधी या क्षेत्राच्या विकासकामांसाठी मंजूर करून दिला आहे. मागील अडीच वर्षातील विकास कामांचा बॅकलॉग या माध्यमातून भरून काढण्यात येत आहे. चिमूर विधानसभा क्षेत्र विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही, अशी ग्वाही आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी दिली.

चिमूर,नागभीड या मतदारसंघात 300 कोटी कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडत आहे. रस्ते, पुल व इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्त्वाची कामे आहेत. महाराष्ट्रात हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत रस्त्यांची विविध कामे सुरू आहेत, तर 149 रेल्वे उड्डाणपुलाची काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा सचिव म्हणून सर्व कामे उच्चप्रतीची गुणवत्तापूर्ण व कमी कालावधीत पूर्णत्वास येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) श्री.साळुंखे यांनी यावेळी दिली.

तत्पूर्वी, मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते नागभीड तालुक्यातील 750 मी. लांब 5 मी. उंची तर 350 मी. लांब व 5 मी. उंचीच्या दोन कॅटल अंडरपासचे भूमिपूजन पार पडले. त्यासोबतच क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आभासी पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता लोचन वानखेडे तर आभार राजू देवतळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here