Home बीड गेवराई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर; राष्ट्रवादी काँग्रसने मिळवले वर्चस्व

गेवराई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर; राष्ट्रवादी काँग्रसने मिळवले वर्चस्व

110

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.20डिसेंबर):- तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी प्रकिया मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी गेवराई येथील पंचायत समिती कार्यालय येथे पार पडली. दहा टेबलावर मतमोजणीच्या एकुण ९ फेऱ्या झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५० तर शिवसेना १५ व भाजपला ११ जागेवर समाधान मानावे लागले. तर महिला आरक्षणामुळे ३८ जागेवर महिलांचे वर्चस्व राहिले आहे.

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदती संपलेल्या गेवराई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवार दि.१८ डिसेंबर रोजी मतदान झाले. मतदान पार पडलेल्या ७६ ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी गेवराई येथील पंचायत समिती कार्यालय येथे सकाळी १० वा. पासून मतमोजणी सुरु झाली तर एकुण ९ फेऱ्या होवून ७६ ग्रामपंचायतचा निकाल तहसीलदार सचिन खाडे यांनी घोषित केला. दरम्यान, मतमोजणी ठिकाणी मोठ्या फौजफाट्यासह पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

धोंडराई, सिरसदेवी, दैठणसह ढोक व सुशी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील नवयुवती शितल साखरे हिला गांवकऱ्यांनी संधी देत मोठ्या मतांचा कौल दिला. तर सिरसदेवी या जिल्हा परिषद सर्कल असणाऱ्या ग्रामपंचायतींसह सिरसदेवी, कोळगाव, दैठण, खांडवी, वडगाव ढोक, सुशी या ग्रामपंचायती माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात आल्या आहेत.

जनतेनी दिली गावच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारास संधी

गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव/ बेलगुडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत येथील पत्रकार भागवत जाधव यांच्या मातोश्री लताबाई जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या. दरम्यान, येथील जनतेने गावच्या सर्वांगीण विकासासाठी मतदानरुपी भरघोस मतांचा कौल देवून पत्रकारास सरपंचपदाची संधी दिली.

मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या प्रेरणा प्रतापसिंह पंडित राष्ट्रवादी कडून विजयी

गेवराई तालुक्यातील दैठण ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल मधून विजयी झाली. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणा प्रतापसिंह पंडित शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव करून विजयी झाल्या आहेत.

चिठ्ठी काढून तीन ठिकाणचा निकाल घोषित

गेवराई तालुक्यातील भोजगाव, बंगाली पिंपळा व एरंडगाव येथील सदस्याला समसमान मते मिळाल्याने १४ वर्षीय मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून निकाल घोषित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here