Home चंद्रपूर बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन- पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन- पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद

189

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर, दि. 8 : बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंधक नियम 2022 देखील लागू करण्यात आला आहे. त्यानसार बाल विवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे.

या अनुषगांने 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया या दिवशी संभावित बाल विवाहाच्या घटना थांबवण्यासाठी सर्व यंत्रणानी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमतील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. ग्रामीण भागात ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व अंगणवाड़ी सेविका यांना सहाय्यक अधिकारी म्हणून तसेच शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व पर्यवेक्षिका यांना सहाय्यक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी सर्व खबरदारी घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. बालविवाह होत असल्यास किंवा होण्याची शक्यता असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा चाईल्ड लाईनचे हेल्प लाईन क्र.1098 ला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

18 वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन वधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपयापर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. जाणिवपूर्वक बालविवाह ठरविल्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडल्यास किंवा प्रोत्साहन देणा-या व्यक्तिस तसेच संबंधित वरवधु यांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक व मित्र परिवार, धार्मिक स्थळाचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटींग प्रेस, वाजंत्री, लग्न सभागृहचे व्यवस्थापक, कॅटरींग अशा सर्वांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाही, व जे अशा विवाहात सामील झाले, त्या सर्वांना 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपये पर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकते. सोबतच जर ग्रामसेवकांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर सुध्दा कायद्ययान्वये कार्यवाही करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here