Home मुंबई प्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती का घडून येत नाही?

प्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती का घडून येत नाही?

46

 

युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. तर, २५ डिसेंबर १९२७ रोजी विषमता, जातीयता, निर्दयता, उचनिचता, अन्याय अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या मनुस्मृती ग्रंथाला जाहिर मुठमाती दिली, तिचे जाहिर दहन केले.१९९९ मध्ये गुजरातमध्ये मनुचा प्रतिकात्मक पुतळा उभारला गेला होता. म्हणून त्याचं महाड क्रांतीभूमीत पँथर भाई संगारे यांनी २० मार्च १९९९ रोजी, बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ चवदार तळे क्रांतीदिनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करतांना ते गंभीररित्या भाजले गेले आणि उपचार चालू असतांनाचं आंबेडकरी चळवळीतील झंझावात, लोकप्रिय, वादळी, प्रभावी, आक्रमक वक्ता, ज्वलंत अंगार, वकृत्वाची धगधगती तोफ, पँथर जसलोक रुग्णालयात अखेरपर्यंत मृत्यूशी झुंज देत १ एप्रिल १९९९ रोजी कायमचा शांत झाला, शहिद झाला, अजरामर झाला. मात्र, भाईंच्या भोवती कार्यकर्त्यांचा सतत घोळका असतांना, ते एवढे गंभीररित्या कसे भाजले जाऊ शकतात, हा प्रश्न आजही अनुत्तरीतचं आहे.महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारने बंदी घातलेल्या कुप्रसिद्ध मनुस्मृती ग्रंथावरील बंदी झुगारुन, तो पुन्हा महाराष्ट्रात काही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.बिनडोक संभाजी भिडे तर मनुचं सातत्याने आजही समर्थन करतात. राज्यस्थानमध्ये तर एका न्यायालयासमोरचं मनुचा पुतळा आजही उभा आहे. त्यामागे दृष्टीकोन काय आहे माहित नाही. पण विषमता, जातीयता, निर्दयता,उचनिचता,अन्याय अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या मनुचा पुतळा हटवा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
पँथर भाई संगारे यांच उभं आयुष्य म्हणजे चळवळीतील धगधगता प्रेरणादायी रणसंग्राम. पण,त्यांच्या आकस्मित निघून जाण्याने चळवळीतील तो प्रेरणादायी रणसंग्राम आणि संघर्ष बोथट झाला.दलित पँथर चळवळीतील व त्यानंतरचे त्यांचे कारनामे व रिपब्लिकन पुढार्‍यांच्या खिल्ल्या प्रसिद्ध आहेत. दलित पँथरची निर्मिती, नामांतराचा लढा, रिडल्स प्रकरण रिपब्लिकन गटा तटाचे ऐक्य याबाबत त्यांची भूमिका सडेतोड आणि स्पष्ट होती. त्यांच्या स्वभावातील कृतीशीलपणा व निर्भिडपणामुळे कोणत्याही विषयावर त्यांची प्रतिक्रिया उत्स्फुर्त,मार्मिक आणि मिश्किल असायची. संघटन कौशल्य,संकटास सामोरे जाण्याची त्यागी वृत्ती त्यांच्याकडे होती. डोक्याला कफन बांधून त्यांनी आपले सर्वस्वी जीवन चळवळीला वाहून घेतले होते. त्यांना मरणाची भिती नव्हती ना परिणामाची. त्यांच्या निष्ठा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान पवित्र परिवर्तनवादी कार्याला, संघटनेला व समाजाला वाहिल्या होत्या.तडफदार आवाज आणि भाषण करण्याच्या विशिष्ट शैलीमुळे, स्वभावामुळे ते आंबेडकरी चळवळीत सर्वांचे आवडते बनले. त्यांच्याकडे स्वाभिमान, आत्मविश्वास आणि दूरदृष्टी होती. त्यांच्या याचं गुणांमुळे व चळवळीतील सर्वस्वी योगदानामुळे त्यांनी आपला दबदबा सर्वत्र निर्माण केला होता. आपण ज्या समाजाचे नेतृत्व करतो, त्यांच्याशी आपली बांधिलकी आहे, त्यांच्यासाठी आपलेही काही तरी कर्तव्य आहे याची त्यांना पुर्ण जाणीव होती. अन्याय,अत्याचार,विषमता यांच्याविरुध्द प्रत्यक्ष कृतीतून लढणारे ते लढवय्ये निडर होते. १९९६ मध्ये गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील चावंड गांवी (तालुका लाठी) अय्यर समाजांने मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार केले त्यावेळी भाईंनी गुजरातमध्ये जाऊन मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून दिला होता. उध्दव ठाकरे हे उद्याच्या महाराष्ट्राचे कर्तेकरविते असतील असे त्यांनी १९९८ ला एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. तसेच १९९९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील शिरगांवमध्ये तलाठी मारहाण प्रकरणी त्यांनी मनोजभाई संसारे,रवीभाऊ गरुड,सुरेशदादा पवार,दिलीप उन्हाळेकर,अनिल कदम,भाई कांबळे,राम पाटणकर,गोपी मोरे,मारुती सोनावणे, नाना चासकर अशा शेकडो कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्गात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो लोकांचा मोर्चा काढला.पण,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला स्वतः न जाता मनोजभाई संसारे,रवीभाऊ गरुड,सुरेशदादा पवार अशा आपल्या काही कुशल शिलेदारांना पाठवून स्वतः मोर्च्यासमोरील जनसमुदायाशी संवाद करीत राहिले. म्हणजे भाईंना आपल्या मृत्यूची चाहूल तर लागली नव्हती ना, म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आपले उत्तराधिकारी पाठविले असतील ?
भाईंचे व्यक्तिमत्त्व झुंजार,तडफदार,अष्टपैलू होते.त्यांचे वकृत्व आणि कर्तृत्व स्फुर्तीदायक,क्रांतीकारी होते. ‘जयभीम के नारे पे खून बहे तो बहने दो..’ हि त्यांची घोषणा समाजमनात अंगार, रोमांच निर्माण करीत असे. ‘पागलोंके बजार में पत्थरोंका व्यापार,’ ‘वर भगव खाली नागव’ अशा त्यांच्या अनेक घोषणाही लोकप्रिय, लोकमान्य झाल्या होत्या. त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये, चळवळीमध्ये नेहमीचं जोश,ऊर्जा होती. म्हणूनचं दलित पँथर चळवळीत ते हिरामण संगारेचे ‘भाई संगारे’ बनले. आज चळवळीमध्ये भाईंची उणीव प्रकर्षांने सतत जाणवते, खरचं भाई आज पाहिजे होते. मात्र,त्यांनी चळवळीत कर्तृत्वाची क्रांतिकारी ज्योत कायम तेवत ठेवली आहे ती सर्वांना प्रेरणादायीचं आहे.
आंबेडकरी चळवळीत काम करतांना भाई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार क्षेत्राकडेही वळले. म्युनिसिपल कामगार युनियनच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन, महिला सफाई कामगारांना कपडे बदलण्यासाठी चौक्या बांधून घेतल्या व इतर अनेक कामगारांच्या समस्या सोडविल्या. महादेव पवार आणि युनियनचे खजिनदार दिवं. विठ्ठल मोरे यांच्यामुळे मला भाईंना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटता आले.अंगात सफेद सदरा, लेंगा आणि चॉकलेटी रंगाची मोजडी, गोल्डन फ्रेमचा चष्मा,बोटात बुध्दाची प्रतिमा असलेली जाडजूड सोन्याची अंगठी,गळ्यात सोन्याचे आवरण असलेली मॅग्नेटची माळ,सदर्‍याला अशोक चक्रांतीक बनवून घेतलेली बटणे असा त्यांचा नेहमीचं थाटमाट रुबाबदार असे. भाईंच्या माध्यमातूनचं दिवं. बन्सी डोळस, सुरेश पवार,अविनाश संगारे, दिलीप उन्हाळेकर,प्रशांत खरात, मिलिंद कांबळे, दिवं.रामचंद्र पाटणकर, दिवं.अंकुश जाधव असे अनेक मान्यवर सहकारी मंडळी मिळाली. भाईंच्या हस्ताक्षरातील सिंधुदूर्ग जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र आजही मी जपून ठेवले आहे. एवढेचं नव्हे तर, १/२ वेळा भाईंना मी ड्राफ्टिंगही मी करुन दिले होते त्याची आठवण आजही आमचे मित्र दिलीप उन्हाळेकर करुन देतात. पण भाईंचा सहवास जास्त लाभला नाही हि खंत आजही मनात आहे.
दलित पँथरची निर्मिती तसेच उदय हा अन्याय अत्याचार,त्यातचं तथाकथित रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाचा संधीसाधूपणा, सामाजिक आर्थिक स्थिती, जाणीवा तसेच सांस्कृतिक संघर्ष अशा अनेक प्रश्नी तरुण वर्गातील कमालीच्या चिड व नैराश्यातून संतप्त युवकांनी बंडखोरीची तुतारी फुंकली आणि दलित पँथरची पहिली बैठक ९ जुलै १९७२ रोजी, सिद्धार्थ नगर, मुंबई येथे हजारो युवकांच्या उपस्थित संपन्न झाली. वर्षभरापुर्वी महाराष्ट्रात सर्वत्र दलित पँथरचे सुवर्ण महोत्सव संपन्न झाले. सुवर्ण महोत्सव हे केवळ कौतुक सोहळे न राहता त्यातून काही तरी प्रेरणा घेऊन चळवळ सक्षम झाली पाहिजे, चळवळीला दिशा मिळाली पाहिजे. आपल्या चळवळीला महापुरुषांचा वैचारिक वारसा, प्रेरणा आहे. मग,त्याच प्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती का घडून येत नाही? आपण कुठे कमी पडतो? कारण, १९७० च्या दशकापेक्षा आजची परिस्थितीही अत्यंत भयानक आहे. आजूबाजूची विखारी परिस्थिती आणि वर्तमानकाळातील घटना पाहून, भविष्याचा गांभिर्याने विचार होतांना दिसून येत नाही. आज चळवळीकडे कृती कार्यक्रम नसल्याने, उदासिनता निर्माण झालेली आहे. अन्याय अत्याचार, भावनिकतेपुरती चळवळ मर्यादित असून, समाज निवडणूकापुरता जागा होत आहे आणि आपल्या गटा तटाचं अस्तित्व अबाधित राखण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी रोगाची साथ पसरावी तशा अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतात.त्याला रिपब्लिकन गटा तटाचे नेते पायबंध घालण्यास, इतर मुलभूत प्रश्नी आणि राजकीय वाटचालीत सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यातचं, देशात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काही घटना घडत असून, संभ्रम, बुध्दीभेद व भावनिक,हिंसक बनविण्याचे कुटील षडयंत्र रचले जात आहे.विषमतावादी मुल्यांचा प्रसार आणि प्रचार अत्यंत सोज्वळ व पद्धतशीरपणे करण्यात राष्ट्रीय पातळीवर काही संघटना क्रियाशील तसेच प्रगतीपथावर आहेत. जातीयतेचे स्वरुप मानसिकतेत परावर्तीत झाले असून ते जातीयव्देष आणि स्फोटक, भयावह वाटते. अशा वेळी, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या चळवळीला प्रकाशमान, गतीमान करण्यासाठी तरुण वर्गाने गटा तटाचे राजकारण न करता कार्यान्वित, दिशादिग्दर्शक बनून, चळवळीला सर्वसमावेशक दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले पाहिजे. एवढेचं नव्हे तर, उपेक्षित वर्गामध्ये जनजागृती करुन, त्यांनाही सामाजिक,राजकीय ऐक्यासाठी प्रेरीत करावे लागेल तसेच राजकीय, सामाजिक चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्नशील,कटिबद्ध होऊन, स्वाभिमानांने सर्वशक्तीनिशी एकसंघ दमदार वाटचाल करणे हिचं आदर्शवत, प्रेरणादायी शहिद पँथर भाई संगारेंना २५ व्या स्मृतीदिनी खरी मानवंदना ठरेल. शहिद पँथर भाईंना स्मृतीदिनी विनम्रतापुर्वक अभिवादन !

मिलिंद कांबळे, चिंचवलकर, मुंबई. मो.9892485349

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here