Home गडचिरोली झाडीबोली साहित्य व संस्कृती जतनासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करण्यास मंजूरी...

झाडीबोली साहित्य व संस्कृती जतनासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करण्यास मंजूरी सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी विद्यापीठ अधिसभा बैठकीत मांडला प्रस्ताव

52

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

 

गड़चिरोली : झाडीबोली साहित्य व संस्कृतीचे जतन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करण्याचा सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांचा प्रस्ताव नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठ अधिसभा बैठकीत विविध प्रश्नांसह अनेक प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली.
गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चंद्रपूर व गडचिरोली हे दोन जिल्हे येतात. हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जातात. या झाडीपट्टीत बोलल्या जाणाऱ्या झाडीबोलीने आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. अनेक वर्षापासून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात झाडीबोलीचे प्रमाण खूप आहे. यावर साकोली येथील झाडीबोलीचे गाढे अभ्यासक प्रा. हरिश्चंद्र बोरकर यांनी या झाडीबोलीवर अनेक साहित्य निर्मिती केलेली असून या झाडीबोलीला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी सदैव केलेले आहे. त्यांच्याच सोबत व वारसा चालवत या परिसरातील अनेकांनी झाडीबोलीतून विविध प्रकारचे साहित्य, काव्य, नाट्यसंपदा, चारोळी इत्यादी प्रकारचे साहित्य निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे.
झाडीपट्टीची बहिणाबाई म्हणून कवयित्री श्रीमती अंजनाबाई खुणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते, तर चारोळीकार म्हणून नागभीडचे प्रसिध्द मराठी साहित्यिक प्रा. राजन जयस्वाल यांनाही ओळखल्या जाते. नवरगाव चे प्राचार्य सदानंद बोरकर यांनी परिसरात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित अनेक नाटकांची निर्मिती करून समाजातील विविध सामाजिक समस्यांकडे या माध्यमातून लक्ष वेधलेले आहे. गेल्या काही वर्षापासुन या झाडीपट्टीत दर वर्षी झाडीबोली साहित्य सम्मेलन व कवी सम्मेलन नित्य नेमाने होत आहेत. त्यातून अनेक नवोदितांना आपल्या प्रतिभा दाखविण्याची व सादर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
या झाडीपट्टीत दिवाळी ते महाशिवरात्री या दरम्यान होणाऱ्या नाटकांची चर्चा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेली आहे. विविध सामाजिक आशय असलेल्या या नाटकांमधून प्रेक्षकांच्या ह्रदयात अनेक नाट्यकलावंतांनी आपल्या अभिनयाने घर केले आहे. या झाडीपट्टी नाटकांमुळे करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल दर वर्षी होत असून अनेकांनी यातून आर्थिक संपन्नता व रोजगार प्राप्त केलेला आहे. नुकतेच भारत सरकारने या झाडीपट्टीतील नाट्य कलावंत श्री. परशुराम खुणे यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवान्वित करीत एक प्रकारे झाडीबोली व झाडीपट्टीचा सन्मानच केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नुकतेच मुल येथे शासनातर्फे झाडीपट्टी सम्मेलन घेऊन झाडीबोलीचे महत्व एकप्रकारे अधोरेखितच केले आहे.
पण अजुनही राजाश्रय नसलेल्या अश्या या झाडीबोली साहित्याचे जतन होण्यासाठी व संस्कृती जपण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करून विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांसाठी याची माहिती करण्यात यावी, तसेच विद्यार्थी व येणाऱ्या पुढील पिढीच्या अभ्यासक्रमासाठी हा झाडीबोली साहित्याचा व संस्कृतीचा ठेवा स्वतंत्रपणे जतन करण्यासाठी विद्यापीठ परिसरात स्वतंत्र दालन सुरु करावे असा प्रस्ताव गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी नुकत्याच झालेल्या अधिसभा बैठकीत मांडला व त्याला सर्वानुमते मान्यताही देण्यात आली. आगामी काळात तयार होणाऱ्या विद्यापीठाच्या नवीन परिसरात या दालनाच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याबाबत सभाध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here