Home लेख वनांची क्रूर कत्तल: निसर्गाचा ढासळे समतोल!

वनांची क्रूर कत्तल: निसर्गाचा ढासळे समतोल! [आंतरराष्ट्रीय वन दिवस सप्ताह विशेष.]

43

 

_आपल्या दृष्टीआड असलेल्या सृष्टीचे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी स्पष्ट उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी आपल्याला मिळतात, ते या वनांमुळेच! मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगल तोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे, हे सन १९७०च्या दशकापासूनच जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली. संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा वर्ल्ड फॉरेस्ट डे- आंतरराष्ट्रीय वन दिन दि.२१ मार्च २०१२पासून साजरा करण्यास सुरुवात केली. श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या लेखणीतून वनमहात्म्य विशद… संपादक._

आपण “दृष्टीआड सृष्टी!” असे नेहमीच ऐकत असतो. पण या सृष्टीच्या आड असे काय आहे? जे आपल्याला दृश्य नाही, दिसत नाही. अशा कितीतरी गोष्टी या सृष्टीची चक्रे फिरवत असतात. यामध्ये दगड, माती, हवा, पाणी असे निर्जीव घटक आहेत. त्याचप्रमाणे झाडे-किडे, माणूस-प्राणी, साप-मासे असे विविध सजीवही आहेत. या सर्वांच्या अनुकूल-प्रतिकूल ससंबंधाने शतकानुशतके पृथ्वीचा इतिहास लिहीला जात आहे. या सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडत असतो. त्याचप्रमाणे यांच्या पूरक वापराने एकूणच जीवसृष्टीचे संवर्धनही होत असते. माणूस हा निसर्गाचा वैरी नसून त्याच्याच मदतीने निसर्गाचे जतन व संवर्धन होऊ शकते. जंगलांतून मिळणाऱ्या संसाधनांचा मनुष्याच्या उपजीविकेशी थेट संबंध आहे. इ.स.२००२ साली जंगल संवर्धनासाठी जैवविविधता कायदा मंजूर झाला. सामुहिक वनहक्क कायदा आला. कारण शासनच मोठाली झाडे तोडून उत्पन्न लाभ घेत असे आणि शेतकरी व सामान्य जनतेला वेठीस धरत असे, अटकाव करत असे. म्हणून शेतकरी व आदिवासी बांधवांनी याविरुद्ध दंड थोपटून आवाज उठविला. आदिवासी बांधवांनी तर “नावा नाटे; मावा राज!” म्हणत संघर्ष केला. त्यामुळेच त्यांचे व इतर परंपरेने राहणाऱ्या आणि जंगलांचे संवर्धन करणाऱ्या वननिवासी यांच्या जंगलावरील हक्कांना मंजूरी देण्यात आली. याच कायद्यांचा व इतर शासकीय योजनांचा आधार घेत गावांमध्ये बदल घडू लागले आहेत. याची काही उदाहरणे-
आदिवासी भागात सामुहिक वनहक्क मिळालेला गडचिरोली जिल्हा म्हणून नाव ऐकले असालच. येथील एकूण १०२५ गावांनी जैवविविधता समित्या स्थापन केल्या. त्यात मोठ्या प्रमाणात जंगल संवर्धनाला सुरूवात केली आहे. यातूनच लोकांच्या उपजीविकेचा प्रश्नही सुटत आहे. सन २००५ला आलेल्या या कायद्यानुसार जंगलांतील बांबू, तेंदूपत्ता या सर्वांचे मालकी हक्क ग्रामसभेला मिळाले. बांबूसारख्या वनोपजाची व्यवस्था लोकांनीच केली. यातून बांबूकटाई साठीची मजुरी आधीपेक्षा तिप्पट प्रमाणात लोकांना मिळू लागली, शिवाय या बांबूविक्रीतून गावासाठी आवश्यक विकासकामांस लोकांना पैसे मिळाले. कोरची तालुक्यात सालेम, झेंडेपार, अरवीटोला, अंधेरी, टेंभली, काळेगाव तर धानोरा तालुक्यातील लेखा- मेंढा या गावातील लोकांनी सात एकरात नवीन बांबूची लागवड केली आहे. जे जंगल त्यांना जगवते, त्या जंगलाला ते जगवत आहेत, वाढवत आहेत.
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या गावात काही वर्षांपूर्वी वनव्यवस्थापन समिती स्थापन झाली. उजाडलेल्या जंगलाचे संवर्धन झाले. त्यांत चराईबंदी, कुऱ्हाडबंदी वगैरे करण्याचे लोकांनीच ठरविले. वनांतील सर्व झाडांची मोजणी झाली. मोह या उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांचा लिलाव होऊ लागला, ते उत्पन्न गावातील लोकच घेऊ लागले. त्यातून गावात विकासकामे झाली. जंगल वाढीसह भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढली. उत्तम शेती होऊ लागली; गाव समृद्ध बनत गेले. आणखी उदाहरण धुळे जिल्ह्यातीलच लामकानी गावाचे आहे. शहरात राहणाऱ्या डॉक्टर धनंजय नेवाडकर यांना झालेल्या अपघातामुळे ते काही महिने सक्तीची विश्रांती घेण्यासाठी गावी आले. त्यावेळी लोकांपुढे गुरांचा चारा दुर्मिळ आणि विहिरीचे पाणी आटण्याची मोठी समस्या आहे, असे त्यांच्या लक्षात आले. गावाच्या बाजूलाच सातपुड्याची पर्वतरांग आहे. साधारण एक हजार एकरांचा हा डोंगर सुजलाम-सुफलाम करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी रोजगार हमी योजनेचा आधार घेतला. पाणी अडवा; पाणी जिरवा, ही कामे तेथे सुरु केली. गावातील लोकांना रोजगार हमी योजनेचा फायदा व रोजगार मिळाला. त्यातून गावातील गुरांच्या चाऱ्याची व पाण्याची समस्या मिटली, का? तर डोंगर पुन्हा समृद्ध बनला आहे.
कोरोना काळातील मागील तीन वर्षांपासून वन्यपशुंचा मानवी वस्त्यांवर हल्ला होत आहे. जनतेचा नाहक बळी जाऊन त्यांची शिकार ठरत आहे, मात्र वन प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत आहे. वेळीच बंदोबस्त झाला नसल्याने जनता वन प्रशासनास सहकार्य न करण्याच्या पावित्र्यात उभी ठाकली आहे. त्यामुळे शासनाला जबर नुकसानीचा फटका बसू शकतो. म्हणून सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी व जंगलाचे महत्त्व सर्वांना पटावे म्हणून शासन आणि विविध संस्था यांनी तत्सम नानाविध कार्यक्रम राबवावेत- अनावश्यक जंगलतोड टाळणे, अधिक झाडे लावणे, मनुष्य वस्त्यातील वन्यपशुंच्या हल्ल्यात जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहणे, जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे जाणणे इत्यादी जंगलांना सतत भेट देवून माहिती मिळविणे, आदींचा समावेश असतो. जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल काहींना चिंता वाटते. अशा सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे, हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण आखताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल. जसे वनांवरील हक्क लोकांना मिळत आहे, तसेच जंगल संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारीही लोकांकडे आहे. ज्या भागांत वनव्यवस्थापन समिती नाही किंवा नुसतीच कागदोपत्री आहे, अशा काही गावांतून लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे, मात्र बेजबाबदारपणामुळे त्यावर नियंत्रण नाही. यातून जंगलांचा विनाशच जास्त होत आहे व नको त्या वाईट प्रवृत्ती बोकाळत आहेत. यासाठी संतुलित, शाश्वत, जबाबदार लोकसहभागातून होणाऱ्या वन व्यवस्थापनातूनच शाश्वत उपजीविका निर्माण होईल. सोबतच सर्वांनाच शुद्ध हवा आणि शुद्ध आरोग्य अनुभवता येईल, यात यत्किंचितही शंका नाही!
!! आंतरराष्ट्रीय वनदिन सप्ताहाच्या समस्त मानवमात्रांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
मु. पो. ता. जि. गडचिरोली
फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here