Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘बदलत्या वातावरणाचा मानवी जीवन व कृषी व्यवस्थेवर होणारा परिणाम’ या...

चोपडा महाविद्यालयात ‘बदलत्या वातावरणाचा मानवी जीवन व कृषी व्यवस्थेवर होणारा परिणाम’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

50

 

चोपडा: येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा भूगोलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बदलत्या वातावरणाचा मानवी जीवन व कृषी व्यवस्थेवर होणारा परिणाम’ या विषयावर आधारित ‘एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी माजी शिक्षणमंत्री कै. मा.ना.अक्कासो. शरदचंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थापक अध्यक्ष कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन, वसुंधरा पूजन तसेच वृक्ष पूजन करून मान्यवरांच्या हस्ते या चर्चासत्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संशोधकांचे संशोधन लेख प्रकाशित करण्यात आलेल्या ‘इंटर नॅशनल जर्नल ऑफ जिओग्राफी’ या ऑनलाईन संशोधन जर्नल्सचे कळ दाबून प्रकाशन करण्यात आले.
या चर्चासत्रासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष व बीजभाषक प्रा. प्रवीण सप्तर्षी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच कार्यक्रमाचे उदघाटक प्रा. शिवाजीराव पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.एस.के. शेलार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथील भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.मदनलाल सूर्यवंशी,भूगोल अभ्यास मंडळ सदस्य प्रा. डॉ. विजय पाटील, सेवानिवृत्त भूगोल विभाग प्रमुख डॉ. एस. एस.अलिझाड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, चर्चासत्राचे समन्वयक, महाविद्यालयाचे समन्वयक तसेच भूगोल विभाग प्रमुख डॉ.शैलेश वाघ आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक चर्चासत्राचे समन्वयक व भूगोल विभाग प्रमुख डॉ.शैलेश वाघ यांनी केले.यावेळी त्यांनी चर्चासत्र आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. वक्त्यांचा परिचय डॉ.एल.बी.पटले यांनी करून दिला.
या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.शिवाजीराव पाटील उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती असून शेतीव्यवस्थेवर झालेला परिणाम हा नक्कीच जनजीवनावर होतो. शेतावर पडणारे नवीन रोग शेतकरी आत्महत्या सारख्या गंभीर प्रश्न पर्यंत जाऊन पोहोचतात. बदलत्या वातावरणाचा शेतावर प्रभाव पडून शेतकरी आत्महत्या करतात, त्याचा समाज जीवनावर परिणाम होतो. शेतावर फवारले जाणारे रासायनिक खते ही देखील मानवी जीवनावर परिणाम करतात. त्यामुळेच आजारांचे प्रमाण वाढते म्हणूनच आधुनिक शेती पद्धतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवून सेंद्रिय शेती द्वारे घेतलेल्या उत्पादनाची विक्री वाढविली पाहिजे.
यावेळी बीजभाषक तसेच भूगोलशास्त्र परिषद पुणे येथील कार्याध्यक्ष प्रा.प्रवीण सप्तर्षी म्हणाले की, बदलत्या वातावरणामुळे महापूर, वादळे, वाढते प्रदूषण, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर महासागराच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे. अलनिनो व लानीनो अशा विविध वादळांमुळे मानवी जीवनावर तसेच कृषी व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. वाढता ई-कचरा, वाढत्या सुखसोयी, वाढती आर्थिक विषमता यामुळे देखील प्रदूषणात वाढ होऊन त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर तसेच कृषी व्यवस्थेवर होतो. बदलत्या वातावरणाचा परिणाम टाळण्यासाठी शेताचे उत्पादन वातावरणाचा अंदाज घेऊन तात्काळ थांबविले पाहिजे आणि बदलत्या वातावरणावर संशोधन करून त्यावर त्वरित उपाययोजना शोधल्या पाहिजेत’.
यावेळी डॉ.मदनलाल सूर्यवंशी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय युद्ध, नद्यांना येणारा महापूर, नद्यांचे बदलते प्रवाह यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन जनता स्थलांतर करते. त्याचाही परिणाम मानवी जीवनावर होतो. दुष्काळ रोखण्यासाठी पडणाऱ्या पावसाचा योग्य पद्धतीने विनियोग करायला हवा. सॅटेलाईटद्वारे शेताचा सर्व्हे करून होणारी हानी तसेच रोगांचा प्रादुर्भाव यांचा सूक्ष्म अभ्यास करून होणारी हानी टाळता येऊ शकते. त्यासाठी बदलत्या वातावरणावर संशोधन करून उपाययोजना शोधणे आवश्यक आहे.’.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘वाढत्या तापमानाचा व प्रदूषणाचा होणारा परिणाम याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा.वाढते औद्योगीकरण यामुळे प्रदूषण वाढते व त्यामुळे जनजीवनावर परिणाम होऊन अर्थव्यवस्था विस्कळीत होते. म्हणूनच बदलत्या वातावरणावर अभ्यास करून येणाऱ्या पिढीला योग्य ज्ञान देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी भूगोल अभ्यास संशोधकांनी प्रयत्न करायला हवेत’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डी.एस.पाटील, डॉ.एल.बी.पटले तसेच व्ही.डी.शिंदे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.एन.एस. कोल्हे यांनी मानले.
या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. मुकेश बी. पाटील, डॉ. सौ.संगीता पाटील, मोतीराम बी. पावरा, डी.पी. सोनवणे, राजू निकम तसेच विविध समिती प्रमुख व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेप्रसंगी विविध राज्यातून आलेले संशोधक तसेच बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here