Home पुणे राज्य सरकार लवकरच चित्रपटाचे धोरण आणणार – अविनाश ढाकणे दिमाखदार सोहळ्यात पुणे...

राज्य सरकार लवकरच चित्रपटाचे धोरण आणणार – अविनाश ढाकणे दिमाखदार सोहळ्यात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

135

 

पुणे, – महाराष्ट्र सरकार लवकरच चित्रपटाबद्दल एक धोरण आणणार असल्याचे आणि त्याचा चित्रपट तयार करणाऱ्या स्थानिक तरुणांना खूप फायदा होणार असल्याचे दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे चित्रपट महोत्सवाचे (पिफ) उद्घाटन आज ढाकणे यांच्या हस्ते झाले. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, इटालियन कल्चरल इन्स्टिटयूटच्या संचालिका फ्रान्सीस्का अॅमेंडोला, गोथे इन्स्टिटयूटचे संचालक मार्कस बेचेल, पुणे फिल्म फाउंडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर आणि महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरीं यावेळी उपस्थित होते.
अविनाश ढाकणे पुढे म्हणाले, की राज्य शासनाचे चित्रपटचे धोरण कॅबिनेट बैठकीत सादर केले जाणार आहे.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, की सध्याचे जग हे ताणतणावाने भरलेले आहे. युद्धग्रस्त परिस्थिती आहे. त्या परिस्थितीला सावरण्यासाठी सिनेमा हेच एकमेव उत्तर असू शकते. म्हणून यावर्षीचे ‘पिफ’चे सूत्र ‘सिनेमा एक आशा’ (सिनेमा इज होप) आहे. पटेल यांनी यावर्षीच्या संपूर्ण महोत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले, “दरवर्षी जगभरातील उत्तोमोत्तम सिनेमे पुणे चित्रपट महोत्सवात दाखवले जातात आणि चंद्रपूर, नागपूर, लातूर आणि आता ‘नॉर्थ अमेरिका मराठी फिल्म फेस्टिव्हल’, इथे सॅटेलाईट महोत्सव होत आहेत. त्यासाठी ‘कान महोत्सवा’ने, पुणे चित्रपट महोत्सवाला खास बोलावले होते. ” ते म्हणाले, की यावर्षी जगभरातून ११८६ चित्रपट आले होते. त्यातून १४० च्या वर चित्रपट निवडण्यात आले असून, ४४ चित्रपटांचे प्रीमियरपुणे चित्रपट महोत्सवात होत आहेत.
यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडीओ उद्घोषक अमिन सयानी, दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार एम. एम. कीरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सयानी यांना यापूर्वीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्राचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गोरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गौतम घोष सत्काराला उत्तर देताना म्हणाले, की ‘पिफ’ हा भारतामधला महत्त्वाचा महोत्सव आहे आणि पुण्यातील प्रेक्षक खूप रसिक आहे. सध्याचा मराठी सिनेमा हा भारतातील खूप महत्त्वाचा प्रादेशिक सिनेमा आहे. डी. डब्ल्यू. ग्रीफीथ यांचे १०० वर्षांपूर्वीचे वाक्य सांगून ते म्हणाले, की सिनेमा जगामध्ये शांती आणू शकेल.
एम. एम. कीरवानी म्हणाले, “एस. डी. बर्मन हा जगामधला अतिशय प्रतिभावान संगीत दिग्दर्शक होता. माझ्या वडिलांनी मला त्याच्या गाण्याची ओळख करून दिली. त्यांच्या रचनांमध्ये मला शास्त्र आणि जादू, असे दोन्ही जाणवते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हे माझे भाग्य आहे.” यावेळी त्यांनी अमोल पालेकर यांनी ओळख करून दिलेल्या सुधीर फडके यांची आठवण काढली आणि फडके यांचे ‘तोच चंद्रमा नभात’, हे संपूर्ण गाणे गायले.
महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी पेट्र झेलेन्का – (झेक प्रजासत्ताक – नाटककार आणि दिग्दर्शक), शाई गोल्डमन (इस्रायल – सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता), सुधीर मिश्रा (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मंजू बोराह (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक), सेतारेह इस्कंदरी (इराण – अभिनेत्री), उमरान सफ्तेर (तुर्कस्तान – चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता), सू प्राडो (फिलिपाईन्स – अभिनेत्री) आणि विसाकेसा चंद्रसेकरम (श्रीलंका – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
पुणे चित्रपट महोत्सवाच्या कॅटलॉगचे यावेळी अनावरण करण्यात आले.
अभिनेते देव आनंद यांच्यावरील कॉफीटेबल बुकचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात आला.
गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. सदाबहार अभिनेते देव आनंद (२६ सप्टेंबर १९२३), गायक मुकेश (२२ जुलै १९२३), दिग्दर्शक मृणाल सेन (१४ मे १९२३), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर (२८ मे १९२३), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी (१९ नोव्हेंबर १९२३) आणि गीतकार शैलेन्द्र (३० ऑगस्ट १९२३) यांचे जन्मशताब्दी वर्ष ‘पिफ’ साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विख्यात शर्वरी जमेनीस आणि त्यांच्या संचाने, ‘नदी किनारे गाव रे,’ आंखो ही आंखो मे इशारा हो गया’, ‘जिया लागेना’, ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ओठो मे ऐसी बात’, या गाण्यांवर नृत्य सादर केले.
निकीता मोघे यांच्या संचाने लीला गांधी यांची ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’, ‘नाचतो डोंबारी’,‘ऐन दुपारी यमुना तिरी’,
सुव्रत आणि श्रेया यांनी सूत्रसंचालन केले.
१८ ते २५ जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’ होत आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.
महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० फक्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here