Home महाराष्ट्र स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे !

स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे !

46

 

 

किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका, ज्यांनी आपल्या गायन कलेने शास्त्रीय संगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले त्या स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे यांचे शनिवारी वृद्धपकाळाने निधन झाले. १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात जन्मलेल्या प्रभा अत्रे यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती तरीही त्यांनी शास्त्र पदवी घेऊन कायद्याचं शिक्षण घेतले. संगीत क्षेत्रात त्या अपघातानेच आल्या. सुरवातीच्या काळात विजय करंदीकर यांच्याकडून त्यांना रागाचा परिचय झाला पुढे जेष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर व त्यांचे बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यांनी गायनाला सुरुवात केली. ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावगीत यांवर त्यांचे प्रभुत्व होते. आपल्या कार्यक्रमात त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी गात. त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र शैलीत संगीतातील नवे राग निर्माण केले. शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार व्हावा म्हणून त्यांनी डॉ प्रभा अत्रे फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या मार्फत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रचार केला. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. डॉ प्रभा अत्रे फाऊंडेशन स्थापना आणि पुणे येथे स्वरमय गुरुकुलची स्थापना करून त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मार्गदर्शन केले. त्यांच्या अनेक शिष्यांनी पुढे संगीतात स्वतः चे स्थान निर्माण केले. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी संगीत कलेत डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांनी आकाशवाणी पुणे व नागपूर केंद्राच्या संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यानंतर एस एन डी टी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख म्हणूनही जवळपास दहा वर्ष त्या कार्यरत होत्या. डॉ प्रभा अत्रे या केवळ शास्त्रीय गायिकाच नव्हत्या तर त्या संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषीही होत्या. त्यांनी इंग्रजी व हिंदी भाषेत संगितावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.आपल्या सांगीतिक प्रवासाचे वर्णन त्यांनी त्यांच्या स्वरमयी या आत्मचरित्रात केले आहे. त्यांनी जवळपास दोनशेच्या वर बंदिशी लिहिल्या असून स्वराली, अंतस्वर ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी जवळपास ११ पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रभा अत्रे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात घालवले. त्यांच्या संगीत कलेची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. आचार्य अत्रे संगीत अवॉर्ड, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा स्वररत्न पुरस्कार, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार असे विविध मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तिन्ही मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीताचा एक आयाम संपला आहे. स्वर योगिनी डॉ प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here