Home मुंबई महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

138

मुंबई. दि. ०२.
महावितरणच्या पनवेल विभागांतर्गत नावडे शाखा कार्यालयात वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करणारे श्री. संदेश खुटले यांना मारहाण केल्याप्रकरणी पनवेल तालुका येथील पोलीस ठाण्यात थकीत वीज बिलधारक दत्तात्रय गोविंद पाटील व त्याचा मुलगा विशाल दत्तात्रय पाटील दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासाठी भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे कलम ३५३, कलम ३३२, कलम ५०४, कलम ५०६ व कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करून पनवेल तालुका पोलिस ठाणे पुढील कारवाई करत आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. संदेश खुटले व त्यांचे सहकारी जितेंद्र पाटील दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी नेहमी प्रमाणे थकबाकीची वसुलीसाठी वावंजे गाव येथे गेले होते. ग्राहक दत्तात्रय गोविंद पाटील यांची दोन महिन्याची थकबाकी असल्यामुळे त्यांना थकीत बिल भरा अन्यथा वीज खंडित करावी लागेल असे सांगितल्यावर दत्तात्रय गोविंद पाटील व त्याचा मुलगा विशाल दत्तात्रय पाटील “लाईट कशी कट करतो तुला बघतोच अशी धमकी देऊन शिवीगाळ व दमदाटी करू लागले. वीज कनेक्शन तोडायला त्याच्या घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाकडे जात असताना दत्तात्रय पाटील याने तंत्रज्ञ श्री. संदेश खुटले यांच्या गालावर जोराने चापट मारली.”
वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. संदेश खुटले व नावडा शाखाचे सहाय्यक अभियंता श्री. निलेश बुकटे यांच्या मदतीने दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे एफ.आय.आर दाखल केली. वीज चोरी मोहीम किंवा थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवत असताना, महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालण्याची ग्रामस्थांची ही नियमित सरावाची पद्धत होती. मात्र या प्रकरणांमध्ये श्री. संदेश खुटले यांनी कुठलीही माघार न घेता एफ.आय.आर. करण्याबाबत ठाम असल्याचे पाहून चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीप्रमाणे क्रॉस कंप्लेंट करण्याचा आरोपींनी प्रयत्न ही केला, मात्र घटनास्थळी घडलेला संपूर्ण प्रकार हा ध्वनी चित्रफिती मार्फत रेकॉर्ड केला असल्यामुळे त्यांचा हा डाव पूर्णतः फसला.सदर प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहे.
ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे व प्रामाणिकपणे वीजेचा वापर करावा व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन कामामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण भांडूप परिमंडलातर्फे ग्राहकांना करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here