Home गडचिरोली दिवसभरासाठी कार्यक्षमता प्राप्त!

दिवसभरासाठी कार्यक्षमता प्राप्त! [काकड आरती विशेष.]

109

 

_काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडा- एक प्रकारच्या ज्योतीने ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते._

कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात. संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, संत सावतोबा, संत चोखोबा, आदी संतांनी काकड आरती रचल्या आहेत. त्यात त्यांचा व अभंगांचा समावेश असतो. काकड आरतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात विविध गावांमध्ये विविध उपक्रम केले जातात. काही ठिकाणी कार्तिक महिन्यात रथोत्सवासाठी गावकरी एकत्र जमतात आणि सोहळ्याचा आनंद घेतात. काही गांवी शेवटी गोपाळकाला करून सांगता केली जाते.
“भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति|
पंचप्राण जीवे-भावे ओवाळू आरती||
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा|
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा||”
कोजागरी पौणिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो. एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो, अशी समजूत आहे. खरे तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी वर्ग थंडीमुळे आळशी बनू नये, सकाळी लवकर उठून नव्या जोमाने कामाला लागला पाहिजे, याच उद्देशाने काकड आरतीची परंपरा जोपासली जात आहे, असे कोणत्याही जाणकाराच्या श्रीमुखातून ऐकण्यास मिळेल, हेच खरे! एकेकाळी सर्व गावकरी, परिसरातील लोक एकत्रित सामुहिकपणे काकडत काकडत काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते. परंतु अलिकडच्या काळामध्ये काकडा आरतीमधील गर्दी ओसरू लागली आणि काकडा आरतीमध्ये येणाऱ्या तरूणांची संख्याही कमी झाली. ही फारच चिंतेची बाब! आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरूष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकडा आरती करतात. गावांमध्ये काकडा आरतीमध्ये टाळ, मृदूंग, चिपड्यांच्या तालावर भजने सादर होतात.
“काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती|
कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती||
राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही|
मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई||”
आताही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून, स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी. आरोग्य सुढृढ राहावे. असाही काकड आरतीमागील उद्देश असू शकतो. त्यामागे आरोग्यविषयक भावना निश्चितच दडलेली आहे. परंतु बहुतांश भाविक काकड आरतीकडे धार्मिक दृष्टीकोनातूनच पाहतात. मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक “जय जय रामकृष्ण हरी…!” असा गजर करीत, टाळमृदूंगाच्या तालात नगराला प्रदक्षिणा घालतात. चातुमार्सात देव- भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात. त्यांना उठविण्यासाठी ही काकड आरतीची परंपरा असल्याचे बोलले जाते. आरती दरम्यान तीन मंगलाचरण, काकड आरतीचे अभंग, भूपाळ्याचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव, आंधाळा पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होते. पांडूरंगाष्टक, कालभैरवाष्टक झाल्यानंतर काकड आरतीची समाप्ती होते. या काकड आरतीची त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होते.
“विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा||
सत्त्व-रज-तमात्मक काकडा केला|
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला||”
ही आपल्याकडे कित्येक हजारो वर्षांपासून सुरु असलेली पद्धत आहे. देवपूजा करताना आरती ही अगदी हमखास गायली जाते. आरती ही एक प्रकारे देवासाठी गायली जाणारी स्तुतिसुमने आहेत. जी आपण छान चाल लावून गातो. गणेशोत्सव, नवरात्र या काळात आरती ही अगदी हमखास गायली जाते. परंतु काकड आरतीचे एक वेगळेच महत्व आहे. कारण पहाटे जी गायली जाते, म्हणून तीला काकड आरती म्हणतात. कोणत्याही देवस्थानाला भेट देताना लोक पहाटेची काकड आरती अजिबात चुकवत नाहीत, हे विशेष!
“विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू|
कोटी रवी-शशी जैसे दिव्य उगवले हेळू||
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा||”
काकड आरती म्हणजे काय? असा विचार करत असाल तर काकड आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. ही आरती करण्यासाठी खास काकड्याने म्हणजे एका विशिष्ट ज्योतीने देवाला ओवाळण्यात येते म्हणून तीला काकड आरती असे म्हणतात. यामुळे दिवसभरासाठी अंगात जोश, उत्साह, कार्यक्षमता आणि तरतरी टिकून राहण्यास मदत होते, हे मात्र निश्चित!
!! भाविक भक्त मंडळींना काकड आरतीच्या अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

– संकलन व शब्दांकन –
श्री निकोडे कृष्णकुमार गुरूजी.
गडचिरोली, मोबा- 7775041086.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here