Home लेख शिक्षण दिन ; मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन

शिक्षण दिन ; मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन

72

 

आज ११ नोव्हेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो कारण आजच्याच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर १८८८ रोजी भारताचे पहिले शिक्षण मंत्री, थोर देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मक्का येथे जन्म झाला. मौलाना आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहिनुद्दीन असे होते. अबुल कलाम ही त्यांना पदवी मिळाली होती. अबुल कलाम म्हणजे वाचस्पती. पुढे त्यांनी स्वतःच्या नावापुढे आझाद लावले. त्यांचे वडील हे भारतीय होते तर आई अरब होती. अबुल कलाम आझाद यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. अगदी लहान वयातच त्यांनी अरबी, फारसी आणि उर्दू या भाषांचे ज्ञान मिळवले. त्यांना तर्कशास्त्र, तत्वज्ञान आणि गणित विषयांची आवड होती तसेच इस्लाम धर्माचा त्यांना गाढा अभ्यास होता. शिक्षण पूर्ण झल्यावर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी पत्रकारिता सुरू केली. इंग्रजी सत्तेच्या अन्याय अत्याचाराविरोधात जनजागृती करावी यासाठी त्यांनी अल हिलाल नावाचे उर्दू साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातून ते इंग्रजांविरुद्ध रान पेटवत असत. त्यामुळे इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. काही दिवसांनी त्यांनी अल बलाग नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले. ते आपल्या लेखणीतून इंग्रज राजवटीविरुद्ध जनतेला जागृत करीत. मुस्लिम समाजानेही स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घ्यावा यासाठी ते मुस्लिम तरुणांना प्रोत्साहित करीत. अबुल कलाम आझाद यांना इस्लाम धर्माचा गाढा अभ्यास असल्याने त्यांनी आपल्या धर्माची तत्वे शेवटपर्यंत जपली असे असले तरी मानवता हाच खरा धर्म आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मानवता धर्माचेच आचरण करायला हवे असे ते म्हणत. महात्मा गांधींचे ते सच्चे अनुयायी होते. गांधीजींच्या आदेशानेच त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे ते काँग्रेसचे प्रमुख नेते बनले. इतकेच नाही तर वयाच्या अवघ्या ३५ वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्षही बनले. काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यावर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर भर दिला आहे. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना अटक झाली. तुरुंगवास झाला पण त्यांनी देश स्वातंत्र्य करण्याचे जे व्रत स्वीकारले त्यातून माघार घेतली नाही. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य झाल्यावर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षणमंत्री म्हणून स्थान मिळाले. ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत देशात शिक्षणाचा प्रसार व प्रचार केला. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य देश कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे वक्तृत्व प्रभावी होते तसेच ते उत्तम लेखक होते. कुराणाचा अनुवाद केलेला तरजुमानुल कोरोन हा त्यांचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. इंडिया विन्स हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. मौलाना आझाद यांना परराष्ट्र नीतीचा खूप अभ्यास होता. विशेषतः युरोपच्या तत्कालीन परिस्थितीचे त्यांना खूप ज्ञान होते. ते जितके तल्लख बुद्धीचे होते तितकेच ते मनमिळावू स्वभावाचे होते. लॉर्ड बटमली जे इंग्लंडच्या हाऊस ऑफ लोर्ड्सचे सदस्य होते ते मौलाना आझाद यांच्याविषयी म्हणतात “मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते. देश स्वातंत्र्य व्हावा तसेच देशाची अखंडता कायम राहावी यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.” १९९२ साली केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मौलाना आझाद यांचे २३ फेब्रुवारी १९५८ रोजी निधन झाले. जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here