Home महाराष्ट्र द. मा गेले ; साहित्यातील मिरासदारी संपली

द. मा गेले ; साहित्यातील मिरासदारी संपली

77

मराठी साहित्यातील जेष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचा २ ऑक्टोबर रोजी दुसरा स्मृतीदिन होता. दोन वर्षापूर्वी कालच्याच दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातील मिरासदारी पर्वाचा अंत झाला असेच म्हणावे लागेल. द. मा. मिरासदार हे मराठीतील प्रख्यात विनोदी लेखक व कथाकथनकार होते. १४ एप्रिल १९२७ रोजी त्यांचा जन्म झाला. द. मा मिरासदार यांचे पूर्ण नाव दत्ताराम मारुती मिरासदार असे होते मात्र ते द. मा या नावानेच प्रसिद्ध झाले. द. मा मिरासदार यांनी १९५२ साली अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ते शिक्षक होते. त्याआधी काही काळ त्यांनी पत्रकारिताही केली. १९६२ सालापासून त्यांनी कथाकथनास सुरवात केली.

द. मा मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील यांनी ६० च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्रभर कथाकथनाचे प्रयोग केले. त्यांच्या कथाकथनाने महाराष्ट्राला अक्षरशः भुरळ घातली. द. मा मिरासदार हे विनोदी कथा सादर करायचे. त्या कथांचे लेखनही त्यांनीच केलेले असायचे. द. मा मिरासदार यांच्या भुताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, व्यंकुची शिकवणी, शिवाजीचे हस्ताक्षर, माझी पहिली चोरी, हरवल्या च्या शोध या विनोदी कथा श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. द. मा. मिरासदार यांची कथा सादर करण्याची शैली खुमारदार होती. आपल्या खुमारदार शैलीत कथा सादर करत त्यांनी महाराष्ट्राला लोटपोट हसवले. द. मा. मिरासदार यांनी विपुल प्रमाणात लेखन केले. विनोदी कथा ही त्यांची खासियत होती. द. मा. मिरासदार यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

याशिवाय त्यांनी १८ चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. एक डाव भुताचा या चित्रपटाची कथा- पटकथा लेखन त्यांनी केले आहे इतकेच नाही तर या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे. द. मा मिरासदार यांच्या विनोदी कथा ग्रामीण जीवनावर आधारित असत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे, इरसालपणाचे दर्शन त्यांच्या कथांतून घडत. त्यांनी केवळ विनोदीच नाही तर स्पर्श, विरंगुळा, कोणे एके काळी यासारख्या गंभीर कथाही लिहिल्या. द. मा. मिरासदार यांच्या अनेक कथांवर चित्रपट निघाले. त्यांच्या काही कथांचा समावेश शालेय अभ्यासक्रमातही करण्यात आला. त्यांना मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न निघणारी अशीच आहे. द. मा. मिरासदार यांच्या निधनाने मराठी साहित्यातील मिरासदारीच संपली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. द. मा. मिरासदार यांना विनम्र अभिवादन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here