( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:-नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारावर अनेकांची वेगवेगळी स्वप्ने असतात आणि ते आपापल्या परीने पूर्णही करीत असतात। परंतु अशा सर्व गोष्टींना फाटा देणारा एक आदर्श टेकामांडवा या गावात पाहावयास मिळाला। चंद्रपूर पोलीस विभागात वाहन चालक या पदावर लागल्यानंतर आकाश सोलनकर या जिल्हा परिषद टेकामांडवा शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी माझा पहिला पगार जिल्हा परिषद शाळेसाठी देईल अशी घोषणा केली होती। व त्याप्रमाणे त्यांनी ती पूर्णत्वास नेली। तालुक्यातील लोकसहभागातून लाखोंचा निधी जमा करून शाळेचे रुपडे पालटणाऱ्या टेकामांडवा शाळेला याच शाळेचा माजी विद्यार्थी आकाश सोलनकर यांनी त्याच्या पहिल्या पगारातून पंधरा हजार रुपयांच्या किमतीची साऊंड सिस्टिम शाळेला भेट दिली। आकाश सोलनकर यांचे वडील केशवराव सोलनकर यांच्या हस्ते शाळेला सदरील साहित्य सुपर्द करण्यात आले।त्याच्या या अभिनव कार्याबद्दल गावातील सर्व नागरिक, पालक अनेक मान्यवर व वेगवेगळ्या स्तरातून त्याचे खूप खूप कौतुक होत आहे। यावेळी शाळेतील शिक्षक लचु पवार, किसन बावणे, दीपक गोतावळे, रुपेश मांदाळे, उषा डोये, मुखळा मलेलवार उपस्थित होते।
