Home चंद्रपूर …शिक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, आमची लाज, शरम कशाला काढता?

…शिक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, आमची लाज, शरम कशाला काढता?

126

🔸अधिकारी लोकांनी शिक्षकांना सन्मानाने बोलावे!

सन्माननीय सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग,…..सस्नेह नमस्कार!

महोदय,
सर्वांना नम्रपणे विनंती आहे की, आपणास हजारो प्रशासकीय कामे आहेत ज्याची आम्हाला योग्यरितीने जाणीव आहे. आमचा शिक्षकवर्गही आज काही भरपूर कामे करतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून राञी झोपी जाईपर्यंत सतत या कामाचे चिंतन सुरू असते. शाळेत येण्याची तयारी तर काही लोक सर्व्हेक्षण, बी. एल. ओ. ची सकाळी व सायंकाळी कामे करतात. आधारकार्ड अपडेट, विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे, हजेरी लिहिणे, सेतू चाचण्या घेवून पेपर तपासणे त्याचे रेकाॅर्ड भरणे, विद्यार्थ्यांसाठी विविध सहशालेय उपक्रम घेणे, शाळेत विविध स्पर्धा व परीक्षा घेणे, मेरी माटी,मेरा देश अभियानातंर्गत विविध स्पर्धा घेणे, अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे, शाळेच्या चाचणीचे पेपर्स, सञ परीक्षा पेपर तपासणे रेकाॅर्ड ठेवणे हे सर्व आमचे कर्तव्य आहे व सातत्याने आम्ही करतो आहो. परत बोर्डाच्या परीक्षेची कामे असतेच. शाळेमध्ये सन २०१२ पासून शिक्षकांची भरती नाही. अनेक पदे खाली आहेत. कर्मचारी कमी कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत जात आहे. याउपरही शिक्षण विभागाची कामे तर आम्ही करतोच.

परंतू आरोग्य विभाग, महसूल विभाग, वनविभाग इ.ची आलेली कामे आम्ही करतो आहोत. कोरोनामध्ये आमची ड्युटी नाक्यावर, क्वारंटाईन सेंटर,सर्व्हे, कुठे किराणा सामानाचे वाटप, तर अहो एवढंच नाही तर दारूच्या दुकानाच्या गर्दीला नियंञित करण्यासाठी आमच्या शिक्षक बांधवांनी सेवा दिलेल्या आहेत आणि त्यांचे देहवसान झालेले आहेत. जरा सर्वांनी विचार करावा. त्यांची छोटी मुलं आहेत त्या कुटूंबाला यापूर्वी पेन्शन लागू नव्हती. आज नव्याने नवभारत साक्षरता अभियान व काही लोकांना जुनी बी.एल.ओ ची कामे सुरू आहेत. परत शाळा करणे. आपल्या वेळोवेळी सभा आदेश आले की, आमचा शिक्षक धावत जातो. अहो, आम्हीही माणसचं आहोत ना! सभा घेवून कोणत्यातरी कारणाने तुम्ही आमची लाज काढता? शिक्षक हा समाजातील प्रतिष्ठित घटक आहे. त्यालाही आपण सन्मान दिला पाहिजे. कारण तुम्हीही शिक्षकापासूनच घडलेत, याची जाणीव असू द्यावी.

तुम्ही कोणत्यातरी शिक्षकाचे विद्यार्थी आहात याचे भान न ठेवता तुम्ही आमची लाज काढता राजे..हो! खरंच तुम्ही शिकत असताना तुमच्या गुरूने तुमच्याकडून ही अपेक्षा केली असेल काय? हेचि फळ काय मम तपाला? तुम्ही अतिशय उच्च पदावर गेले आहात, जावे! आमच्यावतीने तुमचे अंतःकरणातून अभिनंदन आहे. परंतू आम्हीही घडवणारे आहोत ना! इतकीही आम्हाला जर तुमच्या मनात जागा नाही तर क्षमा असावी. तुम्ही गुरूलाच विसरले? केवळ ५ सप्टेंबर शिक्षकदिनाच्या दिवशी आमचा सत्कार करता? म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. तुम्हीही शासनाचे कर्मचारी व आम्हीही. ज्याचं जळते त्याला कळतेच! परंतू आपणास नम्र प्रार्थना करतो की, जरा शिक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. आमची लाज, शरम कशाला काढता?

✒️राजेंद्र मोहितकर(प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा( ग्रामीण)मो:-9422909525

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here